झरीनचा ‘गोल्डन पंच’

किशोर पेटकर
सोमवार, 11 मार्च 2019

क्रीडांगण
 

बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या स्ट्रॅंडा आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने अपेक्षापूर्ती केली. महिलांच्या ५१ किलो वजनगटात ‘गोल्डन पंच’ देताना एकतर्फी विजयासह सुवर्णपदक जिंकले. फिलिपिन्सच्या आयरिश मॅग्नो हिला हरवून झरीनने गतवर्षीची निराशा मागे सारली. २०१८ मधील इंडोनेशियातील आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी तिला निवड चाचणी देता आली नव्हती, त्यामुळे हैदराबादची ही आश्‍वासक बॉक्‍सर काही प्रमाणात निराश झाली होती. मात्र, २०१९ वर्षाची सुरुवात तिने दणकेबाज कामगिरीसह केली आहे. निखत झरीन २२ वर्षांची आहे. कर्नाटकातील बेळ्ळारी येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस (आयआयएस) येथे सराव करणारी झरीन ही तेलंगणातील. निझामाबाद येथे जन्मलेली ही मुलगी हैदराबादला राहते. सोफियामधील कामगिरी झरीनचा आत्मविश्‍वास उंचावणारी आहे. यावर्षी सुरुवातीस राष्ट्रीय महिला बॉक्‍सिंगमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची ५१ किलो वजनगटातील अव्वल बॉक्‍सर पिंकी झांग्रा हिच्याकडून तिला हार पत्करावी लागली. सोफियातील स्पर्धेत झरीन आणि पिंकी एकाच गटात होत्या. पिंकीला पहिल्या फेरीत फिलिपिन्सच्या मॅग्नो हिच्याकडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे पदकाच्या साऱ्या आशा झरीनवर केंद्रित होत्या. या धैर्यवान मुलीने निराश केले नाही. फिलिपिन्सच्याच बॉक्‍सरला ५-० असे एकतर्फी हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. २०१९ वर्ष तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. सोफियातील सुवर्णपदकानंतर झरीनचे लक्ष एप्रिलमध्ये बॅंकॉकमधील आशियायी अजिंक्‍यपद, नंतर रशियातील जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेवर असेल. शिवाय २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीतही तिला सातत्य राखावे लागेल. 

आशियाई स्पर्धेची संधी हुकली
चांगल्या फॉर्ममध्ये असूनही गतवर्षीच्या आशियायी क्रीडा स्पर्धेत निखत झरीन खेळू शकली नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सर्बियातील स्पर्धेत झरीनने सुवर्णपदक जिंकले होते, तर राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. राष्ट्रीय कामगिरीच्या आधारे ती मानांकनात तिसरी होती. या मानांकनामुळे बेलग्रेडमध्ये विजयी पंच लगावूनही ती आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणी देऊ शकली नाही. त्यामुळे प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तिची संधी हुकली. केवळ आशियायी क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर राष्ट्रकुल आणि जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धाही तिला दूरची ठरली. झरीनने निराशा झटकत नव्याने उसळी घेण्याचे ठरविले. राष्ट्रीय महिला बॉक्‍सिंगमध्ये ५१ किलो वजनगटात मानांकन उंचावण्यावर लक्ष केंद्रित केले. यंदा ती राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेती ठरली. सोफियात विजेतेपद मिळवून झरीनने ऑलिंपिक पात्रतेसाठी दावा भक्कम केला आहे.  

दुखापतीवर मात
युवा निखत झरीनची कारकीर्द आकार घेत असतानाच, दोन वर्षांपूर्वी तिला दुखापतीने दगा दिला. २०१७ मध्ये तिचा खांदा निखळला. त्यामुळे झरीनचे बॉक्‍सिंग बंद झाले. तिला शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले. संपूर्ण वर्ष वाया गेल्यामुळे तिच्या बॉक्‍सिंगलाही काही प्रमाणात गंज चढला. २०१८ मध्ये तिने पुनरागमन केले, मात्र सुरुवातीस अपेक्षित यश मिळाले नाही. तिने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, तरीही ती पूर्ण सक्षम नसल्याचे प्रशिक्षकांना वाटत होते. 

तिला ‘जेएसडब्ल्यू’चा पाठिंबा लाभतो. त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाच्या बळावर झरीनने दुखापतीनंतर बॉक्‍सिंग रिंगमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापर्यंत मजल मारली आहे. दुखापतीनंतर पुन्हा बॉक्‍सिंग रिंगमध्ये उतरताना ती सुरुवातीस हारू लागली, त्यामुळे आत्मविश्‍वासास तडा जाऊ लागला, मात्र मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्यामुळे झरीन वेळीच सावरली. तिला सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्‍वास गवसला. झरीनने यंदाच्या वर्षाची सुरुवात झकास केलेली आहे. आता तिचे मुख्य लक्ष्य टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविण्याचे असेल.  
 

संबंधित बातम्या