सलाम गोमती!

किशोर पेटकर
सोमवार, 13 मे 2019

क्रीडांगण
 

गोमती मरीमुथू या भारतीय महिला धावपटूची कारकीर्द अडथळ्यांचीच ठरली. घरची परिस्थिती बेताची. वडील शेतमजूर. ॲथलिटसाठी आवश्‍यक असणारा आहार मिळणेही गोमतीला कठीण असायचे, पण वडिलांनी मुलीचे धावणे रोखले नाही. वेळप्रसंगी उपाशीपोटी राहत आपल्या वाट्याचे खाणे त्यांनी मुलीला दिले. गोमतीला भल्या पहाटे सरावासाठी जावे लागत असे. त्यासाठी वडील मरीमुथू सकाळी लवकर उठत, मुलीची आवराआवर करत, तिने बसस्टॉपवर लवकर पोचावे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. २०१६ मध्ये गोमतीच्या वडिलांचे निधन झाले. तिचा मोठा आधार तुटला, मात्र जिगर कायम राहिली. त्या जोरावर वयाच्या तिसाव्या वर्षी गोमतीने दोहा येथे झालेल्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. दुखापतीमुळे तिच्या कारकिर्दीस जवळपास पूर्णविराम मिळाला होता, पण गोमती डगमगली नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा ट्रॅकवर उतरली. दोहा येथे तिने चिनी व कझाकस्तानच्या धावपटूस मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला. तिची धाव कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली. यापूर्वी आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत गोमतीला ‘पोडियम फिनिश’ मिळवता आले नव्हते. आशियायी ॲथलेटिक्‍समध्ये २०१३ मध्ये तिला सातवा, तर २०१५ मध्ये चौथा क्रमांक मिळाला होता. यंदा तिने जबरदस्त धाव घेत ‘गोल्डन गर्ल’ बनण्यापर्यंत मजल मारली. तिची वाटचाल स्पृहणीय आहे. वय वाढले, पण तिची जिद्द कमी झाली नाही. तिशी गाठल्यानंतरही विजेतेपद मिळविता येते हे गोमतीने सिद्ध केले आहे. 

मेहनतीला फळ
 तमिळनाडूतील तिरुचीमधील मुडीकंदम हे गोमतीचे गाव. चेन्नईपासून साधारणतः ३५० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. महाविद्यालयात शिकत असताना तिरुची येथील प्रशिक्षक राजामणी यांच्या मार्गदर्शनाखाली गोमतीच्या गुणवत्तेस धुमारे फुटले. शालेय पातळीवरही गोमती धावण्याच्या शर्यतीत भाग घेत होती, पण या खेळातच कारकीर्द करण्याविषयी गंभीर नव्हती. वयाच्या विसाव्या वर्षी तिने ८०० मीटर धावण्यासाठी जास्त मेहनत घेण्याचे ठरविले. त्याचे योग्य फळ तिला मिळाले. वडिलांची साथ होतीच. गावाकडून तिरुची येथे जाण्यासाठी भल्या पहाटे उठून बस पकडावी लागायची. प्रवासाची दगदग असली, तरी गोमतीने वेगाने धावण्याचा निश्‍चय केला होता. वडिलांच्या निधनानंतर तिला मैत्रिणीने मानसिकदृष्ट्या सावरले. सहकाऱ्यांनीही तिला प्रोत्साहित केले. त्यामुळे मांडीच्या दुखापतीवर मात करून गोमती पुन्हा जबरदस्त इच्छाशक्तीने धावू शकली. गोमती बंगळूर येथे आयकर खात्यात काम करते, त्यामुळे कर्नाटकच्या राजधानीतच तिचे हॉस्टेलमध्ये वास्तव्य असते. गावी आई व भाऊ आहेत. त्यांच्याइतकाच गावकऱ्यांनाही गोमतीचा मोठा अभिमान वाटतो. धावण्याची कारकीर्द घडविताना गोमतीला तिरुचीतील दानशूरांचाही थोडाफार हातभार लागला. फाटके ‘शूज’ घालून गोमती धावली, त्याबद्दल चर्चा झाली. मात्र, ‘लकी शूज’ असल्यामुळे आपण वारंवार तेच वापरते, असे सांगत गोमतीने शूजचा विषय निकालात काढला. 

पुढील धाव महत्त्वाची
 दोहा येथे आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे गोमतीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याची जाणीव तिला आहे, त्यामुळेच तिसाव्या वर्षीही तिला आणखी यश खुणावत आहे. खडतर मेहनत आणि निश्‍चित लक्ष्याच्या बळावर आघाडी शक्‍य आहे, हे तिचे मत आहे. गोमतीसाठी दोहा येथेच होणारी जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धा महत्त्वाची आहे. नावाजलेल्या धावपटूंसमवेत धावताना तिचा कस लागेल. शिवाय पुढील वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्यही तिच्यासमोर आहे. ऑलिंपिकसाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करण्याची कटिबद्धता तिने व्यक्त केली आहे. पूर्वी तिला आर्थिक पाठबळाची कमतरता भासत असे, आता चित्र पालटले आहे. राज्य प्रशासन, तसेच पुरस्कर्त्यांची मदत निर्णायक ठरू लागली आहे. दोहा येथील आशियायी ॲथलेटिक्‍समधील गोमतीचे सोनेरी यश साजरे करण्यासाठी तिचे वडील हयात नव्हते, पण सुरुवातीच्या काळातील वडिलांचा त्याग तिच्यासाठी आधारवड ठरलेला आहे.

संबंधित बातम्या