रायुडूची शापित कारकीर्द

किशोर पेटकर
सोमवार, 15 जुलै 2019

क्रीडांगण
 

अतिशय गुणवान आणि शास्त्रोक्त फलंदाज हा लौकिक असूनही हैदराबादच्या अंबाती रायुडूची कारकीर्द शापित ठरली. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविलेल्या या शैलीदार फलंदाजास भारतीय संघातून खेळण्याची संधी कमीच मिळाली. कसोटी क्रिकेट त्याच्यासाठी खूप दूरचे ठरले. मात्र, एकदिवसीय संघात जम बसवू पाहत असतानाच या ३३ वर्षीय खेळाडूच्या कारकिर्दीस ठेच लागली. इंग्लंड-वेल्समधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडणारे उपरोधिक ट्विट केले. दुखावलेल्या निवड समितीने त्याच्याकडे साफ काणाडोळा केला. सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर युवा खेळाडू ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पाठविण्यात आले. नंतर विजय शंकरही दुखापतग्रस्त ठरला. त्याच्या जागी कर्नाटकचा सलामीवीर मयांक अगरवाल याला प्राधान्य मिळाले. खरे म्हणजे, रायुडू विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंत होता. पण बदली खेळाडू पाठविताना दोन्ही वेळेस त्याला डावलले गेले. निराश आणि नाराजी या पार्श्‍वभूमीवर रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणेच पसंत केले. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जतर्फे खेळताना रायुडूने चांगली कामगिरी केली होती. परंतु, निवड समितीने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहून शंकरला प्राधान्य दिले. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी सांगितले होते, की शंकर हा तिहेरी परिमाण (थ्री डायमेन्शन) साधणारा खेळाडू आहे. त्यावर नेम साधताना रायुडूने विश्‍वकरंडक स्पर्धा पाहण्यासाठी आपण थ्री-डी चष्मे खरेदी करणार असल्याचे ट्विट केले. ही टीकाच अखेर रायुडूसाठी घातक ठरली.

लहान वयात छाप
 रायुडू वयाच्या १९ वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आला. जुलै २००० मध्ये १५ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत तो मालिकावीर ठरला. २००१-०२ मध्ये त्याने हैदराबादकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. तो यष्टिरक्षणही करायचा. नोव्हेंबर २००२ मध्ये त्याने आंध्रविरुद्ध रणजी सामन्यात दुहेरी शतक आणि शतक करण्याचा पराक्रम केला. त्याच्याकडे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद आले. नंतर त्याचे हैदराबाद क्रिकेट संघटनेबरोबर बिनसले. तो आंध्रप्रदेशकडून खेळू लागला. २००७ मध्ये अनधिकृत इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयसीएल) सामील झाल्यावर त्याच्यावर बंडखोर क्रिकेटपटूचाही शिक्का बसला. ‘आयसीएल’ बंद पडल्यानंतर रायुडू भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात परतला. हैदराबादकडून पुन्हा खेळू लागला.

वाटचालीत ‘वळण’
 रायुडूच्या कारकिर्दीने २०१० मध्ये महत्त्वपूर्ण ‘वळण’ घेतले. इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत त्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. चांगल्या धावा केल्याने त्याचे नाव चर्चेत आले. त्याचवर्षी त्याने हैदराबाद सोडून बडोदा संघाकडून रणजी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये विदर्भ संघात तो सामील झाला. २०१७ मध्ये रायुडू पुन्हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडे परतला. २०१८ मध्ये जानेवारीत सय्यद मुश्‍ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंचांशी वाद घातल्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी आली. त्याचवर्षी जूनमध्ये तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, चार महिन्यानंतर पुनरागमन करताना त्याने एकदिवसीय सामन्यात शतक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फक्त झटपट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विश्‍वकरंडक स्पर्धा नजरेसमोर ठेवून त्याने फिरकी गोलंदाजी टाकण्यास सुरुवात केली. पण आक्षेपार्ह शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर बंदी आली. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी डावललेल्या रायुडूने निवृत्तीचे अस्त्र उगारत क्रिकेटला पूर्णविराम दिला. 
 

संबंधित बातम्या