आर्सेनलचा वेन्गेरना ‘गुडबाय’

किशोर पेटकर
गुरुवार, 3 मे 2018

क्रीडांगण

उत्तर लंडनमधील नावाजलेला फुटबॉल क्‍लब ‘आर्सेनल’ने मॅनेजर (प्रशिक्षक) आर्सेन वेन्गेर यांना ‘गुडबाय’ केला आहे. वेन्गेर यांनी पद सोडण्याचे ठरविले असले, तरी क्‍लबने त्यांना डच्चू दिल्याचे मानले जाते. मोसमातील खराब कामगिरीमुळे आर्सेनलने नव्या चेहऱ्यास पसंती देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे वेन्गेर यांची दोन दशकांची कारकीर्द संपुष्टात आली. इंग्लिश प्रीमियर लीग संपल्यानंतर वेन्गेर अधिकृतपण आर्सेनलच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होतील. २२ वर्षे वेन्गेर यांनी आर्सेनलचे ‘मॅनेजर’ या नात्याने काम पाहिले. क्‍लबने तीन वेळा प्रीमियर लीग किताब जिंकला, मात्र शेवटचे यश खूप पूर्वीचे होते. २००३-०४ नंतर आर्सेनलला प्रीमियर लीग करंडक जिंकता आला नाही, तरीही क्‍लब व्यवस्थापनाचा वेन्गेर यांच्या व्यूहरचनेवर विश्‍वास राहिला, मात्र वर्षभरात वेन्गेर हे क्‍लबच्या चाहत्यांनाही नकोसे झाले. आर्सेनल क्‍लबने २०१७ मध्ये त्यांचा करार दोन वर्षांनी वाढविला होता, परंतु कालावधी पूर्ण होण्याअगोदर या फ्रेंच प्रशिक्षकांना ‘गनर्स’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संघाचा निरोप घ्यावा लागला. वेन्गेर यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाले त्या क्षणी आर्सेनल क्‍लब प्रीमियर लीग गुणतक्‍त्यात सहाव्या स्थानी होता. विजेतेपदाची त्यांना अजिबात संधी नाही. तुलनेत उत्तर लंडनमधील त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी टॉटेनहॅम हॉट्‌सपर संघ पुढे राहिला.  

नाण्याच्या दोन बाजू
आर्सेनल क्‍लबचे प्रशिक्षक या नात्याने आर्सेन वेन्गेर यांची कामगिरी एकाच नाण्याच्या दोन बाजू मानता येईल. क्‍लबचे ‘मॅनेजर’ या नात्याने त्यांनी ऑक्‍टोबर १९९६ मध्ये सूत्रे स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने सात वेळ एफए करंडक पटकाविला, पण या संघात आता पूर्वीचा दरारा नाही. वेन्गेर यांचा आर्सेनलबरोबरच्या कारकिर्दीचा पूर्वार्ध झळाळता ठरला. दशकभरापूर्वी हा संघ अतिशय बलाढ्य मानला गेला. यशाच्या बाबतीत वेन्गेर यांच्या अखेरच्या कालखंडात अपेक्षित कामगिरी दिसली नाही, पण प्रशिक्षक या नात्याने त्यांना ‘ग्रेट’ मानले जाते. आर्सेनल क्‍लबच्या इतिहासात त्यांना यापुढेही मानाचे स्थान राहील. आर्सेनलचा तंबू त्यांनी समर्थपणे पेलला. वेन्गेर यांच्या शैलीचा प्रभाव आर्सेनल क्‍लबच्या खेळात ठासून जाणवला. प्रतिस्पर्ध्यांनीही त्याची दखल घेतली. सलग बावीस वर्षे एकाच क्‍लबचे प्रशिक्षकपद सांभाळणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलग वीस वर्षे आर्सेनल क्‍लबने चॅंपियन्स लीगसाठी पात्रता मिळविली. सर्वोत्तम कालखंडात त्यांनी आर्सेनलच्या उत्कृष्ट संघाची बांधणी केली होती ही बाब त्यांचे टीकाकारही मान्य करतात. एका मोसमापूर्वी त्यांनी एफए करंडक सातव्यांदा जिंकला, पण त्यास प्रीमियर लीग यशाची झळाळी नव्हती. आर्सेनलला गतमोसमात प्रीमियर लीगमध्ये पाचवा क्रमांक मिळाला. चॅंपियन्स लीग स्पर्धेची बस त्यांना चुकली, तर यंदा एफए करंडक स्पर्धेत त्यांना विजेतेपद राखण्यात अपयश आले. या स्पर्धेतील मोहीम खूप लवकर आटोपली. 

फ्रान्स ते इंग्लंड...
आर्सेन वेन्गेर हे ६८ वर्षीय बुजुर्ग फुटबॉल प्रशिक्षक. १९८४ मध्ये प्रशिक्षक या नात्याने त्यांच्या कारकिर्दीस सुरवात झाली. फ्रान्समधील स्ट्रेसबर्ग येथे जन्मलेल्या वेन्गेर यांनी फ्रेंच लीगमध्ये बचावपटू या नात्याने छाप पाडली. १९६९ ते १९८१ ही खेळाडू या नात्याने त्यांची उमेदीची वर्षे. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक बनून नवी ‘इनिंग’ सुरू केली. फ्रान्समधील नॅन्सी, मोनॅको या क्‍लबांना मार्गदर्शन केल्यानंतर मध्यंतरी ते जपानमध्येही गेले, पण कल्पक मार्गदर्शक ही आर्सेन वेन्गेर यांची ओळख उत्तर लंडनमध्ये झाली. आर्सेनल क्‍लबला त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेले. बावीस वर्षांच्या कालखंडात त्यांनी चढउतार पाहिले. वेन्गेर यांच्या राजीनाम्यानंतर आर्सेनल क्‍लब नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळेल, मात्र वेन्गेर यांनी स्वतःच्या भवितव्याबाबत स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. 

आर्सेनल व वेन्गेर यांचे यश

  • प्रीमियर लीग (३ वेळा) ः १९९७-९८, २००१-०२, २००३-०४
  • एफए करंडक (७ वेळा) ः १९९७-९८, २००१-०२, २००२-०३, २००४-०५, २०१३-१४, २०१४-१५, २०१६-१७
  • कम्युनिटी शील्ड (७ वेळा) ः १९९८, १९९९, २००२, २००४, २०१४, २०१५, २०१७

संबंधित बातम्या