क्रिकेट पंचगिरीत महिलेचा ठसा

किशोर पेटकर
सोमवार, 20 मे 2019

क्रिकेटमध्ये महिलांनी फार मोठी प्रगती साधलेली आहे. पंचगिरीतही महिला मागे नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट पंच क्‍लेर पोलोसॅक यांनी ऐतिहासिक ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मैदानावर पंचगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला पंच आहेत. नामिबियातील विंडह्योक येथे ओमान आणि नामीबिया यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात क्‍लेर यांनी पंच या नात्याने मैदानावरील जबाबदारी समर्थपणे पेलली. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत महिलेने निर्णय देण्याची घटना प्रथमच घडली.

क्रिकेटमध्ये महिलांनी फार मोठी प्रगती साधलेली आहे. पंचगिरीतही महिला मागे नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट पंच क्‍लेर पोलोसॅक यांनी ऐतिहासिक ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मैदानावर पंचगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला पंच आहेत. नामिबियातील विंडह्योक येथे ओमान आणि नामीबिया यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात क्‍लेर यांनी पंच या नात्याने मैदानावरील जबाबदारी समर्थपणे पेलली. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत महिलेने निर्णय देण्याची घटना प्रथमच घडली. ३१ वर्षीय क्‍लेर क्रिकेट खेळलेल्या नाहीत, पण लहानपणापासून त्यांना क्रिकेटची भारी आवड. त्यास वडिलांनी खतपाणी घातले. त्यामुळे क्रिकेटपटू नसूनही क्‍लेर यांना पंचगिरीत यशस्वी ‘इनिंग’ साकारता आली. आता पतीचेही प्रोत्साहन लाभत आहे. न्यू साउथ वेल्स क्रिकेटमध्ये पंच या नात्याने क्‍लेर यांचे नाव आदराने घेतले जाते. 

प्रकाशझोतात...
 महिला क्रिकेट पंच क्‍लेर पोलोसॅक दोन वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आल्या. ऑक्‍टोबर २०१७ मध्ये त्यांनी सर्वप्रथम पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंचगिरी केली. न्यू साउथ वेल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यातील एकदिवसीय सामन्यात क्‍लेर यांनी अनुभवी पंच पॉल विल्सन यांच्या साथीत सामना नियंत्रणाखाली ठेवला. पुरुष क्रिकेटमध्ये निर्णय देण्याची संधी क्‍लेर यांनी ऑक्‍टोबर २०१५ मध्ये सर्वप्रथम मिळाली. क्वीन्सलॅंड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅटेडोर कप सामन्यात त्यांच्याकडे ‘थर्ड अंपायर’ची जबाबदारी होती. वयाच्या पंधराव्या वर्षापासून पंच या नात्याने क्‍लेर क्रिकेटमध्ये कार्यरत आहेत. पंच या नात्याने निर्णय देताना खेळाचे पूरेपूर ज्ञान आणि प्रबळ आत्मविश्‍वास या बळावर त्यांनी लौकिक संपादन केला आहे. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेट पंच सायमन टॉफेल हे क्‍लेर यांच्यासाठी आदर्शवत आहे. मैदानावर तटस्थपणे अचूक निर्णय घेण्याची क्षमता क्‍लेर यांच्यात आहे, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या ऑस्ट्रेलियन महिलेवर विश्‍वास दाखवत मोठी संधी दिली. न्यूझीलंडच्या कॅथी क्रॉस, विंडीजच्या जॅकलिन विल्यम्स, इंग्लंडच्या स्यू रेडफर्न या महिलांनी सुरुवातीस क्रिकेट पंचगिरीत आदर्श निर्माण केला. त्यांच्याकडून प्रेरणा घेत क्‍लेर यांनी पाऊल पुढे टाकले.

अनुभवी पंच
नामीबिया आणि ओमान यांच्यातील ‘वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २’ स्पर्धेच्या अंतिम लढतीत पंचगिरी करण्यापूर्वी क्‍लेर पोलोसॅक यांनी मैदानावर भरपूर अनुभव प्राप्त केलेला आहे. महिलांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्या नियमितपणे पंचगिरी करतात. २०१८ मध्ये महिलांच्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंड आणि भारत यांच्यातील उपांत्य लढतीत त्यांनी पंचगिरी केली होती. २०१७ मध्ये महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडकातील चार सामन्यांसाठी त्या मैदानावरील पंच होत्या. क्रिकेट सामन्यात पंचगिरी करताना पूर्वतयारी करावी लागते. मैदानावर भरपूर वेळ उभे राहण्याची क्षमता आणि ताकद पायांत हवी, तसेच मानसिकदृष्ट्या कणखर राहावे लागले, असे क्‍लेर यांचे क्रिकेट पंचगिरीबद्दलचे मत आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश स्पर्धेत क्‍लेर यांनी आणखी एक मानाचा पल्ला गाठला. त्या स्पर्धेत ॲडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार यांच्यातील लढतीत क्‍लेर पोलोसॅक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या इलोईज शेरीडॅन यांच्यासमवेत पंचगिरी केली. ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक क्रिकेट सामन्यात दोघा महिलांनी मैदानावर पंचगिरी करण्याची ती पहिलीच वेळ ठरली. 

संबंधित बातम्या