आश्‍वासक प्रगती!

किशोर पेटकर
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

क्रीडांगण
 

डोनेशियातील जाकार्ता व पलेमबंग शहरात रंगलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे जंबो पथक रवाना झाले होते. प्रारंभिक आकडेवारीनुसार, खेळाडू होते ५७२, त्यात पुरुष ३१२ आणि महिला २६०. याशिवाय अधिकारी, प्रशिक्षक व इतर मिळून आकडा होता ८०४.  चाळीस खेळातील ३६ प्रकारामध्ये भारताचा सहभाग होता. या आकडेवारीत भारत ४५ देशांच्या या स्पर्धेत किती पदके जिंकणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. एशियाड ही ऑलिंपिकनंतरची जागतिक ‘मल्टिस्पोर्टस’मधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी स्पर्धा. भारतीयांचे लक्ष जाकार्ता व पलेमबंगमधील भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीकडे होते. भारतीयांनी पदके जिंकावीत ही सदिच्छा होती. मागील कामगिरीची तुलना करता, यंदा आश्‍वासक प्रगती दिसली. १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० ब्राँझची मोट बांधून एकूण ६९ पदके भारताच्या खात्यात जमा झाली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. सुवर्णपदकांच्या बाबतीत भारताने १९५१ मधील कामगिरीशी बरोबरी साधली. तेव्हा दिल्लीत यजमानांनी १५ सुवर्णपदकांची कमाई केली होती. प्रथमच जास्त प्रमाणात रौप्यपदके मिळाली. एकूण संख्येचा विचार करता यंदा आलेख उंचावलेला दिसला. १९९० मध्ये भारताला फक्त पुरुष कबड्डीतील सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर मात्र कामगिरी सुधारलेली दिसते. २०१० मध्ये ग्वांग्झू येथे भारताने १४ सुवर्णपदके जिंकली, २०१४ मध्ये ही संख्या ११ वर आली, तरीही क्रीडापटूंची मेहनत दिसत होती. भारतात खेळ म्हटले, की फक्त क्रिकेट ही स्थिती आता बदलत आहे. या जिगरबाज क्रीडापटूंना लोकाश्रयाची अधिकाधिक गरज आहे. केंद्र सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मदत करणाऱ्या इतर स्वयंसेवी  संस्था यांचे ऑलिंपिक खेळातील क्रीडापटूंना साह्य मिळते, ही सकारात्मक बाब आहे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता देणाऱ्या पुरस्कर्त्यांची रीघ या क्रीडापटूंच्या घरासमोर लागल्यास कदाचित आणखी आठ वर्षांनी भारत एशियाडमध्ये ३० सुवर्णपदके जिंकू शकेल.

ॲथलेटिक्‍समध्ये सर्वाधिक पदके
अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मैदानी खेळात, म्हणजे ॲथलेटिक्‍समध्ये सर्वाधिक १९ पदके जिंकली. सात सुवर्ण, दहा रौप्य, दोन ब्राँझपदकांची कमाई भारतीयांनी केली. पश्‍चिम आशियातील बहारीनने आफ्रिकन वंशाच्या ॲथलिट्‌सना ट्रॅकवर उतरविले नसते, तर कामगिरी याहून उजवी ठरली असती. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारांत भारताने आतापर्यंत २४० पदके जिंकली आहेत. चार वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे ॲथलेटिक्‍समधील सुवर्णपदकांची संख्या होती फक्त दोन. चार वर्षांनंतर सोनेरी पदकांची संख्या पाचने वाढली. हे चित्र खरोखरच आशादायी आहे. जागतिक पातळीवर नसले, तरी किमान आशियात आपले ॲथलिट्‌स अव्वल ठरताहेत ही अभिमानास्पद बाब आहे. चिनी, जपानी, कोरियन, तसेच पश्‍चिम आशियाई बहारीन, कतार या देशांतील क्रीडापटूंना कणखरपणे आव्हान देण्याचे धैर्य भारतीयांना प्राप्त झाले आहे. वीस वर्षांचा नीरज चोप्रा याच्या हातून सुटणारा भाला असाच सुसाट अंतर कापत आहे, कदाचित दोन वर्षांनंतर टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ॲथलेटिक्‍समधील पदक मिळू शकते. जाकार्ता येथे त्याने ८८.०६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला. अठरा वर्षांची आसामी मुलगी हिमा दास हिने वेगाने धावण्यास सुरवात केली आहे. ४०० मीटरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत तिने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. मानहानी, अपमान या साऱ्यांवर विजय मिळवून नव्या आत्मविश्‍वास ट्रॅकवर आलेल्या द्यूती चंद हिची दोन रौप्यपदकांची धावही कौतुकास्पद आहे. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे. त्या मापाचे ‘शूज’ मिळत नाही. नेहमीचे ‘शूज’ घालून खेळायचे झाल्यास असह्य वेदना पाचवीला पुजलेल्या. तरीही अत्यंत गरिबीतून आलेल्या बंगाली स्वप्ना बर्मन हिने हार मानली नाही. सात क्रीडाप्रकारांचा समूह असलेल्या हेप्टॅथलॉनमध्ये तिने भारताला पहिलेच सुवर्णपदक जिंकून दिले. वडील कर्करोगाशी झुंज देत इस्पितळात झोपलेले, पण मुलगा डगमगला नाही. तजिंदरपालसिंग तूर याने जबरदस्त त्वेषाने २०.७५ मीटरवर गोळा फेकत स्पर्धा विक्रमासह अजिंक्‍यपद प्राप्त केले. मनजीत सिंग, अरपिंदर सिंग, जिन्सन जॉन्सन या हरहुन्नरी क्रीडापटूंनी एशियाडच्या ट्रॅक अँड फिल्डमध्ये दीर्घ कालावधीनंतर भारताला सुवर्णपदक मिळवून दिली. महिला रिले संघानेही प्रबळ धावपटूंना मागे टाकले. ॲथलेटिक्‍सकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता नक्कीच बदलू शकतो. भारतीय ॲथलिट्‌स कमजोर नाहीत. त्यांना फक्त प्रोत्साहन आणि शास्त्रोक्त प्रशिक्षण आवश्‍यक आहे. 

