फ्रेंच क्रांती!

किशोर पेटकर
गुरुवार, 19 जुलै 2018

फुटबॉल विश्‍वकरंडक अंतिम सामन्यात फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया अशी लढत झाली. क्रोएशियाला हरवत फ्रान्स जगज्जेता झाला. संघात फारसे स्टार खेळाडू नसताना फ्रान्सने विजेतपद मिळवले. फ्रान्सच्या यशामागे कोणते गुपित दडले आहे, याचा घेतलेला आढावा...

मॉस्कोतील लुझनिकी स्टेडिअमवर रविवार १५ जुलै २०१८ रोजी फुटबॉलमधील आणखी एक फ्रेंच क्रांती अनुभवण्यास मिळाली. वीस वर्षांत दुसऱ्यांदा फ्रेंच फुटबॉलपटू जगज्जेतेपद मिरविताना दिसले. १२ जुलै १९९८ रोजी ‘स्टेड द फ्रान्स’ स्टेडिअमवर बलाढ्य ब्राझीलचा पाडाव करत फ्रान्सने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वप्रथम विश्‍वविजयाचे निशाण फडकावले होते. योगायोग असा, की तेव्हा संघाचे कर्णधार भूषविलेले दिदियर दिशाँप हे या वेळेस मुख्य प्रशिक्षक म्हणून मैदानात होते. ‘डग आऊट’मध्ये संघाला सूचना करत होते. लुझनिकी स्टेडिअमवर फ्रेंचांनी क्रोएशियाला तलवार म्यान करण्यास भाग पाडले. मैदानावरील ‘लढाई’त बाल्कन देशाचे वर्चस्व राहिले, पण जिंकले फ्रेंच. सामन्यात चेंडूवर ६१ टक्के ताबा राखत क्रोएशियन खेळाडूंनी वारंवार फ्रेंच क्षेत्रात धडक दिली, पण पूर्ण नियंत्रण राखण्यास व गोल नोंदविण्यात हा संघ कमी पडला. अर्थात, क्रोएट्स फ्रेंचांच्या दुसऱ्या जगज्जेतेपदात मोलाचा वाटा उचलला ही बाबही मान्य करावी लागेल. फ्रेंच आघाडीपटू अँतोईन ग्रीझमन याच्या फ्रीकिकवर हेडरद्वारे चेंडू आपल्याच गोलनेटमध्ये टाकण्याची चूक क्रोएशियाच्या मारियो मांडझुकिच याने केली. हा विश्‍वकरंडक अंतिम लढतीतील पहिलाच स्वयंगोल ठरला. नंतर इव्हान पेरिसिच याने गोलक्षेत्रात चेंडू हाताळला, परिणामी मिळालेल्या पेनल्टी किकवर ग्रीझमन चुकला नाही. क्रोएट संघाने पूर्ण ताकदीनिशी प्रतिहल्ला चढविला, परंतु त्यांची आक्रमणे फ्रेंच संघाने थोपविली आणि उधळूनही लावली. अपवाद फक्त दोन गोलांचा, मात्र दुसरीकडे भेदक पॉल पोग्बा व भन्नाट वेगाचा किलियन एम्बापे यांना थोपविणे क्रोएशियाच्या बचावफळीला अजिबात शक्‍य झाले नाही. ‘सेट पीस’वरील दोन आणि तेवढेच मैदानी गोल या बळावर फ्रेंचांनी ४-२ फरकाने झळाळता विश्‍वकरंडक उंचावला. मैदानात सामना सुरू असताना, केवळ चेंडूवर वर्चस्व राखणे म्हणजे सामना जिंकला असं नव्हे, तर संधी साधत गोल करावे लागतात, असं मागे उरुग्वेचे ७१ वर्षीय प्रशिक्षक ऑस्कर तबारेझ म्हणाले होते. ते यथायोग्यच आहे. फ्रान्स संघापाशी ३९ टक्के चेंडूचा ताबा होता, तरीही त्यांनी संधीचे सोने करत मॉस्कोत इतिहास घडविला. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक वीस वर्षांनंतर नवा संघ विश्‍वविजेता बनतो हा मागील इतिहास, पण यावेळे जिगरबाज ‘ले ब्ल्यू’ फ्रेंच संघाने परंपरेस छेद दिला. विश्‍वकरंडक इतिहासात नवव्यांदा झालेल्या ‘ऑल युरोप’ अंतिम लढतीत त्यांनी बाजी मारली.

