विम्बल्डन २०२१ : एक अविस्मरणीय अनुभव

युवराज निकम, फार्नबरो, यू.के.
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

विशेष

लिखाणाचा आणि माझा आजपर्यंत कधी काही संबंध आलेला नाही. पण हा अनुभव लिहिण्याचा मात्र मोह झाला. हे लिहीत असताना अथवा ते प्रसंग आठवत असताना, विम्बल्डनविषयी काय काय लिहू तेच कळत नव्हते.

वाईमध्ये शाळेत असताना प्रार्थना होण्याच्या वेळेस त्या त्या दिवशीच्या ठळक बातम्या वाचून दाखवाव्या लागत होत्या. त्या वेळी ‘विम्बल्डन’मध्ये अमुक एकाने अंतिम फेरीमध्ये मजल मारून ग्रँड स्लॅम पटकावले, अशी बातमी आवर्जून वाचायचो. विम्बल्डन म्हणजे एक से एक अव्वल दर्जेदार खेळाडूंची सर्वोत्तम टेनिस स्पर्धा, एवढी समज त्यावेळी होती. अजून एक आठवण म्हणजे लहानपणी मी, माझा भाऊ हर्षद, निखिल, विशाल, उदय आणि काही मित्र असे दोघे किंवा चौघे जण टेनिसचा व्हिडिओ गेम खेळायचो. त्यामुळेही असेल, पण टेनिस खेळामध्ये वेगळीच रुची होती.

विम्बल्डनला भेट देण्याची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती. आपण इंग्लंडमध्ये असूनसुद्धा अजून विम्बल्डनला गेलेलो नाही, याची जाणीव मनात कायम असायची. त्यासाठी मी योग्य संधीच्या शोधात होतो, आणि ती संधी यंदाच्या विम्बल्डनच्या फायनलच्या तिकिटाने चालून आली. तसे पाहता विम्बल्डनचे तिकीट  मिळणे आणि तेही अंतिम सामन्याचे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट. त्याचे सगळे श्रेय मी माझा मित्र चेतन कुबेर याला देतो. झाले असे की चेतन गेली अकरा -बारा वर्षे विम्बल्डनचे तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होता. चेतन टेनिसचा जबरदस्त चाहता. एका वर्षी तर तिकीट मिळाले नाही म्हणून त्याने तिथल्याच एका पबमध्ये थांबून संपूर्ण सामना पाहिला होता. ह्या वर्षी योगायोगाची गोष्ट म्हणजे मीदेखील विम्बल्डनच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होतो. कारण ह्यावेळची कोविडमुळे तिकिटांची सिस्टीम नेहमीपेक्षा थोडी वेगळी होती. 

त्याआधी आमचा जुलैच्या दहा तारखेला स्नोडॉन ट्रेक करण्याचा प्लॅन झाला होता. त्यामुळे चेतन आणि मी सारखे संपर्कातही होतो. असेच एकदा बोलता बोलता विम्बल्डनचा विषय निघाला. त्या संवादातून ह्या वेळची तिकिटांची सिस्टीम मी आणि चेतननी समजावून घेतली. आणि मग आम्ही दोघांनीही तिकिटे मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रत्येक फेरीसाठीची तिकिटे टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत होती. पण आम्ही दोघेही फक्त अंतिम सामन्याच्याच तिकिटांच्या प्रयत्नात होतो. शेवटच्या टप्प्यात अंतिम सामन्याच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले. पण अगोदरच बऱ्याच तिकिटांचे बुकिंग झाल्यामुळे त्या शेवटच्या टप्प्यात थोडीच तिकिटे उपलब्ध झाली होती. एकाच वेळी खूप जण तिकिटांसाठी प्रयत्न करीत असल्याने आमच्या आशा हळूहळू मावळत चालल्या होत्या. तरी आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि अक्षरशः अथक प्रयत्नांनंतर शेवटी आम्हाला तिकिटे मिळाली. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता ११ जुलैच्या अंतिम सामन्याची तिकिटे तर हातात होती. आम्हाला १० जुलैचा ट्रेकही करायचा होता. आम्ही जाणार होतो वेल्समधल्या सगळ्यात उंच असणाऱ्या स्नोडॉन शिखरावर. आमच्या ट्रेक रूटपासून विम्बल्डन होते चारशेपेक्षाही जास्त किलोमीटर अंतरावर. मग आम्ही या दोन्ही गोष्टी कशा साध्य करता येतील याचा चक्क एक आराखडा तयार केला आणि तो तसाच्या तसा अमलातही आणला.

