या पडद्यामागे दडलंय काय?

अदिती पटवर्धन
सोमवार, 12 जुलै 2021

‘वेब’वॉच

हातातल्या स्मार्टफोनच्या पडद्यावर रंगणाऱ्या गप्पा-गोष्टी, सामाजिक देवाणघेवाणी, सिनेमे-मालिका, खेळांच्या लढती आणि बरंच काही भान हरपून पाहणाऱ्या-जगणाऱ्या सर्वसामान्य माणसांना या आभासी पडद्यामागे लपलेलं सत्य उघड करून दाखवणारा आणि ते करतानाच आपले डोळे उघडणारा माहितीपट ‘द सोशल डिलेमा’...

“तुझी कालची फेसबुक पोस्ट काय मस्त होती गं.. माझी कमेंट पाहिलीस न तू?”

“अरे, मी यूट्यूबवर पाहिलंय, हे डाएट केलं न की महिन्याभरात शुगर नॉर्मल होते!”

“स्नॅपचॅटवरचे नवीन फिल्टर पाहिलेस का? माझं नाक इतकं मोठं आहे, पण फिल्टर लाऊन फोटो काढला की अजिबात कळून येत नाही!”

यासारखे क्षणोक्षणी कानांवर पडणारे संवाद समाजमाध्यमं अर्थातच ‘सोशल मीडिया’ एव्हाना आपल्या आयुष्याचा किती अविभाज्य भाग होऊन गेलेली आहेत, याची साक्ष देतात. प्रत्येकजण या ना त्या समाजमाध्यमाचा नियमित वापर करतानाच आपल्यापरीनं या माध्यमावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतो... पण या प्रक्रियेत ही समाजमाध्यमं आपल्यावर किती प्रभाव पाडतायत, हे लक्षात घ्यायला मात्र आपल्याला उसंत नसते. हीच उसंत काढायला आपल्याला नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला ‘द सोशल डिलेमा’ हा माहितीपट उद्युक्त करतो.

सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे असलेला समाजमाध्यमांचा पसारा हा माहितीपट आपल्यासमोर आपल्याला समजेल अशा पद्धतीने मांडतो. आपल्या एका ‘लाइक’, ‘क्लिक’ किंवा साध्या ‘स्क्रोल’चा अर्थ आपल्यासाठी जरी फक्त त्या क्षणी एखादी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापुरता मर्यादित असला, तरी याच सगळ्या छोट्या-छोट्या क्रियांचं विश्लेषण करून आपल्या भावना आणि मनःस्थितीच नाही; तर आपली संपूर्ण निर्णयप्रक्रिया आणि मूल्यबैठकसुद्धा बदलणं या माध्यमांच्या सूत्रधारांना कसं शक्य होतं, हे कटू आणि भयंकर सत्य या माहितीपटातून जेफ ओर्लोवस्की या दिग्दर्शकाने आपल्यासमोर आणलेलं आहे.

‘डिलेमा’ म्हणजे द्विधा मनःस्थिती या माहितीपटाचं नावच सांगतं, की या नाण्याला अर्थातच दोन बाजू आहेत. समाजमाध्यमांचा उदय झाला, तोच मुळी माणसांना माणसांशी जोडण्याच्या निरतिशय चांगल्या हेतूतून. अर्थातच अपेक्षेप्रमाणे याचे फायदे सगळ्यांना डोळ्यांसमोर दिसत होतेच, पण या चांगल्या बाजू पाहूनच आपण हुरळून गेलो - कोणी या नाण्याच्या दुसऱ्या, अंधाऱ्या बाजूचा त्यावेळी विचारच केला नाही. 

मुळात या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत एक गोष्ट समान आहे - यातल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा सभासद होण्यासाठी पैसे भरावे लागत नाहीत. याचाच अर्थ वापरकर्त्यांकडून या प्लॅटफॉर्मला पैसे मिळत नाहीत. मग हा सगळा प्रपंच - अद्ययावत तंत्रज्ञान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विदा म्हणजेच ‘डेटा’ साठवण्यासाठी लागणारे प्रचंड क्षमतेचे सर्व्हर, सातत्याने नावीन्यासाठी झटणारा, भरपूर पगार घेणारा हुशार कर्मचारीवर्ग, मोठी कार्यालयं - परवडतं कसं?

‘जेव्हा तुम्ही एखाद्या उत्पादनासाठी पैसे मोजत नसता; तेव्हा तुम्ही स्वतःच एक उत्पादन असता!’ या उक्तीचा आधार घेऊन या कंपन्यांचं ‘जाहिरात-आधारित मॉडेल’ आपल्याला उलगडत जातं.

