चिमुकला ‘ग्रॅंडमास्टर’ प्रज्ञानंद

किशोर पेटकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

क्रीडांगण

भारताचा माजी बुद्धिबळ जगज्जेता ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याला आदर्श मानणारा आर. प्रज्ञानंद याने देशातील सर्वांत युवा ग्रॅंडमास्टर बनण्याचा पराक्रम केला. इटलीतील स्पर्धेत खेळताना चेन्नईच्या या मुलाने ग्रॅंडमास्टर किताबासाठी आवश्‍यक तिसरा नॉर्म मिळविला, त्यावेळी ‘प्रग्गू’ या टोपणनावाने परिचित असलेला हा आठव्या इयत्तेतील मुलगा १२ वर्षे १० महिने व १३ दिवसांचा होता. जागतिक बुद्धिबळात तो दुसऱ्या क्रमांकाचा युवा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू बनला. रशियाचा सर्जी कर्जाकिन हा जगातील सर्वांत युवा ग्रॅंडमास्टर आहे. १२ वर्षे ७ महिन्यांचा असताना रशियन खेळाडू ग्रॅंडमास्टर बनला होता. प्रज्ञानंदने या वर्षी १० मार्चपूर्वी तिन्ही नॉर्म मिळविले असते, तर विक्रम त्याच्या नावावर आला असता, पण हा प्रतिभाशाली बुद्धिबळपटू विक्रमासाठी खेळला नाही. त्याचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांच्यानुसार, बुद्धिबळ खेळताना प्रग्गूला निकालाची चिंता नसते, प्रत्येक चालीचे विश्‍लेषण करूनच तो पुढील चाल रचतो. या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात प्रग्गूने ग्रॅंडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब केले. प्रज्ञानंदने अपेक्षा उंचावल्या आहेत, बुद्धिबळातील जाणकारांना त्याच्या गुणवत्तेने प्रभावित केले आहे. यामध्ये ग्रॅंडमास्टर सुझान पोल्गर हिचाही समावेश आहे. अमेरिकेतील वेबस्टर विद्यापीठातील ‘सुझान पोल्गर इन्स्टिट्यूट ऑफ चेस एक्‍सलन्स’ने प्रग्गूच्या बुद्धिबळातील प्रगतीची दखल घेत त्याला सुमारे सत्तर लाख रुपयांची शिष्यवृत्ती ‘ऑफर’ केली होती.

बुद्धिबळातील तल्लख ‘मेंदू’
प्रज्ञानंदचे वडील रमेशबाबू हे बॅंकर. आई नागलक्ष्मी या गृहिणी. पालकांनी लहानग्या प्रग्गूस बुद्धिबळ खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्याची मोठी बहीण वैशाली बुद्धिबळ खेळायची. ती माजी जागतिक युवा विजेती आहे. बहिणीला कोड्यात टाकणाऱ्या चाली रचत प्रग्गूची आगेकूच सुरू झाली. २०१३ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत ८ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. या कामगिरीमुळे त्याला ‘फिफा’कडून फिडे मास्टर किताबाची प्राप्ती झाली. त्यानंतर जागतिक स्पर्धेत तो १० वर्षांखालील गटातही विजेता ठरला. २०१६ मध्ये त्याने संस्मरणीय कामगिरी नोंदविली. १० वर्षे, १० महिने आणि १९ दिवसांचा असताना तो इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू बनला. हा किताब मिळविणारा तो जगातील सर्वांत युवा बुद्धिबळपटू ठरला. 
प्रज्ञानंदने तल्लख बुद्धीच्या बळावर लक्ष वेधण्यास सुरवात केली. खेळातील सातत्य हे त्याचे वैशिष्ट्य. ग्रॅंडमास्टर बनण्याची प्रग्गूची मोहीम गतवर्षी सुरू झाली. नोव्हेंबर २०१७ मध्ये जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ग्रॅंडमास्टर किताबाचा पहिला नॉर्म मिळविला. त्यानंतर यावर्षी एप्रिलमध्ये ग्रीसमधील स्पर्धेत त्याने ग्रॅंडमास्टरचा दुसरा नॉर्म मिळवून स्वप्नपूर्तीच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. २३ जून रोजी इटलीतील उर्तिएल येथे झालेल्या स्पर्धेच्या आठव्या फेरीत लुका मोरोनी यास हरवून ग्रॅंडमास्टरच्या तिसऱ्या नॉर्मवर शिक्कामोर्तब केले. सध्याचा बुद्धिबळ जगज्जेता मॅग्नस कार्लसन १३ वर्षे ४ महिन्यांचा असताना ग्रॅंडमास्टर बनला. विश्‍वनाथन आनंदला ग्रॅंडमास्टर किताब धारण करण्यासाठी १८व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. तुलनेत प्रज्ञानंदची वाटचाल वेगाने झाली. 

एलो मानांकनात प्रगती
प्रज्ञानंदने यावर्षी मे महिन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन नोंदविले. त्याने ‘फिडे’च्या मानांकनात २५२९ एलो गुणांचा टप्पा गाठला. बुद्धिबळ पटावर अनुभवी खेळाडूशी दोन हात करताना प्रग्गू गांगरून जात नाही. ग्रॅंडमास्टर किताबाची पूर्तता करताना त्याला वयाने आणि अनुभवाने सरस असलेल्या खेळाडूंचा सामना करावा लागला. चिमुकला प्रग्गू डगमगला नाही. अफलातून चाली रचत त्याने प्रतिस्पर्ध्यांचा बचाव विस्कटून टाकला. प्रज्ञानंदच्या अनन्यसाधारण बुद्धिमत्तेची दखल साऱ्यांनीच घेतलेली आहे. विश्‍वनाथन आनंदने भारताच्या युवा बुद्धिबळपटूचे ‘ग्रॅंडमास्टर क्‍लब’मध्ये स्वागत करताना मुक्तकंठाने कौतुक केले.

युवा ग्रॅंडमास्टर प्रज्ञानंद

  •      जन्म ः १० ऑगस्ट २००५, चेन्नई
  •      सर्वांत युवा इंटरनॅशनल मास्टर
  •      ग्रॅंडमास्टर बनलेला सर्वांत युवा भारतीय, जगात दुसरा
  •      जागतिक बुद्धिबळातील ८ व १० वर्षांखालील माजी विजेता

संबंधित बातम्या