रॉजर फेडरर परतणार?

किशोर पेटकर
सोमवार, 2 मार्च 2020

क्रीडांगण
 

महान टेनिसपटू रॉजर फेडरर सुमारे तीन-चार महिने स्पर्धात्मक टेनिस कोर्टवर नसेल, कारण उजव्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. तब्बल २० ग्रँड स्लॅम करंडक जिंकलेला हा ३८ वर्षीय दिग्गज पुरुष टेनिसपटू आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेस मुकणार, तसेच दुबई, इंडियन वेल्स, बोगोटा, मियामी येथील स्पर्धेतही खेळणार नाही. शस्त्रक्रियेनंतर जूनमध्ये फेडरर पुन्हा टेनिस खेळण्यास तंदुरुस्त होण्याचे संकेत आहेत. सारे काही नियोजनानुसार झाल्यास स्वित्झर्लंडचा हा ग्रेट खेळाडू विंबल्डनच्या हिरवळीवर खेळताना दिसेल, तसेच टोकियो ऑलिंपिकमध्येही सहभागी होईल. फक्त शरीराने साथ देणे आवश्यक आहे. त्याचे जगभरातील मोठ्या संख्येने असलेले चाहते चिंतीत आहेत. दुखापतीवर मात करणे फेडररसाठी सोपे नसेल. वाढत्या वयामुळे शरीर शस्त्रक्रियेनंतर किती साथ देते यावर पुरुष गटात एकेरीतील सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेल्या फेडररचे पुनरागमन अवलंबून असेल. हा जिगरबाज खेळाडू आशावादी आहे. दुखापत गंभीर नसल्याचा फेडररच्या डॉक्टरांचा दावा आहे. यापूर्वीही स्विस खेळाडूने शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनरागमन केलेले आहे. २०१६ मध्ये त्याने सतावणाऱ्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली, ती यशस्वी ठरली आणि २०१७ मध्ये फेडररने संस्मरणीय कमबॅक केले. ऑस्ट्रेलियन ओपन आणि विंबल्डनमध्ये विजेतेपदाचा करंडक उंचावत या निश्चयी टेनिसपटूने साऱ्यांनाच तोंडात बोटे घालायला लावली. मात्र, तेव्हा तो ३४-३५ वर्षांच्या आसपास होता. आता चाळीशीच्या जवळ पोचला आहे, त्यामुळे साशंकता व्यक्त होत आहे. खेळाडू मनाने कितीही तरुण असला, तरी मैदानावर शरीराची खंबीर साथ हवीच. वाढत्या वयामुळे शरीर दणकट राहील ही शक्यताही उणी असते, चपळतेवरही परिणाम होतो. त्यामुळेच जूनमध्ये नक्कीच फेडरर परतणार का याबातत उत्सुकता आहे.

शरीराकडून असहकार्य
रॉजर फेडररने २०१८ मध्ये शेवटचे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकाविले. त्यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन सहाव्यांदा जिंकली. मात्र, नंतर मोठी स्पर्धा जिंकणे या महान टेनिसपटूस जमलेले नाही. यंदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत फेडररने मजल मारली. मात्र, अगोदरच्या सामन्यांत पाच सेट्समध्ये झुंजलेल्या या दीर्घानुभवी खेळाडूच्या शरीराने असहकार्याचा झेंडा फडकाविला. स्नायू दुखावल्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला, परिणामी उपांत्य लढतीत नोव्हाक जोकोविचने विशेष कष्टाविना फेडररला हरविले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत फेडररने अनुभवाच्या बळावर अचाट खेळ करत विजयश्री खेचून आणली. जॉन मिलमनची कडवी झुंज चार तास व पाच सेट्सच्या खेळात मोडीत काढली, त्यानंतर उपांत्यपूर्व लढतीतही त्याने पाच सेट्समध्ये बाजी मारली. या कालावधीत शरीराच्या तक्रारी कमालीच्या वाढल्या, त्यात उजवा गुडघा खूपच सतावू लागला. शेवटी शस्त्रक्रिया हाच पर्याय ठरला. गेल्या दोनेक वर्षांत फेडरर जिद्दीने खेळत आहे, पण शरीराचा कामगिरीवर परिणाम होत असल्याचेच चित्र पाहायला मिळाले. गतवर्षी अमेरिकन ओपनच्या कालावधीत त्याला पाठदुखीने हैराण केले. त्यापूर्वी श्वसनाचा त्रास, तसेच मनगटानेही त्याला त्रस्त केले. शरीर तक्रारींचा पाढा वाचत असताना, फेडरर मागे हटला नाही. आताही त्याने शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाचा संकल्प जाहीर केला आहे. त्यात तो कितपत यशस्वी ठरेल हे त्याचे शरीरच ठरविणार आहे. पाच सेट्सपर्यंत लढण्यासाठी त्याचे शरीर कणखर असेल का हा प्रश्नच आहेच.

मानांकन घसरणार
स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिल्यामुळे रॉजर फेडररचे जागतिक मानांकन घसरणार हे निश्चित आहे. सध्या तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुमारे तीन महिने जागतिक टेनिसपासून दूर राहिल्यामुळे त्याचे मानांकन गुण कमी होत जातील. त्यामुळे तो टॉप फाईव्ह खेळाडूंमधून बाहेर पडण्याचे संकेत आहेत. पुनरागमन आणखीनच लांबले, तर कदाचित पहिल्या दहा खेळाडूंतही त्याला स्थान मिळणार नाही. रॉजर फेडरर हा जबरदस्त इच्छाशक्तीचा खेळाडू आहे. त्याची गुणवत्ता असामान्य आणि विलक्षण आहे. ३८ व्या वर्षीही तो चाणाक्ष खेळ करताना दिसतोय. शस्त्रक्रिया, नंतरचे रिहॅब सारे काही व्यवस्थित झाल्यास, फेडरर नक्कीच विंबल्डनच्या हिरवळीवर खेळताना दिसेल. ही त्याची सर्वाधिक आवडती स्पर्धा आहे. विंबल्डन स्पर्धेत तो तब्बल आठ वेळा चँपियन ठरला आहे. दोन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत फेडररने १०३ करंडक जिंकले आहेत. १,२४२ विजय नोंदवून महानतेचा ठसा उमटविला आहे. वाढते वय, दुखापत, शस्त्रक्रिया, घसरलेले मानांकन आदी प्रतिकूल बाबींवर मात करत येणाऱ्या काळात फेडररची पुढील वाटचाल आव्हानात्मकच असेल.    

संबंधित बातम्या