फ्रेंचांचा वरचष्मा
क्रोएशियन संघ हा लढवय्या, मात्र जिगरबाज फ्रेंच संघासमोर त्यांची मात्रा चालली नाही. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानावर फ्रान्सविरुद्ध हा कधीच जिंकू शकलेला नाही. सहा लढतीत फ्रान्स संघाचे चार विजय, तर दोन बरोबरी. बरोबर वीस वर्षांपूर्वी, क्रोएशियाने विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत मुसंडी मारली होती. राष्ट्र बनून तेव्हा फक्त सात वर्षे उलटलेल्या या ‘युवा’ संघाचे खूप कौतुक झाले होते. उपांत्य लढतीत क्रोएशियाला फ्रान्सनेच रोखले होते. त्यानंतर ब्राझीलला नमवून फ्रेंचांनी घरच्या मैदानावर पहिल्यांदा जगज्जेताचा जल्लोष केला होता. रशियातील स्पर्धेत फ्रान्सने हुकूमत राखली. बाद फेरीतील तिन्ही सामने त्यांनी निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात जिंकले. दुसरीकडे क्रोएशियाला अंतिम फेरी गाठताना अगोदरच्या तीन सामन्यांत मिळून ३६० मिनिटे संघर्ष करावा लागला. जादा वेळ मैदानावर खेळल्यामुळे क्रोएशियाचा संघ दमलेलाही होता. नेमकी हीच गोष्ट फ्रान्सने हेरली. झ्लाट्‌को डेलीच यांच्या संघाने लढाऊ बाणा अवश्‍य प्रदर्शित केला. ते शेवटपर्यंत लढले. लढाई युद्धभूमीवरील असो, वा मैदानावरील, जिंकण्यासाठी योग्य वेळी प्रतिस्पर्ध्यांवर वार करावा लागतो. दिदयर देशाँप यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची ही बाब परिणामकारक साधली. फ्रान्सचा संघ मजबूत आणि मानसिकदृष्ट्या कणखर दिसला. आक्रमण व बचावात सक्षम होता. दोन वर्षांपूर्वी युरो करंडकाची अंतिम लढत फ्रान्सला गमवावी लागली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने करारी झुंज देत करंडक पटकावला होता. यावेळेस देशाँप आणि त्यांचा संघ सावध राहिला. प्रतिस्पर्धी आक्रमणे यशस्वीपणे रोखण्याइतपत ताकद त्यांच्यापाशी होती. २०१६ मधील मायदेशातील कटू स्मृती पुसत, रशियात फ्रेंच संघाने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठत विश्‍वकरंडकावर मोहोर उठविली. वेगवान खेळावर भर देत त्यांनी चेंडूवर योग्य नियंत्रणही राखले. फ्रेंच संघाची रणनीती कल्पक होती. प्रशिक्षकांची योजना  प्रत्यक्ष मैदानावर यशस्वी ठरविणारे हुकमी खेळाडू त्यांच्यापाशी होते. त्यामुळेच कर्णधार ह्युगो लोरिस विश्‍वविजेतेपदाचा करंडक स्वीकारू शकला. क्रोएशियाने सज्जता दाखविली, मात्र दबावाखाली ते चेपले. त्यामुळे त्यांच्याकडून चुका घडल्या. देशवासीयांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाहीत. क्रोएशियाने बाद फेरीत डेन्मार्क, रशिया या संघाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर, तर उपांत्य लढतीत इंग्लंडवर अतिरिक्त वेळेत मात केली. फ्रान्सला ताणणे त्यांना जमले नाही. तासाभराच्या खेळात चार गोलांची भक्कम आघाडी घेत फ्रेंच संघाने क्रोएशियाला मुसंडीची संधी दिली नाही. क्रोएटस्‌नी झुंज दिली, त्यासाठी ते कौतुकास पात्र ठरतात.

