‘सेव्हन स्टार जोकर’

किशोर पेटकर
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

क्रीडांगण
 

मेलबर्न पार्कवरील हार्ड कोर्टवर यंदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या पुरुष एकेरीत चुरशीची अंतिम लढत अपेक्षित होती. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला स्पेनचा डावखुरा आक्रमक खेळाडू राफेल नदाल जोरदार टक्कर देण्याची अपेक्षा होती, पण तसं काही घडलंच नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या नदालचा ३१ वर्षीय जोकोविचच्या अष्टपैलू खेळासमोर टिकाव लागला नाही. ‘जोकर’ या टोपणनावाने परिचित असलेल्या सर्बियन टेनिसपटूने तीन सेट्‌समध्येच बाजी मारली. अव्वल क्रमांकाच्या या खेळाडूने ६-३, ६-२, ६-३ अशा फरकाने वर्चस्व मिळविले. जोकोविचने आठ बिनतोड सर्व्हिस डागल्या, तर नदालने तीनच वेळा अशी किमया साधली. नदालने टाळता येण्याजोग्या चुकाही बऱ्याच केला. जोकोविचने ‘सेव्हन स्टार’ यश साजरे करताना नॉर्मन ब्रुक्‍स चॅलेंज कप विक्रमी सातव्यांदा जिंकला, तोही एकतर्फी फरकाने. जोकोविचने २००८ मध्ये ज्यो-विल्फ्रेड त्सोंगा याला हरवून सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. नंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्याने हॅटट्रिक साधली. आता तीन वर्षांनंतर त्याने पुन्हा मेलबर्नला करंडक उंचावला. २०१७ मध्ये नोव्हाकचे आव्हान दुसऱ्याच फेरीत आटोपले. त्यानंतर गतवर्षी त्याला चौथी फेरी पार करता आली नाही. या लढवय्या टेनिसपटूने जबरदस्त मुसंडी मारत विक्रमी कामगिरी नोंदविली. 

फेडरर, नदालला मागे टाकणार?
यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपन हे जोकोविचचे १५वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. पीट सॅंप्रासच्या १४ विजेतेपदांना त्याने मागे टाकले आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २० वेळा, तर नदालने १७ वेळा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत बाजी मारली आहे. जोकोविचची पुनरागमनानंतर घोडदौड पाहता, फेडरर आणि नदाल यांची ग्रॅंड स्लॅम कामगिरी धोक्‍यात आहे. हार्ड कोर्टप्रमाणे जोकोविच ग्रास कोर्टवरही खुलून खेळतो. यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये त्याला संधी कमीच असेल, पण विंबल्डनच्या हिरवळीवर तो संभाव्य विजेता असेल. गतवर्षी तो या प्रतिष्ठित स्पर्धेत चौथ्यांदा विजेता ठरला होता. शिवाय अमेरिकन ओपनमध्ये गतविजेतेपद राखण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना जोकोविचने नदालचा १२४ मिनिटांच्या खेळात पाडाव केला. २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकण्यासाठी जोकोविचला नदालने पाच सेट्‌समध्ये तब्बल पाच तास ५३ मिनिटे झुंजविले होते. मात्र यंदा चढाओढ दिसलीच नाही, त्याचे श्रेय जोकोविचच्या सफाईदार खेळास द्यावे लागेल. रॉजर फेडरर आणि रॉय एमर्सन यांनी प्रत्येकी सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आहे, आता जोकोविच तेथील नवा ‘सम्राट’ बनलाय. 

तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना जोकोविचने तंदुरुस्तीचे छान उदाहरण सादर केले. २०१७ मध्ये मेलबर्नला दुसऱ्याच फेरीत गारद झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा झडत होती. दुखापतीमुळे तो अमेरिकन ओपनही खेळू शकला नाही. कोपराच्या वेदनेमुळे त्याची कामगिरी घसरली होती. त्याचे मानांकनही वीस खेळाडूंमधून बाहेर गेले. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता, त्यानंतर वर्षभरापूर्वी त्याने पुनरागमन केले. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चौथ्या, तर फ्रेंच ओपनममध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रगती साधणारा जोकोविच हरवलेला सूर शोधताना दिसला, मात्र नंतर विंबल्डन आणि अमेरिकन ओपनमध्ये त्याचा धडाकेबाज खेळ दिसला. विंबल्डनच्या हिरवळीवर केव्हिन अँडरसनला, तर अमेरिकेतील हार्ड कोर्टवर ज्युआन मार्टिन डेल पोट्रो याला हरविल्यानंतर त्याने आता ओळीने तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. कारकिर्दीत तिसऱ्यांदा त्याने ओळीने तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला आहे.  सलग २१ ग्रॅंड स्लॅम सामन्यांत तो अपराजित आहे.

संबंधित बातम्या