ली चाँग वेईचा कर्करोगास स्मॅश... 

किशोर पेटकर
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

मलेशियाचा मातब्बर बॅडमिंटनपटू ली चाँग वेई पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकल्यानंतर या ३६ वर्षीय खेळाडूने जुलैमध्ये मलेशियन ओपन स्पर्धा बाराव्यांदा जिंकली. मात्र त्यानंतर त्याला श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला आणि अखेरीस नाकाच्या कर्करोगाचे निदान झाले. हा माजी जागतिक अव्वल बॅडमिंटनपटू जिगरबाज आहे. कर्करोगाने नाव ऐकून तो डगमगला नाही. पुनरागमनाची आस बाळगून उपचारांना सामोरा गेला. नाकाचा कर्करोग प्राथमिक स्तरावर होता, त्यामुळे तैवानमधील उपचार सकारात्मक ठरले. आता ली चाँग वेई पुन्हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर उतरण्याची मनीषा बाळगून आहे. या प्रतिभाशाली बॅडमिंटनपटूने त्याला पोखरू पाहणाऱ्या कर्करोगास जबरदस्त स्मॅश लगावत नामोहरम केले आहे. ली चाँग वेईचे आजारानंतरचे पुनरागमन लक्षणीय असेल. हा तीन वेळचा ऑलिंपिक रौप्यपदक विजेता नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांत खेळण्याचे संकेत आहे. यशस्वी उपचारानंतर तो पुन्हा भन्नाट खेळेल का या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी निश्‍चितच थांबावे लागेल. एक मात्र खरे, मलेशियाच्या अव्वल पुरुष बॅडमिंटनपटूने अचाट इच्छाशक्तीचे प्रदर्शन घडविले आहे. 

रुपेरी पदकावर समाधान 
ऑलिंपिक आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ली चाँग वेई याला सुवर्णपदकाने नेहमीच हुलकावणी दिली, दोन्ही स्पर्धांत तो प्रत्येकी तीन वेळा उपविजेता ठरला. हुकलेले जागतिक आणि ऑलिंपिक सुवर्णपदक हे त्याचे लक्ष्य आहे. पुनरागमनाची तयारी करताना आवश्‍यक स्टॅमिना प्राप्तीसाठी त्याला खूपच मेहनत घ्यावी लागेल. उपचारामुळे मलेशियन बॅडमिंटनपटूस सुमारे पाच महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले आहे. २०१४ मध्ये उत्तेजक द्रव्य चाचणी सेवनात तो दोषी ठरल्याने त्याचे निलंबन झाले होते. नंतर सखोल चौकशी होऊन बंदी असलेले द्रव्य अनवधानाने सेवन केल्याचे सिद्ध झाले आणि त्याचे निलंबन मागे घेण्यात आले. पण २०१४ मध्ये जिंकलेल्या जागतिक स्पर्धेतील रौप्यपदकावर त्याला पाणी सोडावे लागले. १ मे २०१५ रोजी पुनरागमन केल्यानंतर ली चाँग वेई याने जिद्दीने खेळ केला, मात्र ऑलिंपिक आणि जागतिक सुवर्णपदकाने त्याला गुंगारा दिला. रिओ ऑलिंपिकमध्ये चीनचा चेन लाँग त्याला भारी ठरला, तर त्यापूर्वी जाकार्ता येथील जागतिक स्पर्धेतही चेन लाँग याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. 

ऑलिंपिकचा ध्यास 
कर्करोग उपचारांना योग्य प्रतिसाद देत असताना ली चाँग वेई याचे जागतिक क्रमवारीत मानांकन मात्र घसरले. जुलैमधील इंडोनेशियन ओपन स्पर्धेनंतर तो स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळलेला नाही. सध्या तो जागतिक क्रमवारी पंधराव्या स्थानी आहे. टोकियो येथे २०२० साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा खेळण्याचा ली चाँग वेईचा ध्यास आहे. पुढील वर्षी १ मेपासून ऑलिंपिक पात्रता स्पर्धा सुरू होईल, तोपर्यंत हा अनुभवी बॅडमिंटनपटू कर्करोगास पूर्णपणे हरवून एकदम तंदुरुस्त ठरण्याचा विश्‍वास मलेशिया बॅडमिंटन संघटनेने व्यक्त केला आहे. ऑलिंपिक पात्रतेपूर्वी, ली चाँग वेई मार्च महिन्यात ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत खेळण्याचे संकेत आहेत. ली चाँग वेई याने चीनचा महान बॅडमिंटनपटू लिन डॅन याच्या साम्राज्यास शह दिला. चिनी बॅडमिंटनपटूचे पुरुष एकेरीत वर्चस्व मोडून काढणाऱ्या मलेशियाचा हा ‘लिजंड’ खेळाडू भरात असला, की रोखणे कठीणच. पुरुष बॅडमिंटन एकेरीत मलेशियाला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी हा दिग्गज अजूनही प्रेरित आहे. कर्करोगही त्याला हरवू शकला नाही. ली चाँग वेईची पुढील वाट आव्हानात्मक असेल. जपानचा जागतिक विजेता केंटो मोमोटा, चीनचा शि युकी, तैवानचा चोऊ टीएन-चेन, डेन्मार्कचा व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन, चीनचा चेन लाँग आदी बलाढ्य प्रतिस्पर्धी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर सक्रिय आहेत. त्यामुळे ली चाँग वेई याने आंतरराष्ट्रीय मैदानावर नव्या आत्मविश्‍वासाने सुरुवात करावी लागेल.

‘रौप्य’ विजेता ली चाँग वेई 
  ऑलिंपिक स्पर्धा ः २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन), २०१६ (रिओ) 
  जागतिक स्पर्धा ः २०११ (लंडन), २०१३ (ग्वांग्झू), २०१५ (जाकार्ता)

संबंधित बातम्या