आफ्रिकन देशांना परतीचे तिकीट

किशोर पेटकर
गुरुवार, 5 जुलै 2018

क्रीडांगण
 

आशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत एकाही आफ्रिकन देशाला स्थान मिळाले नाही. फुटबॉलची अफाट गुणवत्ता असलेल्या या खंडातील ही नामुष्कीच ठरली. इजिप्त, मोरोक्को, नायजेरिया, सेनेगल, ट्युनिशिया यांची धडपड फार लवकर संपली. १९८६ मध्ये विश्‍वकरंडक स्पर्धेत उपउपांतपूर्व (राउंड ऑफ १६) फेरी सुरू झाली, तेव्हापासून प्रथमच आफ्रिकन संघाविना ही फेरी खेळली गेली. इजिप्त, मोरोक्को व ट्युनिशिया या आफ्रिकेच्या उत्तर भागातील देशांनी निराशा केली. इजिप्तला एकही गुण मिळविता आला नाही. हा संघ स्टार खेळाडू मोहम्मह सालाह याच्यावर खूपच अवलंबून आहे. मोरोक्कोने शेवटच्या साखळी लढतीत स्पेनला गोलबरोबरीत रोखून लक्ष वेधले, पण ते पुरेसे ठरले नाही. ट्युनिशियाने निरोपाच्या लढतीत कमजोर पनामास नमवून पूर्ण तीन गुणांची कमाई केली. पाच संघांत सेनेगलने चुणूक दाखविली, तरीही त्यांना बाद फेरी कठीण ठरली. नायजेरियास ‘ड’ गटातील शेवटच्या लढतीत अर्जेंटिनास नमविणे जमले नाही. नायजेरियाने शेवटची चार मिनिटे बाकी असताना गोल स्वीकारला नसता, तर लिओनेल मेस्सीच्या संघाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला असता. सेनेगलने बाद फेरीत पाय ठेवला होता, ऐनवेळी त्यांना ‘फेअर प्ले’ नियमाने दगा दिला. कोलंबियाविरुद्ध सामना गमावणे त्यांना महागात पडले. दुसरीकडे पोलंडकडून हार स्वीकारूनही जपानला ‘लॉटरी’ लागली. ‘ह’ गटात जपान व सेनेगलचे समान चार गुण झाले, गोलफरकही समान होता. मात्र कमी ‘यलो कार्डस्‌’मुळे जपान (-४) सेनेगलला (-६) सरस ठरले. यावरून फुटबॉलमध्ये शिस्तबद्ध आणि खिलाडूवृत्तीच्या खेळाचे महत्त्व अधोरेखित झाले.

बड्या संघांची अनुपस्थिती
अल्जेरिया, आयव्हरी कोस्ट, घाना, कॅमेरून हे आफ्रिकेतील बडे संघ. ‘फिफा’च्या मानांकनात त्यांचे स्थानही वरचे आहे. आफ्रिका पात्रता फेरीत त्यांना अपयश आले. त्यामुळे फुटबॉलप्रेमींना हे संघ आफ्रिकन शैलीची मेजवानी देऊ शकले नाहीत. यावेळचे संघ दीर्घ कालावधीनंतर खेळत होते. इजिप्त २८, तर मोरोक्को २० वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेस पात्र ठरला होता. सेनेगलला १६, तर ट्युनिशियाला १२ वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेचे तिकीट मिळाले. अपवाद फक्त नायजेरियाचा. रशियात ते सलग तिसरी विश्‍वकरंडक स्पर्धा खेळत होते. जागतिक फुटबॉलमध्ये आफ्रिकेतील संघांना ‘जायंट किलर’ मानले जाते. कॅमेरून (१९९०), सेनेगल (२००२), घाना (२०१०) या देशांनी यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेली आहे. कॅमेरूनच्या रॉजर मिला याची १९९० मधील कामगिरी अजूनही स्मरली जाते. यंदा आफ्रिकन खेळाडूंची जादू मैदानावर दिसली नाही. दुसरीकडे, आफ्रिकन वंशाचे, पण युरोपियन देशांकडून खेळणाऱ्या फुटबॉलपटूंनी छाप पाडली. आफ्रिकेला फुटबॉल गुणवत्तेची खाण मानले जाते. आश्‍चर्याची बाब म्हणजे, यंदाच्या स्पर्धेत ‘स्थलांतरित’ आफ्रिकन खेळाडू सरस ठरले.

५४ देश, पण ५ देश पात्र
रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत आफ्रिकेतील ५४ देश सहभागी झाले होते. त्यापैकी पाच देशांनी पात्रता मिळविली. सेनेगलचा अपवाद वगळता इतरांनी निराशा केली. आफ्रिकेतील फुटबॉलची पीछेहाट होतेय का अशी शंका निर्माण झाली. चार वर्षांपूर्वी ब्राझीलमधील विश्‍वकरंडक स्पर्धेत दोन देश ‘राउंड ऑफ १६’मध्ये खेळले होते. अल्जेरियास नमविण्यासाठी गतविजेत्या जर्मनीस अतिरिक्त वेळेत खेळावे लागले होते, तर फ्रान्सकडून हार स्वीकारण्यापूर्वी नायजेरियाने झुंजार खेळ केला होता. थोडक्‍यात यंदा आफ्रिकन देशांचे प्राबल्य दिसलेच नाही.

आफ्रिकन देशांची २०१८ मधील कामगिरी

  • इजिप्त (अ गट) ः पराभूत विरुद्ध उरुग्वे (०-१), रशिया (१-३), सौदी अरेबिया (१-२)
  • मोरोक्को (ब गट) ः पराभूत विरुद्ध इराण (०-१), पोर्तुगाल (०-१), बरोबरी विरुद्ध स्पेन (२-२)
  • नायजेरिया (ड गट) ः पराभूत विरुद्ध क्रोएशिया (०-२),  विजयी विरुद्ध आईसलॅंड (२-०), पराभूत विरुद्ध अर्जेंटिना (१-२)
  • ट्युनिशिया (ग गट) ः पराभूत विरुद्ध इंग्लंड (१-२), बेल्जियम (२-५), विजयी विरुद्ध पनामा (२-१) 
  • सेनेगल (ह गट) ः विजयी विरुद्ध पोलंड (२-१), बरोबरी विरुद्ध जपान (२-२), पराभूत विरुद्ध कोलंबिया (०-१)

संबंधित बातम्या