जर्मनी शापित जगज्जेते!

किशोर पेटकर
गुरुवार, 5 जुलै 2018

क्रीडांगण
 

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध शापित ठरला आहे. अठरा वर्षांच्या कालावधीत एकही जगज्जेता संघ विजेतेपद राखू शकला नाही, चार विजेत्यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. अपवाद फक्त ब्राझीलचा. २००२ मध्ये ते विजेते ठरले आणि २००६ मधील स्पर्धेत त्यांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. फ्रान्सने १९९८ मध्ये विजेतेपद मिळविले, पण २००२ मध्ये हा संघ पहिल्याच फेरीतच गारद झाला. तीच गत इटलीची. २००६ मध्ये चौथ्यांदा विश्‍वविजेतेपद मिळविल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी पहिल्या फेरीतच परतीचे तिकीट आरक्षित केले. २०१० मध्ये जगज्जेते ठरलेल्या स्पेनचा २०१४ मध्ये पहिल्या फेरीत धुव्वा उडाला. यावेळेस ही नामुष्की जर्मनीवर आली. चार वर्षांपूर्वी त्यांनी चौथ्यांदा विश्‍वकरंडक जिंकला. यंदा रशियात पहिल्या फेरीत ज्योकिम लोव यांच्या प्रतिथयश मार्गदर्शनाखालील संघाने विस्कळित खेळ केला. शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध त्यांचा खेळ साफ खालावला व १९३८ नंतर प्रथमच पहिल्या फेरीनंतर घरी जावे लागले. जर्मनीचे अपयश हे फुटबॉल जगतासाठी धक्कादायकच आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ते संभाव्य विजेते होते.

समन्वयाचा अभाव
जर्मनीने २०१४ मध्ये जगज्जेतेपद मिळविल्यानंतर तेथील फुटबॉलमध्ये उलथापालथ झाली. मिरोस्लाव क्‍लोज हा त्यांचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू. फिलिम लाम हा माजी कर्णधार संघासाठी प्रेरणास्रोत होता. या दोघांसह बॅस्टियन श्‍वेनस्टेगर, लुकास पोडोलस्की या प्रमुख खेळाडूंनीही निवृत्ती स्वीकारली. साहजिकच जर्मनचे बळ घटले. गतवर्षी रशियातच झालेल्या कॉन्फेडरेशन्स कप स्पर्धेत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देत जर्मनीने विजेतेपद पटकाविले, परंतु विश्‍वकरंडकात हा संघ ढेपाळला. सध्याच्या संघातील अनुभवी खेळाडूंना सूर गवसला नाही. मेसूट ओझील, थॉमस म्यूलेर यांचा खेळ निराशाजनक ठरला. विश्‍वकरंडक ऐन तोंडावर असताना अनुभवी गोलरक्षक मॅन्युएल न्यूएर याने तंदुरुस्ती सिद्ध केली. मार्को रेयूस हा आघाडीफळीतील खेळाडूही धडपडला. मारिओ गोमेझ, टोनी क्रूस याचे विशेष अस्तित्व जाणवले नाही. जर्मनीचे आक्रमण बोथट ठरले. सदोष नेमबाजी ही त्यांची असाध्य डोकेदुखी ठरली. मध्य क्षेत्रातून चेंडू पुढे सरकला, की जर्मन खेळाडू गोंधळत होते. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात जर्मनीने ७४ टक्के वर्चस्व राखले, पण त्यांना एकही गोल नोंदविता आला नाही. जर्मन संघात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवला. तीनपैकी दोन सामन्यांत ते पराभूत झाले, एकच विजय मिळाला. फक्त दोन गोल त्यांना नोंदविता आले, तर चार गोल स्वीकारले. ही कामगिरी जर्मनीच्या लौकिकास अजिबात साजेशी नाही. 

उत्तर शोधावे लागेल
रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेत काय चुकले या प्रश्‍नाचे उत्तर जर्मन फुटबॉल महासंघ व प्रशिक्षक ज्योकिम लोव यांना शोधावे लागेल. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या युरोपियन पात्रता फेरीत त्यांनी धडाकेबाज खेळ केला. १० पैकी दहाही सामने जिंकले. ४३ गोल नोंदविताना फक्त चार गोल स्वीकारले, गतवर्षी राखीव खेळाडूंना संधी देऊनही कॉन्फेडरेशन्स कप जिंकला. मात्र २०१८ वर्ष त्यांच्यासाठी निराशाजनक ठरले. विश्‍वकरंडकातील तीन सामने, त्यापूर्वीच्या चार मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय लढती मिळून लोव यांच्या मार्गदर्शनाखालील संघ मार्चपासून सात सामने खेळला. त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले, चार पराभव पत्करले व एक सामना बरोबरीत राहिला. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मोसमात चमकदार खेळ केलेल्या लेरॉय सॅन याला लोव यांनी संघाबाहेर ठेवले, २०१४ मध्ये विश्‍वकरंडक जिंकून देणारा गोल केलेल्या मारिओ गोत्झे यालाही निवडले नाही. विश्‍वास दाखविलेल्या संघातील अनुभवी खेळाडूंनी निराशा केली आणि विश्‍वकरंडकातील मोठा धक्का जर्मनीला सहन करावा लागला.

विश्‍वकरंडक स्पर्धेत जर्मनी
     विजेतेपद (४) ः १९५४, १९७४, १९९०, २०१४
     उपविजेतेपद (४) ः १९६६, १९८२, १९८६, २००२
     तिसरा क्रमांक (४) ः १९३४, १९७०, २००६, २०१०  
     चौथा क्रमांक (१) ः १९५८      उपांत्यपूर्व फेरी (३) ः १९६२, १९९४, १९९८
     दुसरी फेरी (१) ः १९७८      पहिली फेरी (२) ः १९३८, २०१८

संबंधित बातम्या