जादूगर देशाँप...
मैदानावरील खेळाडूंची मेहनत, त्यांची गुणवत्ता आणि हुकमत या बळावर संघ जिंकतो. फ्रान्सच्या खेळाडूंनी सरस खेळ केला. त्यांच्याइतकेच विश्‍वविजयाचे शिल्पकार प्रशिक्षक दिदियर देशाँपही आहेत. त्यांना फ्रेंच फुटबॉलमधील जादूगर मानले जाते. ४९ वर्षीय देशाँप तल्लख. रशियात त्यांची व्यूहरचना कमालीची यशस्वी ठरली. खरं म्हणजे, विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी फ्रान्स संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार नव्हता. जागतिक मानांकनात ते सातवे होते. प्रत्येक वेळेस एक सामना नजरेसमोर ठेवत देशाँप खेळाडूंसह मैदानात उतरले.  फुटबॉल मैदानावर खेळाडूंना प्रेरित करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. खेळाडू, कर्णधार या नात्याने ते सहकाऱ्यांसाठी ते सदैव प्रेरक ठरत. वीस वर्षांपूर्वी झिनेदिन झिदान याच्या भन्नाट कामगिरीमुळे फ्रान्सने पहिल्यांदा विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हा संघाचे आत्मबळ वाढविण्याचे काम देशाँप यांनी कर्णधार या नात्याने बजावले होते. मैदानावर खेळताना ते ‘बचावात्मक मध्यरक्षका’च्या जागी दिसायचे. अकरा वर्षांच्या कारकिर्दीत १०३ सामने खेळले. विश्‍वकरंडकाबरोबर, युरो करंडक जिंकणाऱ्या संघाच्या वाटचालीत कर्णधार या नात्याने मोलाची भूमिका बजावली. नेतृत्वगुण त्यांच्यात ठायीठायी दिसतो. तेव्हाचा फ्रेंच संघ खरोखरच सर्वोत्तम होता. निवृत्तीनंतर देशाँप यांनी फुटबॉल प्रशिक्षणात झोकून घेतले. या भूमिकेत त्यांची कारकीर्द मोनॅको संघापासून सुरू झाली. आठ वर्षांपूर्वी, ८ जुलै २०१२ रोजी त्यांच्याकडे फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे आली. तेव्हापासून एक प्रबळ, चिवट आणि लढवय्या संघाची बांधणी करण्यावर देशाँप यांनी भर दिला. संघ निवडताना त्यांना खेळाडूंची मागील गौरवशाली कारकीर्द मान्य नसते. खेळाडूची सध्याची कामगिरी ते श्रेष्ठ मानतात. त्यामुळे रशियातील विश्‍वकरंडकासाठी त्यांनी अनुभवी करीम बेन्झेमा, मामादोऊ साखा, मॅथ्यू देबुशी यांना संघातून वगळले. त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली, पण ते डगमगले नाहीत. रशियातील स्पर्धेसाठी त्यांनी निव्वळ गुणवत्तेच्या आधारे खेळाडूंना निवडले, त्यांना प्रेरित केले. संघातील प्रत्येक खेळाडूंची पाठराखण केली. किलियन एम्बापेसारख्या एकदम तरूण रक्तावर विश्‍वास दाखविला. बेंजामिन पावार्दसारख्या नवोदित बचावपटूस त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. देशाँप हे मुखतः बचावात्मक प्रशिक्षक असल्याचे त्यांचे विरोधक मानतात. त्याची त्यांना तमा नाही. वेळप्रसंगी सुसाट आक्रमण आणि तेवढाच भक्कम बचाव हे त्यांचे सूत्र. ‘राउंड ऑफ १६’ सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सच्या बचावाची वेळोवेळी परीक्षा पाहिली. शेवटी देशाँप यांची रणनीती वरचढ ठरली. अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत फ्रान्सचा बचाव सर्वोत्तम ठरला. उरुग्वे, बेल्जियम, क्रोएशियाविरुद्ध फ्रान्सला आक्रमणाच्या कमी संधी मिळाल्या, 

तरीही या तिन्ही सामन्यात देशाँप यांची व्यूहरचना ‘बॅकफूट’ वर गेली नाही. वेळ येताच त्यांच्या संघाने सावजावर झडप टाकली व विजय संपादन केला. रशियातील विश्‍वकरंडकात त्यांची मैदानावरील ४-२-३-१ ही व्यूहरचना कमालीची प्रभावी ठरली. रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेत देशाँप यांनी प्रशिक्षक या नात्याने मोलाचे टप्पे गाठले. ब्राझीलचे मारियो झागालो व जर्मनीचे फ्रांझ बेकेनबॉर यांच्यानंतर खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने विश्‍वकरंडक जिंकणारे ते तिसरेच आहेत. विश्‍वकरंडकात सर्वाधिक बारा सामन्यांत फ्रान्स संघाला मार्गदर्शन करणारे ते पहिले आहेत. या वाटचालीत देशाँप यांनी रेमंड डोमेनेश व मिशेल हिदाल्गो यांना मागे टाकले. अर्जेंटिनाविरुद्ध देशाँप यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंच संघ ऐंशीव्या सामन्यात मैदानावर उतरला. या कामगिरीने ते फ्रान्सचे सर्वांत ‘दीर्घायुषी’ प्रशिक्षक ठरले. गतवर्षी फ्रान्स फुटबॉल महासंघाने त्यांचा करार २०२० मधील युरो स्पर्धेपर्यंत वाढवला, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंच संघ यशस्वी आगेकूच राखण्यासाठी उत्सुक असेल.