तुमच्या प्रत्येक आभासी क्रियेतून निर्माण होणारा डेटा साठवला जातो आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. जरा मागे जाऊन विचार केला तर सहज लक्षात येईल... असं कधी झालंय का, की इन्स्टाग्रामवर स्क्रोल करताना एखाद्या जाहिरातीतला एखादा कुर्ता जरा जास्त आवडला आणि तुम्ही काही क्षण थांबून तो नीट निरखून पाहिला... आणि त्यानंतर दिसणाऱ्या त्या ब्रँडच्या प्रत्येक जाहिरातीत तुम्हाला तोच कुर्ता दिसायला लागला… आत्तापर्यंत ‘रॅन्डम’ असणारी जाहिरात अचानक आपल्यासाठीच तयार केलीय की काय, अशी वाटायला लागते! हीच खरी मेख आहे. आपण कोणत्या गोष्टी ‘लाइक’ किंवा ‘शेअर’ करतो एवढंच नाही तर आपण कुठल्या पोस्टवर काही क्षण जास्त रेंगाळतो, कोणत्या वेळी कोणत्या गोष्टी ‘सर्च’ करतो… सगळ्याची नोंद ठेवली जाते आणि त्याचं विश्लेषण करून मग आपल्यापर्यंत वेगवेगळ्या पोस्ट पोहोचवल्या जातात… थोडक्यात, माझ्या ‘टाइमलाइन’वर दिसणाऱ्या गोष्टी कालक्रमानुसार सगळ्यांना सारख्या दिसत नाहीत - त्या फक्त मला तशा दिसत असतात; किंबहुना ‘दाखवल्या’ जात असतात. वेगवेगळ्या जाहिरातदारांना आपलं ‘चित्त’ विकण्याचं काम या कंपन्या करतात.

आणखी खोलवर जाऊन विचार केला, तर लक्षात येतं, की आपल्या आभासी जगातल्या लहान-मोठ्या सर्व हालचालींचा बारकाईने अभ्यास करून आपल्या भविष्यातल्या वागण्याचा अंदाज लावण्याचं तंत्र या कंपन्यांनी वेगवेगळे अल्गोरिदम वापरून अवगत केलंय आणि आपल्यावर सतत करण्यात येणाऱ्या या माहितीच्या माऱ्यामुळे आपलं वागणं, आवडीनिवडी या सगळ्यामध्ये सूक्ष्म बदल खरंच घडू लागतात, हे संशोधनातून सिद्ध झालंय. असे बदल घडवून आणण्याची शक्यता आणि संधी खरंतर जाहिरातदारांना विकली जाते. 

हे इतपतच मर्यादित असतं, तर कदाचित प्रश्न इतका मोठा नसता. पॅण्डोराच्या खोक्यातून जशा चांगल्या गोष्टी बाहेर पडल्या तसंच काही त्याहून भयंकर बाहेर पडलं… जसा जसा हा माहितीपट पुढे जातो, तशातशा या माध्यमांच्या दुरुपयोगामुळे घडलेल्या/ घडवण्यात आलेल्या अनेक गोष्टी समोर येतात. मोठमोठ्या देशांतील राजकारण्यांनी फिरवलेले निवडणुकांचे निकाल, खोट्या, बिनबुडाच्या बातम्या ‘व्हायरल’ झाल्यामुळे निर्माण झालेले गैरसमज, जाणूनबुजून वाढवण्यात आलेलं ध्रुवीकरण, एखाद्या विशिष्ट समाजगटाबद्दल पसरवण्यात आलेला तिरस्कार, घडवून आणलेली हत्याकांडं... आणि शिवाय या समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे निर्माण झालेले विविध मानसशास्त्रीय प्रश्न - त्याचं लागणारं व्यसन, त्यातून निर्माण होणारे न्यूनगंड, एकाकीपणा, नैराश्य... 

हार्वर्डमध्ये शिकलेला आणि पूर्वी गुगलमध्ये काम करणारा ट्रिस्तान हॅरिस नैतिक कारणांमुळे गुगलमधून बाहेर पडला. तो म्हणतो, “मला सगळ्यात जास्त काळजी याची वाटली, की या माध्यमाचा वापर करत असताना माणसांना त्याचं व्यसन लागू नये, या दृष्टीने गुगलमध्ये कोणीही प्रयत्न करत नाहीये!”

अशाच प्रकारची गोष्ट या माहितीपटाचा भाग असणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांची आहे. यातल्या काहींनी या समाजमाध्यमांचा जवळून अभ्यास केलेला आहे; तर काहींनी ट्रिस्तानप्रमाणेच खुद्द या माध्यमांच्या निर्मितीमध्येही हातभार लावलेला आहे. अतिशय हुशार आणि सर्जनशील असणारी ही माणसं नंतर मात्र या तंत्रज्ञानाच्या भयंकर परिणामांमुळे व्यथित झाली आणि त्यांनी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फेसबुक, गुगल, ट्वीटर, टिक-टॉक... सगळ्याच कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम केलेली ही सगळी मंडळी त्यांच्या मनातील शंका आणि भीती कॅमेऱ्यासमोर मोकळेपणाने मांडतात आणि या सगळ्यावर वेळीच उपाय शोधण्याची गरज अधोरेखित करतात. या प्लॅटफॉर्मच्या निर्मिती आणि व्यवस्थापनामध्ये नैतिकतेवर आधारित एक नवं मॉडेल असावं, असं सुचवलं जातं, पण या सगळ्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी एखादा ठोस उपाय मात्र हा माहितीपट देत नाही. त्यामुळे प्रत्येकानी एखाद्या सार्वत्रिक उपायाची वाट न पाहता स्वतः शक्य तितकी विश्वासार्ह माहिती गोळा करणं, या माध्यमांच्या मागच्या प्रक्रिया जाणून घेणं आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात या माध्यमांचा वापर सर्व प्रकारची काळजी घेऊन मर्यादित ठेवणं, हा एकच उपाय सध्या तरी आपल्याला या मायाजालात अडकण्यापासून वाचवू शकतो, हे खरंय.

संबंधित बातम्या