रॅकेट खेळात खाते उघडले
एशियाडमध्ये महिला बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी रॅकेट खेळांत यापूर्वी भारताला पदके मिळाली नव्हती. इंडोनेशियातील चित्र बदलले. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत एक रौप्य व एक ब्राँझपदक मिळाले. पी. व्ही. सिंधूने रौप्य जिंकले. सिंधूचे कौतुक व्हायलाच हवे. एशियाडमधील बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीत खेळणारी ती पहिली भारतीय ठरली. वय वाढत आहे, परंतु साईना नेहवालची जिगर कमी झालेली नाही.  हेच तिच्या ब्राँझपदकातून दिसून येते. पदकाचा रंग कोणताही असो, ते प्राप्त करण्यासाठी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे ठरतात. टेबल टेनिसमध्ये भारतीयांनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केले, एशियाडमध्ये आव्हान प्रबळ होते, तरीही दोन ब्राँझपदके मिळाली. पुरुषांनी सांघिक गटात, तर मिश्र गटात अनुभवी अचंता शरथ कमल व मणिका बत्रा यांनी ब्राँझची कमाई केली. मणिका हिने खूपच अपेक्षा उंचावल्या आहेत. बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळांत चीनसह पूर्व आशियाई, तसेच ‘आसियान’ देशांची मत्तेदारी पाहायला मिळतेल. या खेळांत भारतीय डोके वर काढत आहेत ही सुखावणारी बाब आहे.

सळसळते तरुण रक्त
नेमबाजी खेळात भारताने एशियाडमध्ये यश प्राप्त केलेले आहे. यावेळेस सळसळत्या तरुण रक्ताचा जोश पाहायला मिळाला.  सोळा वर्षीय मनू भाकर आणि अनीश भानवाला यांना अपेक्षांचा दबाव झेलता आला नाही, मात्र मेरठच्या शुभम चौधरी व शार्दूल विहान या शालेय मुलांनी पदकांना गवसणी घातली. दोघेही आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलीच मोठी स्पर्धा खेळत होते. सोळा वर्षीय सौरभ १० मीटर एअर पिस्तुलात विजेता ठरला, तर  पंधरा वर्षीय शार्दुल नेमबाजीतील डबल ट्रॅप प्रकारात उपविजेता ठरला. या मुलांची कामगिरी पाहता, देशातील नवी पिढी क्रीडा मैदानावर योग्य दिशेने चालल्याचे जाणवते. विनेश हिने महिला कुस्तीत इतिहास रचला. एशियाडमध्ये विजेती ठरणारी ती कुस्तीतीतल पहिली भारतीय महिला ठरली. कोल्हापूरच्या राही सरनोबत हिनेही नेमबाजीत असाच पराक्रम बजावला. एशियाडमधील विजेती बनलेली ती पहिली भारतीय महिला नेमबाज बनली. 