सर्वव्यापी संघ
विश्‍वकरंडक जिंकलेला फ्रान्स संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नव्हता. या संघात मोठे सुपरस्टारही नव्हते. हा संघ सर्वव्यापी ठरला. संघ एकखांबी बनणार नाही याची दक्षता प्रशिक्षक देशाँप यांनी घेतली. एका खेळाडूवर अवलंबून राहिलं, की काय होतं हे याच स्पर्धेत पाहायला मिळाले. त्यामुळे लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल, नेमारचा ब्राझील, महंमद सालाहचा इजिप्त या देशांना अपयश आले. इंग्लंडचा संघही आक्रमणात हॅरी केनवर जास्त अवलंबून राहिला. त्याचवेळी जर्मनीचा संघ खेळाडूंच्या बेसूर कामगिरीमुळे भरकटल्याचे दिसून आले. फ्रान्सचा संघ अष्टपैलू ठरला. आक्रमणाची धुरा यशस्वीपणे वाहताना अँतोईन ग्रीझमन व किलियन एम्बापे यांनी प्रत्येकी चार गोल केले, याशिवाय बेंजामिन पावार्द, राफेल व्हरान, सॅम्युएल उमटिटी या बचावपटूंनीही निर्णायक टप्प्यावर गोल नोंदविले. ऑलिव्हर गिरुँ याने गोल केले नाही, पण त्याची संघातील उपस्थिती परिणामकारक ठरली. पॉल पोग्बा, ब्लेज मातुडी, एन्गोलो कांते, लुकास हर्नांडेझ यांची  कामगिरीही उल्लेखनीय ठरली. ह्युगो लोरिस याने गोलक्षणाचा भार सक्षमपणे पेलला, त्याने स्पर्धेत सहा गोल स्वीकारले. फ्रान्सला सध्या दहशतवाद, स्थलांतरितांचा प्रश्‍न आणि वंशवाद भेडसावत आहे. फ्रेंच फुटबॉलमध्ये स्थलांतरित आणि आफ्रिकन वंशाच्या फुटबॉलपटूंनी मोलाचे योगदान दिलेले आहे. रशियातील कामगिरीतही पश्‍चिम-उत्तर आफ्रिकेतील मूळ असलेल्या फ्रेंच फुटबॉलपटूंनी ठसा उमटविला. फ्रान्समध्ये अधूनमधून वंशवादाचे भूत डोके वर काढताना दिसते, तेथील उजव्या विचारसरणीच्या लोकांचीही तीव्र वक्तव्ये प्रसिद्ध होतात. खेळात फ्रान्समधील स्थलांतरित गुणवत्तेला रोखणे शक्‍य झालेले नाही. मैदानावर वंशवादास अजिबात स्थान नाही, मैदानावर फक्त प्रतिभा आणि कौशल्य श्रेष्ठ ठरते हे या खेळाडूंनी सिद्ध केलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मैदानावर खेळताना खेळाडू गौरवर्णीय किंवा कृष्णवर्णीय नसतो, तर तो पक्का ‘फ्रेंच’ असतो. यशासाठी आसुसलेला...

