महिला फुटबॉलची दखल

किशोर पेटकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

क्रीडांगण

भारतीय महिला फुटबॉल क्वचितच प्रकाशझोतात येते. देशात महिलांच्या फुटबॉलची लोकप्रियताही मर्यादित आहे. २०२० मधील जानेवारीत भारतीय महिला फुटबॉलमध्ये आश्वासक घटना घडल्या. साहजिकच देशातील महिलांना फुटबॉलमध्ये भरारीसाठी पंखात बळ प्राप्त झाल्याचे जाणवले. देशातील महिला फुटबॉलची दखल घेतली जात असल्याचे दिसले, जे आश्वासक आहे. भारताची माजी महिला फुटबॉल संघ कर्णधार बेमबेम देवी पद्मश्री पुरस्काराची मानकरी ठरली, तर बाला देवी हिच्याशी स्कॉटलंडमधील रँजर्स वूमन फुटबॉल क्लबने व्यावसायिक करार केला. दोघींचीही उपलब्धी विक्रमी ठरली. पद्म पुरस्काराचा मान मिळविणारा बेमबेम ही पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली, तर परदेशी फुटबॉल क्लबकडून व्यावसायिक करार प्राप्त करणारी बालासुद्धा देशातील पहिलीच महिला फुटबॉलपटू आहे. दोघींचीही कामगिरी अभिमानास्पद आहे. महिलांच्या फुटबॉलला देशात आश्वासक दिशा दाखविणारी आहे. देशातील महिला फुटबॉल मोठ्या प्रमाणात प्रसारित नाही. ईशान्य भागातील महिला फुटबॉलपटूंचाच दबदबा जाणवतो. बेमबेम आणि बाला या दोघीही मणिपूरच्या, त्यांनी प्रारंभीच्या काळात मुलांसमवेत खेळत फुटबॉल खेळण्याची गुणवत्ता विकसित केली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ महिला फुटबॉलसाठी कार्य करताना दिसते. महिला फुटबॉल लीगची निर्मिती करून देशातील गुणवत्तेला व्यासपीठ दिले आहे. बेमबेम, बाला देवी यांचा आदर्श बाळगत देशातील मुली मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळताना दिसतील अशी आशा आहे. गतवर्षी एएफसी फुटबॉल पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट महिला खेळाडूंत भारतीय संघाची सध्याची कर्णधार आशालता देवी हिला नामांकन मिळाले होते. हीसुद्धा मोठी घटना होती. 

दहा क्रमांकाची जर्सीधारक
एन. बाला देवी स्कॉटलंडच्या रँजर्स क्लबतर्फे खेळताना १० क्रमांकाची जर्सी वापरणार आहे. ही स्ट्रायकर भारतीय संघातून खेळतानाही याच जर्सीत दिसते. रँजर्स क्लबने बाला देवी हिच्याशी १८ महिन्यांचा करार केला आहे. युरोपात व्यावसायिक फुटबॉल खेळताना २९ वर्षीय बाला हिला खूप बाबी आत्मसात करायला मिळणार आहेत, याचा लाभ साहजिकच भारतीय महिला फुटबॉललाही होईल. स्कॉटलंडच्या क्लबसाठी बाला हिने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चाचणी दिली होती, त्या कालावधीत तिने तेथील प्रशिक्षकांना आपल्या नैसर्गिक कौशल्याने प्रभावित केले होते. आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताचे प्रतिनिधित्व करताना बाला हिने यशस्वी कामगिरी नोंदविली आहे. आघाडीच्या फळीत धारदार खेळ करताना तिने ५८ सामन्यांतून ५२ गोल केले आहेत. मणिपूरची राजधानी इंफाळपासून २२ किलोमीटरवर असलेल्या इरेंगबम गावात बाला हिचे फुटबॉल बहरले. तिचे वडील फुटबॉल खेळायचे, साहजिकच तीसुद्धा याच खेळाकडे आकर्षित झाली. २००२ मध्ये तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी मणिपूरच्या संघात निवड झाली, त्यानंतर या मेहनती फुटबॉलपटूने मागे वळून पाहिलेच नाही. लोकेश्वरी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली बाला हिच्या गुणवत्तेला धुमारे फुटले. भारतीय महिला फुटबॉल संघाचे नेतृत्व करण्यापर्यंत मजल गाठली. काही वर्षांपूर्वी बाला देवी मालदीवमधील न्यू रेडियंट स्पोर्टस क्लबतर्फे खेळली होती, पण त्यास व्यावसायिक कराराचा दर्जा नव्हता. रँजर्सचा करार हा मोठा मान आहे. गतवर्षी बाला देवीने स्पृहणीय कामगिरी बजावली होती. भारतीय महिला फुटबॉल संघाने नेपाळमधील दक्षिण आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी बाला हिने ६ सामन्यांत ४ गोल नोंदवून अनुभवाची चुणूक दाखविली होती. २०१८-१९ मोसमातील महिला फुटबॉल लीगमध्ये २६ गोलांचा, तर २५ व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत २१ गोलांचा धडाका राखला होता.

भारतीय फुटबॉलची `दुर्गा`
 बेमबेम हिला कौतुकाने भारतीय महिला फुटबॉलची दुर्गा असे संबोधले जाते. देशातील महिला फुटबॉल सुमारे दोन दशके गाजविल्यानंतर बेमबेम हिने चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा खेळाडू या नात्याने निरोप घेतला. बेमबेम हिचे फुटबॉल खेळातील असामान्य कर्तृत्व देशातील महिला फुटबॉलपटूंसाठी आदर्शदायी आहे. बाला देवी, आशालता देवी, तसेच अन्य महिला फुटबॉलपटू बेमबेम हिलाच आदर्श मानतात. गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले. बेमबेम हिची ती शेवटची स्पर्धा ठरली. त्यानंतर फुटबॉल प्रशिक्षक या नात्याने ती कार्यरत आहे. युवा गुणवत्तेची पारख करून त्यावर पैलू पाडण्याचे काम ती प्रामाणिकपणे करतेय. देशातील युवा फुटबॉलपटूंसाठी बेमबेम हिचे मार्गदर्शन प्रेरणादायी आहे. फुटबॉल मैदानावर झुंजार खेळ केलेली बेमबेम मार्गदर्शक या नात्याने आदर मिळवत आहे. आता पद्मश्री पुरस्कार मिळविणारी देशातील पहिली महिला फुटबॉलपटू हा सन्मान मिळाल्यामुळे तिची कारकीर्द आणखीनच देदीप्यमान झाली आहे.  

संबंधित बातम्या