आय-लीग : नवोदितांना संधी

किशोर पेटकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेने सहा मोसमातच भारतीय फुटबॉलवर कब्जा केलेला आहे. सध्या देशातील हीच प्रिमिअर फुटबॉल स्पर्धा मानली जाते. आयएसएल स्पर्धेचा आवाका प्रचंड आहे. या स्पर्धेच्या मैदानावरील झगमगाटही कमालीचा आहे, त्यामुळे युवा वर्ग स्पर्धेकडे आकर्षित झालेला आहे. सुरुवातीस केवळ मनोरंजनात्मक-व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले गेलेल्या स्पर्धेचे माहात्म्य साऱ्यांनीच मान्य केले आहे. त्यात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचाही समावेश आहे, म्हणूनच त्यांनीही देशातील यापूर्वीची प्रिमिअर स्पर्धा आय-लीगला दुय्यम स्थान दिले आहे, मात्र आयएसएल स्पर्धेच्या झंझावातात फुटबॉल महासंघाने आय-लीग स्पर्धेचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. हे धोरण नवोदितांसाठी स्फूर्तिदायक आहे. आय-लीग स्पर्धेने सुरुवातीपासूनच देशातील नवोदितांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. सध्या आयएसएल स्पर्धेची मैदाने गाजवत, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघापर्यंत मजल मारलेल्या फुटबॉलपटूंच्या कारकिर्दीची सुरुवात आय-लीग स्पर्धेतून झालेली आहे. फुटबॉल महासंघाला आय-लीग स्पर्धेचे मार्केटिंग जमले नाही, त्यामुळेच ही स्पर्धा पिछाडीवर राहिली हे सत्य आहे. फुटबॉलला मार्केट कसे मिळवून द्यायचे असते हे आयएसएल स्पर्धेच्या आयोजकांनी सिद्ध करून दाखविले आहे. आयएसएल स्पर्धेची महत्ता आशियायी फुटबॉल महासंघानेही (एएएफसी) कबूल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आय-लीग स्पर्धा नवोदितांसाठी दिशादर्शक ठरलेली आहे. गतमोसमात चेन्नई सिटी एफसीने आय-लीग स्पर्धा जिंकली, त्या संघातील काही स्थानिक खेळाडू प्रकाशझोतात आले. या खेळाडूंना यंदा चेन्नईयीन सिटी या आयएसएल संघाने संधी दिली आहे. देशाच्या नॉर्थईस्ट भागातील गुणवान फुटबॉलपटूंना आय-लीग स्पर्धाच साह्यकारक ठरलेली आहे.

यंदा तेरावा मोसम
आय-लीग स्पर्धेचा यंदा तेरावा मोसम आहे. समाधानाची बाब म्हणजे, यंदा स्पर्धेतील सर्व सामने थेट प्रक्षेपित होणार आहेत. यापूर्वी असे होत नव्हते. काही मोजक्याच सामन्यांचे प्रसारण होत असे, त्यामुळे ही स्पर्धा देशातील लोकप्रियतेच्या बाबतीत मागेच राहिली. विशेष बाब म्हणजे, भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक यांनीही आपण आय-लीग स्पर्धेकडे गांभीर्याने पाहत असल्याचे सांगितले आहे. स्टिमॅक यांचे वक्तव्य उदयोन्मुख फुटबॉलपटूंना प्रेरित करणारे आहे. आय-लीग स्पर्धेतील कामगिरी राष्ट्रीय संघ निवडीच्या वेळेस विचाराधीन घेतली जाईल या भावनेने देशातील नवोदित नक्कीच प्रेरित होतील, साहजिकच त्यांच्याकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन अपेक्षित आहे. आय-लीग स्पर्धेस २००७-२००८ मोसमात सुरुवात झाली. त्यापूर्वी १९९६-९७ पासून ही स्पर्धा राष्ट्रीय फुटबॉल लीग या नावाने खेळली गेली. राष्ट्रीय स्पर्धेने आय-लीगच्या नावाखाली व्यावसायिकता स्वीकारली, पण स्पर्धेत खेळणाऱ्या संघांना विशेष फायदा झाला नाही. त्यांचे नुकसानच जास्त झाले. पुण्या-मुंबईकडील बरेच संघ बंद झाले. गोव्यातील नावाजलेल्या संघांनी स्पर्धेकडे पाठ फिरविली. फक्त कोलकात्यातली ईस्ट बंगाल, मोहन बागान, गोव्यातील चर्चील ब्रदर्स या संघांनी चिवटपणा दाखविला. ईस्ट बंगाल व मोहन बागान संघ सर्व बाराही मोसमात, तर चर्चील ब्रदर्स संघ दहा मोसम खेळला आहे. आय-लीग स्पर्धेत आता खेळणारे बहुतांश संघ नवीन आहेत. 

एकूण अकरा संघांत चुरस
यावेळच्या आय-लीग स्पर्धेत एकूण अकरा संघांत चुरस पाहायला मिळत आहे. संवेदनशील काश्मीरमधील रियल काश्मीर संघाचाही स्पर्धेत समावेश आहे. या संघाने घरच्या मैदानावरील सामने श्रीनगरमध्ये खेळण्याचे ठरविले आहे. मणिपूरमधील ट्राऊ (टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन) हा आय-लीग स्पर्धेतील नवा संघ आहे. गतमोसमात द्वितीय विभागीय स्पर्धा जिंकून त्यांनी आय-लीगसाठी पात्रता मिळविली. नेरोका एफसी हा मणिपूरमधील आणखी एक संघ आहे. मिझोरामचा ऐजॉल एफसी हा नॉर्थईस्ट भागातील तिसरा संघ आहे, पण मेघालयातील शिलाँग लाजाँग एफसी संघाची पदावनती झाल्यामुळे त्यांची यंदा अनुपस्थिती जाणवेल. गतविजेता चेन्नई सिटी, गोकुळम केरळा हे दक्षिण प्रांताचे प्रतिनिधित्व करत आहेत. कोलकात्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी ईस्ट बंगाल व मोहन बागान, तसेच गोव्यातील चर्चील ब्रदर्स हे जुनेजाणते संघ आहेत. पंजाब एफसी हा उत्तरेतील संघ आहे. देशातील युवा फुटबॉलपटूंना संधी देण्याचे काम इंडियन अॅरोज संघ करतो. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अकादमीतील फुटबॉलपटूंना अॅरोज संघात प्राधान्य असते. आय-लीगमधील विजेत्या संघाला यंदा एक कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला ६० लाख रुपये, तृतीय क्रमांकावरील संघाला ४० लाख रुपये, तर चौथ्या क्रमांकावरील संघाला २५ लाख रुपये मिळतील.

संबंधित बातम्या