एम्बापे ठरला ‘फाइंड’ 
रशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाचा लुका मॉड्रिच याला सर्वोत्तम खेळाडूचा ‘गोल्डन बॉल’ मिळाला, सर्वाधिक सहा गोल केल्यामुळे इंग्लंडचा हॅरी केन ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला. मात्र या स्पर्धेत सर्वाधिक लक्ष वेधले ते फ्रान्सच्या १९ वर्षीय किलियन एम्बापे याने. आफ्रिकन वंशाचा हा अफाट नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला स्ट्रायकर. प्रशिक्षक देशाँप याने या युवा आघाडीपटूवर भरवसा ठेवला, त्याने विश्‍वास सार्थ ठरवत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब पटकाविला. एम्बापेने ही स्पर्धा संस्मरणीय ठरविली. १९५८ साली ब्राझीलने स्वीडनला ५-२ फरकाने हरवून विश्‍वकरंडक जिंकला होता. तेव्हा ब्राझीलसाठी गोल केलेल्या पेले याचे वय होते १७ दिवस व २४९ दिवस. रशियातील अंतिम लढतीत फ्रान्सच्या क्रोएशियाविरुद्ध विजयात किलियन एम्बापेने संघाचा चौथा गोल केला तेव्हा तो १९ वर्षे व २४९ दिवसांचा होता. विश्‍वकरंडक इतिहासात अंतिम लढतीत गोल करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा युवा खेळाडू ठरला. स्पर्धेच्या कालावधीत एम्बापेचा मैदानावरील सुसाट धाव, त्याचा जबरदस्त वेग, चेंडूवरील अफलातून नियंत्रण आणि गोल करण्याचे असामान्य कसब या बाबींची चांगलीच चर्चा झाली. त्याने व ग्रीझमन यांनी प्रतिस्पर्धी बचावफळीच्या उरात धडकी भरवणारी कामगिरी केली. १५ जून रोजी कझान अरेनावर एम्बापेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत विश्‍वकरंडक पदार्पण केले, तेव्हा त्याचे वय १९ वर्षे १७८ दिवस होते, त्यानंतर पेरुविरुद्ध त्याने निर्णायक विजयी गोल केला तेव्हा तो १९ वर्षे १८३ दिवसांचा होता. विश्‍वकरंडकात कमी वयात पदार्पण व गोल हे दोन्ही विक्रम फ्रेंच फुटबॉलमध्ये त्याच्या नावे नोंदीत झाले. पेले यांनी लहान वयात जागतिक फुटबॉलमध्ये ठसा उमटविला, त्यानंतर ते महानतेच्या ‘एव्हरेस्ट’वर पोचले व अजूनही उच्च शिखरावर कायम आहेत. पेले यांच्याशी इतक्‍यातच एम्बापेची तुलना करणे खूपच अतिशयोक्तीचे, मात्र १९व्या वर्षी विश्‍वकरंडक गाजवून या नवोदिताने लक्ष वेधताना अपेक्षाही उंचावल्या आहेत.

रशियातील विश्‍वकरंडकात फ्रान्स
साखळी फेरी (गट क)
    वि. वि. ऑस्ट्रेलिया २-१, गोल ः अँतोईन ग्रीझमन व अझिझ बेहिच (स्वयंगोल)
    वि. वि. पेरू १-०, गोल ः किलियन एम्बापे 
    बरोबरी वि. डेन्मार्क ०-०
‘राउंड ऑफ १६’
    वि. वि. अर्जेंटिना ४-३, गोल ः अंतोईन ग्रीझमन, बेंजामिन पावार्द, किलियन एम्बापे (२)
उपांत्यपूर्व फेरी
    वि. वि. उरुग्वे २-०, गोल ः राफेल व्हरान, अंतोईन ग्रीझमन
उपांत्य फेरी
    वि. वि. बेल्जियम १-०, गोल ः सॅम्युएल उमटिटी
अंतिम फेरी
    वि. वि. क्रोएशिया ४-२, गोल ः मारिओ मांडझुकिच (स्वयंगोल), अंतोईन ग्रीझमन, पॉल पोग्बा, किलियन एम्बापे

    एकूण सामने ः ७, विजय ः ६, बरोबरी ः १
    सर्वाधिक गोल ः प्रत्येकी ४, अँतोईन ग्रीझमन व किलियन एम्बापे
विश्‍वकरंडक इतिहासात फ्रान्स

 •      विजेता    १९९८, २०१८
 •      उपविजेता    २००६
 •      तृतीय स्थान    १९५८, १९८६
 •      चौथा क्रमांक    १९८२
 •      उपांत्यपूर्व फेरी    १९३८, २०१४
 •      ‘राउंड ऑफ १६’    १९३४
 •      पहिली फेरी    १९३०, १९५४, १९६६, १९७८, २००२, २०१०

आकडेवारीत रशियातील विश्‍वकरंडक

 •      एकूण देश    ३२, सामने ः ६४
 •      गोल     १६९, सरासरी ः २.६४
 •      पेनल्टी गोल     २२, स्वयंगोल ः १२
 •      यलो कार्डस     २१९, रेड कार्डस ः ४
 •      सर्वाधिक गोल     हॅरी केन (इंग्लंड) ६

वैयक्तिक विजेते

 •      गोल्डन बूट      हॅरी केन (इंग्लंड)
 •      गोल्डन बॉल      लुका मॉड्रिच (क्रोएशिया)
 •      गोल्डन ग्लोव्ह      थिबौट कुर्टोईस (बेल्जियम)
 •      उत्कृष्ट युवा      किलियन एम्बापे (फ्रान्स)

