विदर्भाचे ऐतिहासिक यश

किशोर पेटकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

क्रीडांगण
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठत विदर्भाने ऐतिहासिक विजेतेपदही पटकावले. वैदर्भीय क्रिकेटसाठी ही क्रांतिकारी बाब आहे. साठ वर्षांच्या सहभागात या संघाने पहिल्याच प्रयत्नात इंदूर येथील होळकर स्टेडियमवर इतिहास घडविला.

भारतीय देशांतर्गत २०१७-१८ हा क्रिकेट मोसम विदर्भाने चांगलाच गाजवला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठत त्यांनी ऐतिहासिक विजेतेपदही पटकावले. वैदर्भीय क्रिकेटसाठी ही क्रांतिकारी बाब आहे. साठ वर्षांच्या सहभागात या संघाने पहिल्याच प्रयत्नात इंदूर येथील होळकर स्टेडियमवर इतिहास घडविला. माजी विजेत्या दिल्लीला पाणी पाजत प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर नाव कोरले. फैज फजल याच्या नेतृत्वाखालील संघाने जबरदस्त चिकाटी प्रदर्शित केली. उपांत्य लढतीत २०१४-१५ मोसमातील विजेत्या कर्नाटकवर पाच धावांनी थरारक विजय मिळविला. त्यानंतर दिल्लीचा संघ आत्मविश्‍वासाने भारलेल्या विदर्भाला प्रतिकार करू शकला नाही. विदर्भ संघातील स्थानिक खेळाडूंनी अफलातून खेळ केला. यामध्ये वेगवान गोलंदाजीचे भन्नाट प्रदर्शन केलेला रजनीश गुरबानी (३९ बळी) याची कामगिरी अफलातून ठरली. उपांत्यपूर्व लढतीत बंगालविरुद्ध, उपांत्य लढतीत कर्नाटकविरुद्ध आणि अंतिम लढतीत दिल्लीविरुद्ध तोच सामन्याचा मानकरी ठरला. इंदूरला हॅटट्रिक नोंदवून स्पर्धेच्या अंतिम लढतीत असा पराक्रम करणारा अवघा दुसरा गोलंदाज हा मान त्याने मिळविला. अक्षय वखरे (३४ बळी), आदित्य सरवटे (२९ बळी), अक्षय कर्णेवार (१६ बळी) या फिरकी गोलंदाजांची कामगिरीही लाजवाब ठरली, त्यामुळे अनुभवी कर्ण शर्मा या फिरकी गोलंदाजास अंतिम लढतीसाठी संघात जागा मिळाली नाही. फलंदाजीत कर्णधार फैज फजल (९१२ धावा) व संजय रामस्वामी (७७५ धावा) यांनी सलामीला भक्कम खेळ केला. त्यानंतर संघातील ‘प्रोफेशनल’ वसीम जाफर (५९५ धावा) व गणेश सतीश (६३८ धावा) यांच्यामुळे विदर्भाची मध्य फळी भक्कम ठरली. 

संघबांधणीवर भर 
विदर्भाने निर्णायक विजयासह रणजी करंडक पटकाविला. दिल्लीला त्यांनी चारीमुंड्या चीत केले. काही वर्षांपूर्वी रणजी स्पर्धा एलिट आणि प्लेट अशा गटांत दुभंगलेली असताना, विदर्भाचा संघ प्लेट गटात ढेचाळताना दिसत होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, दर्जेदार क्रिकेट स्टेडियम नागपूरमध्ये असूनही हा संघ राष्ट्रीय क्रिकेटमध्ये धापा टाकताना दिसत होता. संघबांधणीवर भर देत विदर्भ क्रिकेट असोसिएशनने लक्ष्यप्राप्तीच्या दिशेने वाटचाल ठेवली. त्यांनी संघात इतर राज्यातील ‘प्रोफेशनल’ खेळाडूंना स्थान देऊन अनुभवाच्या दृष्टिकोनातून समतोल साधण्याकडे लक्ष पुरविले. मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी करंडक जिंकणारा जाफर, तसेच कर्नाटकचा सतीश यांचा अनुभवही निर्णायक ठरला. मात्र हा संघ केवळ ‘प्रोफेशनल’ खेळाडूंवर जास्त विसंबून राहिला नाही. 

किमयागार प्रशिक्षक 
रणजी विजेतेपदाकडे दृष्टी लावून बसलेल्या विदर्भ संघासाठी चंद्रकांत पंडित हे किमयागार प्रशिक्षक ठरले. क्रिकेटमधील त्यांचा गाढा अनुभव लाखमोलाचा ठरला. ‘चंदू’ पंडित  भारतीय क्रिकेट कोळून प्यायलेले आहेत. ‘खडूस’ मुंबई क्रिकेटमध्ये भारताच्या या माजी यष्टिरक्षकाने खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने कितीतरी चढ-उताराचे मोसम अनुभवले आहेत. नागपूरमधील पहिल्या मोसमात त्यांनी जादूची कांडी फिरवली. २०१५-१६ मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने रणजी करंडक जिंकला होता. नागपूरला आल्यानंतर त्यांनी नवोदितांवर विश्‍वास दाखविला आणि खेळाडूंनीही प्रशिक्षकांना पूर्ण सहकार्य केले. विशेष बाब म्हणजे ते प्रसिद्धीच्या झोतापासूनही चार पावले दूरच राहिले. ड्रेसिंग रूममध्ये प्रफुल्लित वातावरण राहील हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट. त्यांनी खेळाडूंना प्रेरित केले. त्यांच्यात स्फूर्ती जागविली. त्यामुळेच विदर्भाला रणजी विजेतेपद शक्‍य झाले हे स्पष्टच आहे. 

रणजी विजेत्या विदर्भाची वाटचाल 
उपांत्यपूर्व फेरी - विरुद्ध केरळ ः ४१२ धावांनी विजय 
उपांत्य फेरी - विरुद्ध कर्नाटक ः ५ धावांनी विजय 
अंतिम सामना - विरुद्ध दिल्ली ः ९ विकेट्‌स राखून विजयी

संबंधित बातम्या