भूतानचा ‘रोनाल्डो’!

 किशोर पेटकर
गुरुवार, 22 मार्च 2018

क्रीडांगण

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत यंदा चंडीगडच्या मिनर्व्हा पंजाब एफसी संघाने विजेतेपद मिळविले. खोगेन सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने कोलकत्याच्या मोहन बागान व ईस्ट बंगाल या मातब्बर संघांना मागे टाकले, तसेच मणिपूरच्या नेरोका एफसी संघाचे आव्हानही परतावून लावले. गतमोसमात मिनर्व्हा पंजाब संघाने धापा टाकत कशीबशी पदावनती टाळली होती, यंदा त्यांनी कमाल केली. आय-लीग स्पर्धेतील दुसऱ्याच मोसमात विजेतेपदास गवसणी घातली. या पंजाबी संघाच्या यशात भूतानचा आंतरराष्ट्रीय आघाडीपटू चेन्चो ग्येल्टशेन याने लाजबाव खेळ केला. धारदार आक्रमणामुळे मिनर्व्हा संघ स्पर्धेत वरचढ ठरला. त्यात चेन्चो याने मोलाचा वाटा उचलला. भूतानच्या या २१ वर्षीय ‘स्ट्रायकर’ने मिनर्व्हा पंजाब संघाला ‘शार्प शूटर’ आघाडीपटूची उणीव जाणवू दिली नाही. चेन्चोने आय-लीग स्पर्धेत सात वेळा चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविली. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसरा राहिला. मोहन बागानसाठी खेळलेला कॅमेरूनचा असेर पिएरे दिपांका याने १३, तर ईस्ट बंगालचा नायजेरियन दुडू ओमागबेमी याने ८ गोल केले. आय-लीगमधील त्याचा यंदा हा पहिलाच मोसम होता. भूतानव्यतिरिक्त थायलंड व बांगलादेशमध्ये क्‍लब पातळीवर खेळलेल्या चेन्चोला ‘भूतानचा रोनाल्डो’ असंही कौतुकाने संबोधले जाते. स्पॅनिश क्‍लब रियल माद्रिदचा पोर्तुगीज स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा त्याचा लहानपणापासूनचा आदर्श. त्याच्याप्रमाणेच चेन्चो सुद्धा ’७’ क्रमांकाची जर्सी वापरतो. गोल केल्यानंतर आपल्या आवडत्या खेळाडूच्या शैलीत जल्लोष करतो आणि हे सारं तो जाणीवपूर्वक करतो. आपण रोनाल्डोचा चाहता आहे. मैदानावर खेळताना त्याच्याकडूनच प्रेरणा मिळते व मेहनत घेतो, असे चेन्चोनं मागं एका मुलाखतीत नमूद केले होते.

भूतानचा पहिला व्यावसायिक फुटबॉलपटू
परदेशात व्यावसायिक फुटबॉल खेळणारा चेन्चो ग्येल्टशेन हा भूतानचा पहिलाच फुटबॉलपटू आहे. थायलंड व बांगलादेशमध्ये तो व्यावसायिक फुटबॉल खेळला, पण दुय्यम भूमिकाच निभावली. ‘प्रोफेशनल’ या नात्याने त्याला मिनर्व्हा पंजाब संघात योग्य न्याय मिळाला. भारतात खेळण्याची त्याची पूर्वीपासून मनीषा होता. यंदा ती प्रत्यक्षात आली. त्याने नैसर्गिक गुणवत्तेला न्याय देताना प्रतिस्पर्धी बचावपटूंची झोप उडवली. त्याला भारतातील फुटबॉल ‘पंढरी’ असलेल्या कोलकत्यात खेळायचे होते, पण तेथील मोहन बागान व ईस्ट बंगाल या संघांनी त्याला नाकारले. भूतानचे जागतिक फुटबॉलमधील स्थान नगण्य, त्यामुळे तेथील फुटबॉलपटू काय कामाचा असंच कोलकत्यातील संघांचे मत बनले व त्याला संधी मिळाली नाही. ही माहिती खुद्द चेन्चो यानेच एका मुलाखतीत दिली. आय-लीग स्पर्धा गाजविल्यामुळे पुढील मोसमात इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेसाठी खेळाडू निवडताना त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. भन्नाट वेग आणि अफलातून ड्रिबलिंग हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे.

पदार्पणात गोल
चेन्चो ग्येल्टशेन याने १९ मार्च २०११ रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. नेपाळविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय लढतीत त्याने पदार्पणातच गोल करण्याचा पराक्रम साधला. भूतानचे २८ वेळा प्रतिनिधित्व करताना त्याने १० आंतरराष्ट्रीय गोल नोंदविले आहेत. देशातर्फे सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू हा मान त्याच्यापाशी आहे. त्याने नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, ओमान या आशियाई देशांविरुद्ध गोल केले आहेत. भूतानच्या १२ वर्षांखालील संघापासून चेन्चोच्या कारकिर्दीस सुरवात झाली. त्यानंतर सर्व वयोगटात त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. भावासोबत फुटबॉल खेळताना त्याला प्रोत्साहन मिळाले. या खेळात त्याने प्रगती साधली, त्यामुळे तो मार्शल आर्टस व ॲथलेटिक्‍सऐवजी फुटबॉलमध्येच रमला. व्यावसायिक फुटबॉलमध्ये मोठे यश मिळविण्याचे स्वप्न त्याने लहानपणीच पाहिले होते, ते आता प्रत्यक्षात येऊ लागले आहे.

फुटबॉलपटू चेन्चो ग्येल्टशेनविषयी...

  •   जन्मतारीख ः १० मे १९९६
  •   पहिला क्‍लब संघ ः 
  • यीदझिन (भूतान)
  •   आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ः २८ सामने, १० गोल
  •   क्‍लब विजेतीपदे ः 
  • भूतान लीग ः २०१३ (यीदझिन), २०१४ (द्रुक युनायटेड), 
  • भारतातील आय-लीग ः २०१७-१८ (मिनर्व्हा पंजाब)

संबंधित बातम्या