उल्लेखनीय विश्‍वकरंडक स्पर्धा
व्हीएआर तंत्रज्ञानाचा ठसा!
रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रथमच व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर झाला. मैदानावरील रेफरींसाठी ते वरदानच ठरले. पेनल्टी गोल, हॅंडबॉल, ऑफसाईड सारख्या नेहमीच वादाचे केंद्र ठरणाऱ्या बाबींसाठी रेफरींना ‘व्हीएआर’ने मदतीचा हात दिला. सुरवातीस वेळ वाया जातो म्हणून नाके मुरडली गेली, पण नंतर हेच तंत्रज्ञान ‘सुपरहिट’ ठरले. ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनीही या तंत्रज्ञानाचे वारेमाप कौतुक केले. ‘व्हीएआर’मुळे मैदानावरील फुटबॉलमध्ये पारदर्शकता, प्रामाणिकपणा व शिस्त आली हे त्यांचे म्हणणे योग्य ठरते. स्पर्धेत १६ वेळा चुकीचे निर्णय बदलले गेले. फक्त चार वेळा रेड कार्ड दाखविण्यात आले. ‘फिफा’च्या अध्यक्षांच्या ‘थम्प्स अप’मुळे जागतिक फुटबॉलमध्ये ‘व्हीएआर’चे वास्तव्य वाढणार हे स्पष्ट आहे. ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाचा रशियातील विश्‍वकरंडक स्पर्धेत उरुग्वेचे रेफरी आंद्रेस कुन्हा यांनी सर्वप्रथम वापर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कझान येथे त्यांनी ‘रिव्ह्यू’नंतर फ्रान्सला पेनल्टी फटका दिला व या निर्णयानंतर गोल करणारा अँतोईन ग्रीझमन हा विश्‍वकरंडकातील पहिला खेळाडू ठरला.  

‘सेट पीस’चे प्राबल्य
रशियातील विश्‍वकरंडाकत ‘सेट पीस’ गोलांचे प्राबल्य दिसले. अंतिम फेरीपूर्वी ‘सेट पिसेस’द्वारे ७० गोल झाले. अंतिम लढतीत फ्रान्सचे पहिले दोन गोल हे ‘सेट पीस’ची परिणती होती. थेट फ्री-किक, थ्रो-ईन, फ्री-किक, पेनल्टी, कॉर्नर याद्वारे होणार गोल हे ‘सेट पीस’ ठरतात. रशियात ‘सेट पीस’ गोलचा नवा विक्रम ठरला. यापूर्वी २००२ मध्ये ३५ गोल ‘सेट पीस’वर झाले होते. 

वयस्कर फुटबॉलपटू
इजिप्तचा गोलरक्षक एस्साम एल-हादरी हा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा सर्वांत वयस्क फुटबॉलपटू ठरला. व्हॉल्गोग्राड येथे सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यासाठी तो मैदानात उतरला, तेव्हा त्याचे वय ४५ वर्ष १६१ दिवस इतके होते. त्याने कोलंबियाचा गोलरक्षक फारीद मोंड्रेगॉन याचा विक्रम मोडला. २०१४ मध्ये ब्राझीलमधील विश्‍वकरंडकात मोंड्रेगॉन खेळला, तेव्हा त्याचे वय ४३ वर्षे ३ दिवस इतके होते.

सर्वाधिक स्वयंगोल
रशियातील विश्‍वकरंडकात सर्वाधिक १२ स्वयंगोलांची नोंद झाली. हा नवा विश्‍वकरंडक विक्रम ठरला. यापूर्वी १९९८ मध्ये फ्रान्समधील स्पर्धेत सहा स्वयंगोल झाले होते. रशियातील स्पर्धेत पहिला स्वयंगोल मोरोक्कोच्या अझिझ बौहद्दौझ याने इराणविरुद्ध नोंदविला. अंतिम लढतीत प्रथमच स्वयंगोल क्रोएशियाच्या मारिओ मांडझुकिच याच्याकरवी झाला. रशियाच्या सर्जी इग्नाशेविच याने स्पेनविरुद्धच्या ‘राउंड ऑफ १६’ सामन्यात स्वयंगोल केला. त्यावेळी त्याचे वय ३८ वर्षे ३५२ दिवस होते. विश्‍वकरंडकात स्वयंगोल करणारा तो सर्वांत वयस्क फुटबॉलपटू ठरला.

फोटो फीचर

संबंधित बातम्या