नेमबाज सौरभचा धडाका

किशोर पेटकर
सोमवार, 25 मार्च 2019

क्रीडांगण
 

गतवर्षी आशियायी क्रीडा स्पर्धेत आणि युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या सोळा वर्षांच्या सौरभ चौधरी याने आपली वाटचाल योग्य दिशेने असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. नवी दिल्लीत झालेल्या आयएसएसएफ विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत या युवा प्रतिभाशाली नेमबाजाने सुवर्णपदक मिळविताना ऑलिंपिक कोटाही मिळविला. सौरभची ही कामगिरी स्पृहणीय आहे. भारताचे अन्य युवा नेमबाज अपेक्षापूर्ती करण्यात कमी पडल्याने प्रशिक्षक जसपाल राणाही संतापले. त्यांनी युवा नेमबाजांना मोबाईल फोनपासून दूर राहात केवळ नेमबाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे सुनावले. या पार्श्‍वभूमीवर सौरभचे यश उल्लेखनीय ठरते. गतवर्षीचा फॉर्म राखताना सौरभने सुवर्ण मालिका कायम ठेवली. नवी दिल्लीतील स्पर्धेत या जिगरबाज नेमबाजाने जबरदस्त वर्चस्व प्रदर्शित केले. सीनिअर गटातील त्याची ही पहिलीच विश्‍वकरंडक स्पर्धा होती. १० मीटर एअर पिस्तुलाच्या ‘रेंज’वर अनुभवी नावे होती. विश्‍वविक्रमी कामगिरीसह त्याने जिद्दीच्या जोरावर अव्वल स्थानावर मोहोर उठविली. सौरभने एकूण २४५ गुणांची नोंद केली. सर्बियाच्या दामी मिकेच याला २३९.३ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आपण अनुभवी नेमबाजांना आव्हान देतोय याचा ताण सौरभवर अजिबात नव्हता. अचूकतेवर भर देत योग्य नेम साधण्यासाठी तो प्रेरित राहिला. विश्‍वविक्रम नोंदविणे हे सौरभसाठी नवीन नाही. ज्युनिअर गटातील १० मीटर एअर पिस्तूलमधील २४५.५ गुणांचा विश्‍वविक्रम त्याच्याच नावे आहे. उलट त्याची ज्युनिअर गटातील कामगिरी सीनिअर पातळीच्या तुलनेत जास्त सरस आहे. ‘एकाग्र चित्ताने शांतपणे नेमबाजी करणे हेच ध्येय असते, ऑलिंपिक कोटा किंवा विश्‍वविक्रम यांचा साधा विचारही नेमबाजी करताना माझ्या मनात नसतो,’ असे सौरभने नवी दिल्लीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले.

लहान वयात मोठी भरारी
सौरभ हा उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरानजीकच्या कलिना गावातील आहे. वडील शेतकरी आहेत. जाकार्ता-पालेमबंग येथे गतवर्षी झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सौरभने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळविले, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे, तीन महिने व नऊ दिवस इतके होते. आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो सर्वात युवा भारतीय ठरला. आशियायी क्रीडा स्पर्धेतील रिंगणात प्रदीर्घ अनुभवी नेमबाज होते. ‘कोवळ्या’ सौरभने जबरदस्त आत्मविश्‍वासाच्या बळावर ‘दिग्गज’ नेमबाजांना पराभूत केले. आशियायी क्रीडा स्पर्धेत सौरभने २४०.७ गुणांचा विक्रम नोंदविला. युवा ऑलिंपिक, आशियायी क्रीडा स्पर्धा, ज्युनिअर जागतिक स्पर्धा, ज्युनिअर विश्‍वकरंडक, आशियायी एअरगन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय नेमबाज आहे. येत्या ११ मे रोजी तो सतरावा वाढदिवस साजरा करेल.

नेमबाजीने झपाटले
फावल्या वेळेत वडिलांना शेतीकामात मदत करणाऱ्या सौरभला नेमबाजीने लहानपणीच झपाटले. सुमारे चार वर्षांपूर्वी मित्रांप्रमाणे आपणही नेमबाजी करावी, असे त्याला वाटू लागले. मुलाने पिस्तूल हाती घेणे वडिलांना नामंजूर होते. मुलाने चांगले शिकून मोठा अधिकारी व्हावे, ही वडिलांची मनीषा, पण सौरभच्या हट्टासमोर त्यांना नमावे लागले. आपल्याला नेमबाजीच करायची आहे आणि त्यासाठी वडिलांनी परवानगी द्यावी, हा हेका धरत त्याने जेवण त्यागले. हा मुलगा काही ऐकणार नाही याची जाणीव झाल्याने वडिलांनी त्याला नेमबाजी करण्यास परवानगी दिली. कलिना गावी नेमबाजीची रेंज नव्हती. तेथून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नेमबाजी अकादमीत अमित शेरॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभचा शास्त्रोक्त सराव सुरू झाला. मुलाची ‘नेमसाधना’ पाहून कुटुंबीयांनी त्याला सुमारे पावणेदोन लाख रुपयांची ‘गन’ घेऊन दिली. राष्ट्रीय क्षितिजावर आल्यानंतर सौरभला पावेस स्मिरनोव यांचे प्रगल्भ मार्गदर्शन लाभले. ‘गन’ सोडून तो ‘पिस्तूल’ नेमबाजीत पारंगत बनला.
 

संबंधित बातम्या