आश्‍वासक युवा क्रिकेटपटू

किशोर पेटकर
मंगळवार, 11 जून 2019

क्रीडांगण
 

राजस्थान रॉयल्स संघाला यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मोठा पराक्रम गाजविता आला नाही, पण त्यांच्या एका युवा खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. रियान पराग या १७ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटूने छाप पाडत आयपीएलमध्ये दखल घेण्यास भाग पाडले. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे राजस्थानने साखळी फेरीत कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. रियानची लेगब्रेक फिरकी गोलंदाजीही किफायतशीर ठरली. साहजिकच यंदाच्या आयपीएलमध्ये तो ‘फाइंड’ ठरला. गतवर्षी भारताच्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक विजेत्या संघातून खेळलेल्या रियानने अपेक्षा उंचावल्या आहेत. वयाचा विचार करता, त्याला अजून भरपूर मजल मारायची आहे, पण त्याची गुणवत्ता अफलातून आहे. सातत्यावर भर राहिल्यास तो दीर्घकाळ क्रिकेटमध्ये चमकू शकतो. कदाचित भारतीय संघातून खेळण्याची संधीही त्याला मिळू शकते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांच्या करारावर रियानला आपल्या संघात घेतले होते. प्रत्यक्ष आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यानंतर या गुणवान अष्टपैलूने संधीचे सोने केले. आसामच्या रणजी संघातून पदार्पण केलेल्या रियानने आपल्या वयोगटातील क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. २०१९-२० मोसम रियानसाठी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. आयपीएलमधील कामगिरीने प्रेरित होऊन त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यास निवड समितीच्या बैठकीत त्याच्या नावाची नक्कीच चर्चा होईल.

पालकांचे प्रोत्साहन
 रियानला क्रिकेटमध्ये त्याच्या पालकांचे भरीव प्रोत्साहन लाभले आहे. त्याचे वडील पराग दास हे आसामचे माजी रणजी क्रिकेटपटू, तर आई मिथू बरुआ राष्ट्रीय पातळीवरील माजी जलतरणपटू. रियानने दोन वर्षांचा असताना हाती बॅट घेतली. वडिलांसमवेत तोही सरावासाठी क्रिकेट मैदानावर जायचा. वडील घरी फलंदाजीचा सराव करताना रियानही वडिलांची ‘कॉपी’ करत असे. गुवाहाटीतील मालिगाव येथील सिमेंटच्या खेळपट्टीवर रियानचा क्रिकेट सराव सुरू झाला. लहानग्या रियानचे क्रिकेटमधील कौशल्य आणि अभ्यासूवृत्ती पाहून पराग क्रिकेट प्रशिक्षक नवाब अली यांच्याकडे गेले आणि तेथून रियानच्या उपजत क्रिकेट गुणवत्तेला धुमारे फुटले. रियानने क्रिकेटच खेळावे हा आग्रह त्याच्या पालकांनी धरला नाही. शैक्षणिक पातळीवरही त्याने पिछाडी होऊ दिली नाही.

लहान वयात मोठी मजल
 रियानने लहान वयात मोठ्या वयोगटातील संघात खेळत प्रगतीचा ध्यास धरला. २०१३ मध्ये तो आसामच्या १६ वर्षांखालील संघात निवडला गेला, तेव्हा १२ वर्षांचा होता. २०१४ मध्ये आसामच्या १९ वर्षांखालील संघात प्रवेश केला आणि या वयोगटात त्याने चांगली कामगिरी केली. बडोद्याविरुद्धच्या पहिल्याच लढतीत त्याने अर्धशतक नोंदविले. येथूनच भारतीय संघाकडे त्याची वाटचाल सुरू झाली. २०१७ हे वर्ष त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरले. देशांतर्गत वयोगट स्पर्धांतील शानदार कामगिरीमुळे त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही त्याने प्रभावित केले. इंग्लंडविरुद्धच्या ‘युवा कसोटी’त त्याने दोन्ही डावांत अर्धशतके ठोकली. त्यापैकी एक अर्धशतक त्याने अवघ्या ३३ चेंडूंत केले. त्याचवर्षी त्याला आसामच्या रणजी संघातही स्थान मिळाले. हैदराबादविरुद्ध त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा २१ व्या शतकात जन्मलेला पहिला क्रिकेटपटू हा मान रियानला मिळाला. २०१८ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. दुखापतीमुळे तो त्या स्पर्धेतील काही सामने खेळू शकला नाही. मात्र, आयपीएल संघांचे त्याने लक्ष वेधले होते. त्याची आक्रमक फलंदाजी आयपीएल क्रिकेटसाठी साजेशी आहे. वेळप्रसंगी संयमी फलंदाजीतही त्याचा हातखंडा आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत त्याच्या फिरकी गोलंदाजीचाही खुबीने वापर केला.  
 

संबंधित बातम्या