दमलेले बॅडमिंटनपटू

किशोर पेटकर
सोमवार, 9 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या अतिशय व्यग्र बॅडमिंटन वेळापत्रकामुळे खेळाडू दमत आहेत आणि त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या कामगिरीवर होत असल्याचा सूर व्यक्त होत आहे. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंदही याबाबत सहमत आहेत. बॅडमिंटनटूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही, त्यामुळे त्यांना लौकिकास साजेसा खेळ करणे जमत नाही याबाबत गोपीचंद यांची मतभिन्नता नाही. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वेळापत्रकावर टीका करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला आहे. अतिबॅडमिंटनमुळे खेळाडू थकले आहेत, बॅडमिंटन कोर्टवर दमछाक होत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये महिला एकेरीत जागतिक विजेतेपद जिंकणारी भारताची पी. व्ही. सिंधू हिचे उदाहरण बोलके आहे. १९ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्पर्धेत खेळल्यानंतर सिंधू जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वेळापत्रकातील सहा प्रमुख स्पर्धांत खेळली, त्यांपैकी एकाही स्पर्धेत ती उपांत्यपूर्व फेरी गाठू शकली नाही. जागतिक मानांकनातही तिची सहाव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय हा मान मिळविल्यानंतर सिंधूच्या कामगिरीत घसरण का बरे झाली? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. याबाबत प्रशिक्षक गोपीचंद यांनी नेमके कारण सांगितले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सिंधू चीन, कोरिया, डेन्मार्क, फ्रान्स, हाँगकाँग येथे स्पर्धा खेळलेली आहे. महिन्यात दोन स्पर्धा असा हिशेब आहे. कमी विश्रांती, सरावास पुरेसा वेळ न मिळणे, प्रवासाची दगदग, सामना जिंकण्याचे उद्दिष्ट, अपेक्षांना जागणे या साऱ्या बाबी म्हणजे एकप्रकारे चक्रव्यूहच. ते भेदणे केवळ सिंधूलाच नव्हे, तर जगातील जवळपास साऱ्याच प्रमुख बॅडमिंटनपटूंना कठीण ठरत आहे. त्यामुळेच येत्या जानेवारी-फेब्रुवारीत भारतात होणाऱ्या प्रिमिअर बॅडमिंटन लीग या वार्षिक स्पर्धेतून साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत, करोलिना मरीन, व्हिक्टर अॅक्सेलसन या प्रमुख जागतिक बॅडमिंटनपटूंनी माघार घेतली आहे.

प्रमुख स्पर्धांत खेळण्याची सक्ती
येते २०२० हे ऑलिंपिक वर्ष आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पदकाच्या दृष्टीने साऱ्याच प्रमुख बॅडमिंटनपटूंसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दुखापतीचा त्रास वाढू नये आणि त्याचा परिणाम शरीरावर होऊ नये याची खबरदारी या नात्याने साईना, श्रीकांत यांनी घरच्या मैदानावरील प्रिमिअर लीगपासून दूर राहणेच पसंत केले हे स्पष्ट आहे. तसे त्यांनी स्पर्धेच्या आयोजकांनाही कळविले आहे. २०१८ पासून जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पर्धा खेळण्याबाबतचे नियम बदलले, जे खेळाडूसाठी सक्तीचे आहेत. बीडल्ब्यूएफ वर्ल्ड टूर या स्पर्धेबरोबरच वर्षात किमान १२ स्पर्धा खेळणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये तीन सुपर १००० गट, पाच सुपर ७५० गट, चार सुपर ५०० गट स्पर्धा खेळणे जागतिक एकेरी क्रमवारीत पहिल्या १५ मध्ये कार्यरत बॅडमिंटनपटूंसाठी आवश्यक आहे. दुहेरीत क्रमवारीतील पहिल्या १० खेळाडूंसाठी हा नियम पाळावा लागतो. गतवर्षी काही देशांच्या खेळाडूंना राष्ट्रकुल आणि आशियायी क्रीडा स्पर्धेतही खेळावे लागेल. सतत स्पर्धा खेळल्यामुळे खेळाडूंची कामगिरी ढासळली आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल महिला खेळाडू करोलिना मरीन हिला दुखापतींचा फटका बसला. सध्या ती महिलांच्या टॉप १० खेळाडूंतही नाही. भारताची साईना नेहवाल कित्येक स्पर्धांत लवकर गारद झालेली दिसली. स्पर्धा व त्यानिमित्त होणारा प्रवास या धावपळीत खेळाडू फॉर्म शोधताना दिसत आहेत. 

ऑलिंपिक पदक जिंकणार?
बॅडमिंटन हा भारतासाठी ऑलिंपिकमधील पदक विजेता खेळ आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये साईना नेहवालला ब्राँझपदक मिळाले. त्यात प्रगती साधताना २०१६ मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. येत्या मार्चमध्ये साईना ३० वर्षांची होईल. टोकियो ऑलिंपिकपूर्वी सिंधू २५ वा वाढदिवस साजरा करेल. आगामी ऑलिंपिकमध्ये महिला गटात साईना आणि सिंधूकडून पदकाची अपेक्षा असेल, कारण त्यांनी तसा लौकिक प्रस्थापित केलेला आहे. पुरुष एकेरीत सध्या बी. साईप्रणीत व किदांबी श्रीकांत हे टॉप १५ खेळाडूंत आहेत. ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीत त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची आशा असेल. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने २०१९ मध्ये उल्लेखनीय खेळ केला. परिणामी टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला बॅडमिंटन पदक अपेक्षित असेल, त्याचवेळी सातत्याने जागतिक पातळीवर खेळल्यामुळे दमलेले खेळाडू अपेक्षापूर्ती करतील का? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. 

संबंधित बातम्या