आमचा म्हणजे चेतन, मी आणि तानियाचा, ११ जुलैचा दिवस पहाटे पावणेचारलाच सुरू झाला, वेल्स स्नोडॉनच्या पायथ्याशी असणाऱ्या द रॉक्स हॉस्टेल मधून. पहाटे बरोबर चार वाजता आम्ही विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी निघालो. प्रज्ञा आणि घरचे बाकीचेदेखील आमच्या प्लॅन प्रमाणे सगळे अपडेट्स घेत होते. मीनल वहिनींनी आमची बाकीची सर्व तयारी करून ठेवली  होती; अगदी ब्रेकफास्टपासून आमच्या विम्बल्डन स्पेशल ब्लेझरची बटणे लावेपर्यंत. तानिया आणि शौनकपण मदतीला होते, काय काय ट्राय करा ते सांगण्यासाठी. त्यांचाही उत्साह एवढा होता की काय सांगू... सगळे काही आवरून चेतन आणि मी विम्बल्डनच्या दिशेने निघालो. कार पार्किंग अगोदरचे बुक केल्याने कार पार्क करायला काही अडचण आली नाही. कार पार्क करून आम्ही टेनिस कोर्टाच्या आवारात प्रवेश केला. कोविडमुळे प्रवेशासाठी काही नियम होते. ज्यांचे लशीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांना यू.के.च्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अॅप मधून कोविड पास दाखवावा लागत होता. शिवाय लॅटरल फ्लो (रॅपिड अॅन्टीजेन) टेस्टचाही रिपोर्ट दाखवावा लागत होता. आम्ही दोघेही सर्व तयारीनिशी गेलो होतो. टेनिस कोर्टाच्या आवारातल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. सुटाबुटातले ब्रिटिश अधिकारी, पंच, खेळाडू, सुरक्षाअधिकारी सर्व काही नियमांनुसार चालले होते. सर्वांना मदत करण्यासाठी जागोजागी मदतनीस उभे होते.

विम्बल्डन प्रसिद्ध आहे ते तिथे जोपासत असलेल्या परंपरांसाठी. त्यातलीच एक म्हणजे स्ट्रॉबेरी आणि क्रीम यांचे डेझर्ट. विम्बल्डन टेनिस स्पर्धांच्या सुरुवातीपासून, १८७७ पासूनची ही परंपरा आहे.

यंदाचा अंतिम सामना सर्बीयाचा नोवाक जोकोविच आणि इटलीचा मॅटयो बेरेटीनी यांच्यात रंगणार होता. आमच्यासाठी ती एक पर्वणीच होती. विम्बल्डनचा अंतिम सामना सेंटर कोर्टवर पाहतानाची मजा काही औरच आहे. राजघराण्यातल्या आणि इतर बड्या लोकांची उपस्थिती, त्यांचे सुरक्षा अधिकारी, पांढऱ्या गणवेशातले खेळाडू, सुटा-बुटामधले अधिकारी, पंच, बॉल बॉय, तिथे उपस्थित असणारे प्रेक्षक सर्व काही मन मोहून टाकणारे दृश्य होते.

विम्बल्डनच्या सेन्टर कोर्ट ग्राउंडची कपॅसिटी आहे पंधरा हजार प्रेक्षकांची. त्या शिस्तीचाच एक भाग म्हणजे खेळ चालू असताना सुई पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पाळली जाते, आणि एखाद्या खेळाडूला पॉइंट मिळाल्यावर तो पॉइंट बरोबर  आहे की नाही ते स्क्रीनच्या साहाय्याने तपासून पाहण्याच्या दरम्यान वाजवलेल्या टाळ्या तितक्याच लयबद्ध असतात.

ह्या वेळी स्पर्धेला प्रेक्षकांमध्ये प्रिन्स विल्यम ह्यांची पत्नी केट मिडलटन होत्या. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजदेखील आमच्या मागच्या पाच-सहा रांगा सोडून बसला होता.  आमच्या पुढच्या रांगेत नोवाक जोकोविचचे कोच गोरान एवनसेवीक बसले होते. हे सर्व आम्ही दोघेही डोळ्यांत साठवून ठेवत होतो.

मॅचदरम्यान आमची तहान-भुकेची जाणीव जणू नाहीशीच झाली होती. एका क्षणाकरताही आम्ही आमची जागा सोडली नाही, एवढे आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. ते क्षण अविस्मरणीय होते आणि आम्हाला ते सगळेच्या सगळे अनुभवायचे होते. जोकोविचने ही लढत जिंकली, आणि त्याच बरोबर त्याने फेडरर आणि नदाल यांच्या विक्रमाची बरोबरी केली. आम्ही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो होतो. अजूनही ते क्षण डोळ्यासमोर येताना एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती येते. अजून काही वर्षांनंतरसुद्धा आम्हाला ते क्षण जसेच्या तसे अनुभवता यावेत एवढ्यासाठी केलेला लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न.

संबंधित बातम्या