दुर्लक्षित खेळ, पण...
भारतात काही खेळ दुर्लक्षित आहेत, पण त्यात देशाला पदके मिळू शकतात हे अठराव्या एशियाडमध्ये पाहायला मिळाले. रोईंगमध्ये सेनादलाने ठसा उमटविलेला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज खेळात भारताने सोनेरी पदक मिरविले. ब्रिज हा खेळ पत्त्यांचा, पण बुद्धिकौशल्याचे प्रदर्शन घडविणारा. बुद्धी चातुर्याची या खेळात कसोटी लागते. वयाचे अजिबात बंधन नसले. दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या जोडीतील प्रणब बर्धन साठ वर्षांचा खेळाडू. एशियाडमध्ये सोनेरी पदक मिळविणारा तो सर्वांत ‘ज्येष्ठ’ खेळाडू ठरला. व्हॉलिबॉलसारखा खेळ, पण पायाने खेळणाऱ्या सेपॅकटॅकरो हा भारतीयांसाठी एकदम नवखा खेळ, त्यात भारताला ब्राँझपदक मिळाले. मार्शल आर्टसमधील कुराश या कुस्तीसाधर्म्य खेळात, तसेच वुशूमध्येही भारताला पदके मिळाली. सर्वसामान्यांसाठी हे खेळ नावीन्यपूर्ण. अश्‍वारोहणात ही भारताचा झेंडा फडकला. नौकानयनात महिलांनी न्यायालयीन लढाईनंतर पदक जिंकून वाहव्वा मिळविली. 

हुकलेली संधी आणि निराशा
सुखावणारी, समाधान देणारी कामगिरी भारतीयांनी एशियाडमध्ये करून दाखविली, त्याचवेळी काही खेळांत पदरी निराशाही आली. संधी हुकली. भारतीय मातीत मोठा झालेल्या कबड्डीतील अपयश दारुण ठरले. कदाचित कबड्डीपटूंचा अतिआत्मविश्‍वास पुरुष व महिला कबड्डीपटूंना भोवला असावा. या खेळात इराणी व कोरियन कबड्डीपटूंनी साधलेली प्रगती भारतीयांना झोपेतून जागे करणारी आहे. १९९० पासून नेहमी सोनेरी यश मिळविणारे भारतीय कबड्डीपटू प्रथमच हा मान मिळवू शकले नाहीत. हॉकीतही सुवर्णपदकाने दिलेली हुलकावणी सलणारी ठरली. महिलांनी अंतिम फेरी गाठली, तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून पुरुषांनी मिळविलेले ब्राँझपदक हे भळभळत्या जखमेवरील थोडीफार मलमपट्टी ठरले. बॉक्‍सिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले, तरीही पोकळी दिसली. कुस्तीत ऑलिंपिकमधील बहुपदक विजेता सुशील कुमार, रिओ ऑलिंपिकमधील पदक विजेती साक्षी मलिक यांना अपेक्षापूर्ती करता आली नाही. कुस्तीत फ्रीस्टाईल प्रकारात भारतीय यशस्वी ठरतात. ही परंपरा बजरंग पुनियाने पुरुषांत, तर विनेश फोगट हिने महिलांत राखली. कुस्तीत तुलनेत कमी सुवर्णपदके मिळाली, त्यामुळे कुस्तीगिरांनी आणखी मेहनत घेणे आवश्‍यक असल्याचे जाणवले. हे डोळ्यातील अंजन ठरावे. जेणेकरून ऑलिंपिकपर्यंत संबंधित सावध होतील. पुरुष बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांत मानांकनास न्याय देऊ शकला नाही. टेनिसमधील पुरुष दुहेरीत दबदबा राहिला, परंतु एकेरीत अजून खूप मजल मारायची आहे. यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्णांसह नऊ पदके मिळाली होती, मात्र एशियाडमध्ये या खेळात एकही पदक मिळू नये ही नामुष्कीच ठरली. तिरंदाजीत कमांऊंड प्रकारात पुरुष व महिलांना रौप्यपदक मिळाले. पुरुषांचे सुवर्णपदक शूटआऊटमध्ये अगदी थोडक्‍यात हुकले. ही कामगिरी सुखावणारी असली, तरी रिकर्व्ह प्रकारात पदक मिळू शकले नाही. रोईंग या खेळात भारतीयांनी अपेक्षा उंचावल्या आहेत. सिंगल स्कलमध्ये दत्तू भोकनाळ याला ऐनवेळी प्रकृतीने दगा दिला, पण त्याचा समावेश असलेल्या संघाने क्वाड्रपल स्कल्स प्रकारात विजयी झेंडा रोवला. 

संबंधित बातम्या