आमलाची संस्मरणीय कारकीर्द

किशोर पेटकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

भारतीय वंशाच्या हशिम आमला याला दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली. परंतु, सुरुवातीस त्याच्या तंत्राबद्दल शंका उपस्थित झाल्या. विशेषतः त्याचे फलंदाजीतील तंत्र जाणकारांना भावले नाही. त्यातच त्याचे कसोटी पदार्पणही असमाधानकारक ठरले. झटपट क्रिकेटसाठी हा ‘दाढीवाला’ फलंदाज अजिबात उपयुक्त नाही हा शेराही त्याच्या क्रिकेटमधील प्रगतिपुस्तकावर मारला गेला. प्रचंड मेहनत, चिकाटी, क्रिकेटप्रती पराकोटीचे प्रेम आणि जिद्दीच्या बळावर हशिम आमला या फलंदाजाने जबरदस्त उसळी घेतली. फलंदाजी तंत्रातही काही आवश्‍यक बदल केले. ज्याच्या कुवतीबद्दल प्रारंभी शंका उपस्थित झाल्या, त्याच फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेचा कसोटी क्रिकेटमधील एकमेव त्रिशतकवीर हा मान मिळविला. केवळ कसोटीच नाही, तर एकदिवसीय आणि टी-२० या झटपट प्रकारच्या क्रिकेटमध्येही तो पाय घट्ट रोवून खेळपट्टीवर उभा राहिला. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा आधारस्तंभ ठरला. त्याची कारकीर्द संस्मरणीय ठरली. पंधरा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगळा ठसा उमटविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या या महान फलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे. आठवडाभरात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला आणखी एका दिग्गज खेळाडूने ‘गुडबाय’ केला. वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आपली ‘स्टेनगन’ म्यान केल्यानंतर आमलानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थांबण्याचे ठरविले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून वयाच्या ३६ व्या वर्षी त्याने संन्यास घेतला. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत तो शेवटचे आंतरराष्ट्रीय खेळला. शेवटच्या डावात त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ८० धावा केल्या, परंतु एकंदरीत विश्वकरंडक स्पर्धेत त्याची फलंदाजी विशेष बहरली नाही... 

सफल फलंदाज 
 हशिम आमलाने जुलै २०१२ मध्ये ‘द ओव्हल’वर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नाबाद ३११ धावांची ऐतिहासिक खेळी केली. तेव्हा तो कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता.  आमलाची फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी होती. त्याच्या फलंदाजीत आक्रमकता होती, पण त्याचे स्वरूप निव्वळ हाणामारीचे नव्हते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने जवळपास पन्नासच्या सरासरीने धावा  नोंदविताना झटपट क्रिकेट तंत्रही विकसित केले. कसोटी आणि झटपट क्रिकेट खेळताना त्याने फलंदाजीच्या तंत्रात ‘भेसळ’ होणार नाही याची दक्षता घेतली.  सर्व प्रकारच्या  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने  १८,६७२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपदही त्याच्याकडे चालून आले. परंतु, या जबाबदारीत तो जास्त रमला नाही. आपला पिंड निव्वळ फलंदाजीचा आहे ही बाब त्याने मान्य केली. संघभावना, संघाचे यश त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. २००४-०५ च्या मोसमात कोलकाता येथे त्याने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या लढतीत अनुक्रमे २४ व २ धावा करणाऱ्या हशिम आमलास एक सर्वसाधारण फलंदाज मानले गेले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. पंधरा महिन्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत १४९ धावा करत त्याने जोरदार पुनरागमन केले.

सद््गृहस्थ क्रिकेटपटू 
 लांबलचक दाढी ही हशिम आमलाची ओळख राहिली. त्यामुळे मैदानावर तो नेहमीच लक्ष वेधून घ्यायचा. मैदानावरील आणि मैदानाबाहेरील त्याचे वर्तन सद््गृहस्थाचे होते. तो पक्का धार्मिक वृत्तीचा होता, इस्लामची तत्त्वे त्याने पूर्णतः अंगीकारली होती. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या जर्सीवर मद्याचा लोगो वापरण्यास त्याने स्पष्टपणे नकार दिला. त्याच्या भावनेची ‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट’नेही कदर केली. त्याच्या व्यक्तिमत्त्वात आक्रस्ताळेपणा नव्हता. मैदानावर त्याने अपील जरूर केले, पण पंचांच्या निर्णयाविरुद्ध त्वेषाने निषेध व्यक्त करताना तो दिसला नाही. क्रिकेटच्या बॅटनेच तो जास्त ‘बोलला’. क्रिकेटमधील चढउतारांना तो संयमाने सामोरे गेला. दक्षिण आफ्रिकेच्या भिन्न संस्कृती असलेल्या संघातून खेळताना त्याने बंधुभाव जपला. हीच भावना त्याने आंतरराष्ट्रीय निरोपाच्या वेळेस व्यक्त केली. 

संबंधित बातम्या