तमिळनाडूचे ऐतिहासिक यश

किशोर पेटकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

क्रीडांगण
 

ओडिशातील कटक येथे झालेल्या २३व्या राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धेत तमिळनाडूने विजेतेपद पटकाविले. त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली, कारण बलाढ्य मणिपूरला चीतपट करत त्यांनी ही स्पर्धा प्रथमच जिंकली. कौतुकाची बाब म्हणजे, या संघाने अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली होती. ईशान्येकडील मणिपूरचा भारतीय महिला फुटबॉलमध्ये दबदबा आहे. त्यांनी तब्बल १८ वेळा राष्ट्रीय महिला किताब जिंकला आहे. मणिपूर संघातील प्रमुख खेळाडू एन. बाला देवी ही भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय आघाडीपटू रतनबाला देवी ही सुद्धा मणिपूरचीच. तमिळनाडूच्या महिलांनी झुंजार खेळ करत भारतीय फुटबॉलमध्ये नवा अध्याय लिहिला. स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकता, मणिपूरच्या वर्चस्वाव्यतिरिक्त बंगालने दोन वेळा, तर ओडिशा व रेल्वेने प्रत्येकी एक वेळ राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. तमिळनाडूचा संघ विजेतेपद पटकावेल याबाबत सुरवातीस साशंकता होती. एम. मुरुहूवेंदन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने जिगरबाज खेळ करत साऱ्यांनाच थक्क केले. विजेतेपदापर्यंतच्या वाटचालीत तमिळनाडूने तीन माजी विजेत्यांना पाणी पाजले. उपांत्यपूर्व फेरीत यजमान ओडिशाला, तर उपांत्य फेरीत त्यांनी बंगालचा पाडाव केला. त्यानंतर अंतिम लढतीत मणिपूरला नमवून करंडक उंचावला. स्पर्धेत तमिळनाडूच्या इंदुमती हिने अप्रतिम खेळ केला. स्पर्धेत तिने एकूण दहा गोल नोंदविले. स्पर्धावीर आणि अंतिम सामन्याची मानकरी हे दोन्ही किताब इंदुमतीलाच मिळाले.

मदुराई शहरात जल्लोष
तमिळनाडूच्या राष्ट्रीय विजेतेपदात मदुराई शहरास खास महत्त्व आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी तमिळनाडूचा वीस सदस्यीय संघ होता, त्यापैकी दहा खेळाडू मदुराई भागातील होते. तेथील सेतू एफसी संघातर्फे खेळणाऱ्या खेळाडूंमुळे तमिळनाडूचा निम्मा संघ उभा राहिला होता. सेतू एफसी भारतीय फुटबॉलमध्ये योगदान देत आहे. गतवर्षी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने महिलांसाठी क्‍लब पातळीवर लीग स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत सेतू एफसीने तमिळनाडूतील महिला फुटबॉलपटूंना अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. तमिळनाडूची कर्णधार एम. नंदिनी ही याच संघाची खेळाडू आहे. मदुराईतील या मुलींची कौटुंबिक पार्श्‍वभूमी सुखवस्तू नाही. मेहनत आणि खेळाप्रती ओढ यामुळे घरची परिस्थिती बेताची असूनही त्यांनी फुटबॉल मैदानावर यशाची पताका फडकाविली. खेळाडूंना मदुराईतील अण्णामलाई विद्यापीठाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे महिला फुटबॉलमध्ये लक्षवेधक खेळ करणे शक्‍य झालेले आहे. खेळाडूंचे पालक हे शेतकरी पार्श्‍वभूमी असलेले. विद्यापीठ आणि सेतू क्‍लबचे पाठबळ यामुळे मदुराईतील मुलींनी झेप घेतली आहे. या अनुषंगाने तमिळनाडूचे भारतीय महिला फुटबॉलमधील यश उल्लेखनीय ठरते.

महिला फुटबॉलची स्थिती
भारतात महिला फुटबॉलची स्थिती फार मोठी उत्साहवर्धक नाही, तरीही गुणवत्ता भरपूर आढळते. फिफाच्या मानांकनात भारतीय महिला फुटबॉल संघ ५७व्या क्रमांकावर आहे. अदिती चौहान हिने ब्रिटनमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळण्याइतपत मजल मारली. दक्षिण आशियायी गटात भारताने सलग चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. तुलनेत संघाला विश्‍वकरंडक आणि आशिया करंडक स्पर्धा पात्रता कठीण ठरलेली आहे. चार वर्षांपूर्वी इन्चॉन येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघ खेळला होता. तेव्हा तीन सामन्यात एक विजय व दोन पराभव अशी कामगिरी झाली होती. महिला फुटबॉलला उत्तेजन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ प्रयत्न करत आहे, त्या दृष्टीने गतमोसमात क्‍लब पातळीवरील महिला फुटबॉल स्पर्धा खेळली गेली. ईशान्येकडील भागात महिला फुटबॉलमध्ये प्रगती जाणवते. आता अन्य राज्य संघटनांनीही महिला फुटबॉलला खतपाणी घालण्यास सुरवात केली आहे, तमिळनाडू हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

दृष्टिक्षेप यंदाच्या महिला फुटबॉल स्पर्धेवर...

  • अंतिम सामना ः तमिळनाडू वि. वि. मणिपूर २-१
  • उपांत्य फेरी ः मणिपूर वि. वि. रेल्वे २-१,  तमिळनाडू वि. वि. पश्‍चिम बंगाल ४-१

संबंधित बातम्या