राष्ट्रीय विक्रमवीर शरथ!

किशोर पेटकर
गुरुवार, 17 जानेवारी 2019

क्रीडांगण
 

वयाच्या ३६व्या वर्षीही भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ‘चॅंपियन’ आहे. ८०व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत चेन्नईच्या या हुकमी खेळाडूने नवव्यांदा पुरुष एकेरीत विजेतेपदाचा करंडक उंचावला. या कामगिरीने त्याने भारताचे महान टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांच्या राष्ट्रीय विक्रमास मागे टाकले. गतवर्षी शरथने कमलेश यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. कटक येथे यंदा सहकारी जी. साथीयन याचे कडवे आव्हान मागे टाकत शरथने शिरपेचात मानाचा तुरा खोवला. २००३ मध्ये तो पहिल्यांदा राष्ट्रीय विजेता बनला होता. त्यानंतर त्याने वर्चस्वाचा झेंडा फडकवत ठेवला. नऊ विजेतेपदांबरोबरच तो राष्ट्रीय एकेरीत चार वेळा उपविजेताही आहे. वयाच्या तिशीनंतर त्याचा खेळ आणखीनच बहरला. यंदा सलग तिसऱ्यांदा त्याने राष्ट्रीय विजेतेपदाचा किताब पटकाविला आहे. सध्या शरथ कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. डिसेंबर २०१८ मध्ये त्याने जागतिक क्रमवारीत ३०वा क्रमांक मिळविला. शरथ आणि साथियन यांनी वर्षभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक खेळ केलेला आहे. शरथपाठोपाठ साथियन ३१व्या क्रमांकावर आहे. या दोघा ‘टॉप’ खेळाडूंतील कटक येथील अंतिम लढत चांगलीच उत्कंठावर्धक ठरली. अखेरीस शरथचा अनुभव श्रेष्ठ ठरला. चुरशीच्या लढतीत त्याने ११-१३, ११-५, ११-६, ५-११, १०-१२, ११-६, १४-१२ अशी सात गेममध्ये बाजी मारली.

वर्षभरात अफलातून खेळ
शरथ कमलसाठी २०१८ हे वर्ष सफल ठरले. शरथने गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल, तसेच जाकार्ता-पालेमबंग येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो तीन पदकांचा मानकरी ठरला. पुरुष सांघिक सुवर्णासह साथियनसमवेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले. पुरुष एकेरीत शरथला ब्राँझपदक मिळाले. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी टेबल टेनिसमध्ये पुन्हा पराक्रम बजावला. भारताला दोन ब्राँझपदके मिळाली. शरथचा समावेश असलेल्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत धडक मारत पदकाची कमाई केली, तर मणिका बात्रा हिच्यासह मिश्र दुहेरीत शरथने ब्राँझपदक पटकाविले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत शरथ जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानी होता. डिसेंबरमध्ये त्याने तिसाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. मानांकनातील प्रगतीवरून शरथच्या चमकदार खेळाची कल्पना येते. २०१९ मध्ये त्याने ‘टॉप २०’चे लक्ष्य बाळगले आहे. भारतीय टेबल टेनिसमध्ये शरथ कमल हे नाव ‘लिजंड’ आहे. वाढत्या वयाबरोबरच त्याचा खेळ किमयागार ठरत आहे. जिंकण्याची भूक वाढतच चाललीय. युरोपात व्यावसायिक टेबल टेनिस खेळण्याचा फायदा त्याला होत आहे. शरथने २००६ मध्ये मेलबर्न येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकेरीत आणि सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१० मध्ये त्याने अमेरिकन ओपन व इजिप्त ओपन या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची मान्यता असलेली व्यावसायिक स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. तोच जोश आणि उत्साह अजूनही टिकून आहे.

टोकियो ऑलिंपिकचे लक्ष्य
शरथ कमल २०१६ मधील रिओ ऑलिंपिकमध्ये खेळला. त्याचे आव्हान पुरुष एकेरीत पहिल्याच फेरीत संपुष्टात आले, तरीही जागतिक टेबल टेनिसमधील चढाओढ लक्षात घेता त्याची ऑलिंपिक पात्रता लक्षणीय ठरली. शरथने आता २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित केले आहे. मणिका बात्रासह मिश्र दुहेरीत भारताला पदकाची चांगली संधी असल्याचे त्याला वाटते. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत मणिकासह मिश्र दुहेरीचे ब्राँझपदक जिंकल्यामुळे त्याचा उत्साह दुणावला आहे. मणिकाही चांगला खेळ करत आहे. मिश्र दुहेरीत तिचा शरथसह चांगला समन्वय जुळतो. शरथ २००४ मध्ये अथेन्स ऑलिंपिकमध्ये सर्वप्रथम खेळला होता. सोळा वर्षांनंतर पुन्हा ऑलिंपिकमध्ये खेळण्यास तो प्रेरित आहे.     

संबंधित बातम्या