‘आयर्नमॅन’ जेरेमी

किशोर पेटकर
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

क्रीडांगण
 

अर्जेंटिनातील व्यूनॉस आयर्स येथे झालेल्या तिसऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा याची कामगिरी ऐतिहासिक ठरली. या स्पर्धेच्या इतिहासात देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू हा मान जेरेमीला मिळाला. मिझोराममध्ये जन्मलेला जेरेमी हा अवघ्या १५ वर्षांचा आहे. त्याची वेटलिफ्टिंगमधील नैसर्गिक गुणवत्ता, वजन उचलण्याची क्षमता आणि प्रतिभा यामुळे त्याला वेटलिफ्टिंगमधील भारताचा संभाव्य ‘स्टार’ मानले जाते. जेरेमीने पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात एकत्रित २७४ किलो वजन उचलून साऱ्यांनाच स्तिमित केले. त्याच्या ताकदीसमोर तुर्कस्तानचा तोप्तास कॅनेर, तसेच कोलंबियाचा व्हिलार एस्तिव्हेन हे वेटलिफ्टर फिके ठरले. तुर्कस्तानच्या वेटलिफ्टरपेक्षा जेरेमीने ११ किलो वजन जास्त पेलले. भारतातील क्रीडापटूंची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावत आहे. जाकार्ता-पलेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीयांनी जास्त पदके जिंकली. आता युवा ऑलिंपिक पातळीवरही सर्वोत्तम कामगिरी भारतीय क्रीडापटूंनी नोंदीत केली आहे. जेरेमीच्या गुणवत्तेची योग्य जोपासना झाल्यास त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. वेटलिफ्टिंगमध्ये काहीवेळा उत्तेजक द्रव्य सेवनाच्या विळख्यात कारकीर्द मातीमोल होते. जेरेमीची वाटचाल शिस्तबद्ध आणि प्रामाणिक राहिल्यास, कदाचित ऑलिंपिक वेटलिफ्टिंगमध्येही भारताला पदक मिळू शकेल.

कामगिरी उत्साहवर्धक
जेरेमीने ब्यूनॉस आयर्सला एकूण २७४ किलो वजन उचलून कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित केली. याचवर्षी त्याने पतियाळा येथील स्पर्धेत एकत्रित २७३ किलो वजनाची नोंद केली होती. या वर्षी सुरवातीस त्याने २५१ किलो वजन उचलल्यानंतर आश्‍वासक प्रगती साधलेली आहे. युवा ऑलिंपिक स्पर्धेत आपण पदक जिंकू, तसेच २६३ किलो वजनाचा टप्पा गाठू हा विश्‍वास जेरेमीने ब्यूनॉस आयर्सला जाण्यापूर्वी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याने स्पर्धेत अकरा किलो वजन जास्त उचलून तयारी योग्य दिशेने होती हे सिद्ध केले. 

जेरेमीची ही ‘ज्युनियर’ कामगिरी भारताच्या ‘सीनियर’ वेटलिफ्टर्सना मागे टाकणारी 
आहे. १५व्या वर्षी त्याने १८ वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेत २७४ किलो वजन उचलले. या वर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगच्या ६२ किलोगटात भारताचा ‘सीनियर’ वेटलिफ्टर राजा मुथूपांडी याने एकत्रित २६६ किलो वजन उचलून सहावा क्रमांक मिळविला होता. जेरेमीच्या कारकिर्दीची नुकतीच सुरवात आहे. ज्युनियर असल्यामुळे राष्ट्रकुल, तसेच आशिया क्रीडा स्पर्धेसाठी त्याचा विचार झाला नव्हता, ब्यूनॉस आयर्समधील कामगिरीमुळे जेरेमीला टोकियो, नंतर लॉस  एंजलिसमधील ऑलिंपिकसाठी आशास्थान मानले जात आहे.

बॉक्‍सिंग ते वेटलिफ्टिंग
जेरेमी हा प्रारंभी वेटलिफ्टर नव्हता, तो बॉक्‍सर होता. मजबूत शरीरयष्टी ही त्याची नैसर्गिक गुणवत्ता. ऐजॉलमधील शालेय जीवनात तो वडिलांच्या बॉक्‍सिंग अकादमीत नियमित सराव करत असे. त्याचे वडील लाल्नेहत्लुआंगा हे राष्ट्रीय पातळीवरील माजी पदक विजेते बॉक्‍सर. जेरेमी आठ वर्षांचा असताना त्याच्या बॉक्‍सिंग सरावात खंड पडला. आर्थिक कारणास्तव वडिलांना अकादमीचा भार पेलवला नाही. मात्र जेरेमीची क्रीडा गुणवत्ता कोमेजली नाही. वडिलांनी त्याला वेटलिफ्टिंग खेळात आणले. याच कालावधीत त्याची उपजत गुणवत्ता सेनादल क्रीडा संस्थेने हेरली व जेरेमीस योग्य दिशा गवसली. सेनादलाच्या पुण्यातील क्रीडा अकादमीत त्याचा वेटलिफ्टिंगमधील 
नियमित सराव सुरू झाला. जेरेमीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्युनियर बॉक्‍सिंग स्पर्धांत पदके जिंकली. ‘खेलो इंडिया’ शालेय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्तीनंतर जेरेमी केंद्र सरकारच्या ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम’ (टॉप्स) या योजनेचा भाग बनला. पतियाळा येथील राष्ट्रीय वेटलिफ्टिंग शिबिरात नामवंत वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जेरेमी प्रभावी कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो.

पदकविजेता वेटलिफ्टर जेरेमी
 युवा ऑलिंपिक, २०१८ ः सुवर्णपदक
 जागतिक युवा वेटलिफ्टिंग, २०१६ व २०१७ ः रौप्यपदक
 आशियाई व राष्ट्रकुल युवा स्पर्धेतही पदके
 

संबंधित बातम्या