एफसी गोवा ‘लीग विनर्स’

किशोर पेटकर
सोमवार, 2 मार्च 2020

क्रीडांगण
 

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सहाव्या पर्वातील अखेरचे सत्र सुरू असताना एफसी गोवा संघात मोठे वादळ उठले. त्यामुळे योग्य दिशेने असलेली या संघाची वाटचाल भरकटण्याची परिस्थिती उत्पन्न झाली. मात्र, खेळाडूंनी माजी प्रशिक्षक व संघ व्यवस्थापन यांच्यातील वादाकडे काणाडोळा करत पूर्णतः खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे एफसी गोवा संघ पहिल्यावहिल्या ‘लीग विनर्स शिल्ड’चा मानकरी ठरला. ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. आशियायी फुटबॉल महासंघाच्या एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय क्लब हा मान गोव्याच्या संघाला मिळाला. एफसी गोवाचे सर्वाधिक ३९ गुण झाले. साखळी फेरीतील १८ सामन्यांत त्यांनी १२ विजय नोंदविले, ३ सामने बरोबरीत राखले आणि ३ पराभव पत्करले. एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडला. स्पॅनिश ‘टिकी-टाका’ शैलीने खेळणारा एफसी गोवा संघ धारदार खेळासाठी प्रसिद्ध आहे. २०१७-१८ च्या मोसमात त्यांनी आयएसएल स्पर्धेत ४३ गोल केले. यंदा प्ले-ऑफ फेरीत खेळण्यापूर्वी ४६ गोल नोंदवून नवा उच्चांक नोंदविला. गतवर्षी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ‘आयएसएल’ला देशातील प्रमुख स्पर्धेचा दर्जा दिला. या स्पर्धेवर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नियंत्रण असले, तरी नीता अंबानी प्रमुख असलेल्या फुटबॉल स्पोर्ट्‌स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांच्यातर्फे ‘आयएसएल’ स्पर्धा आयोजित केली जाते. भारतातील प्रमुख स्पर्धेचा दर्जा मिळाल्यामुळे आशियायी फुटबॉल महासंघाने आयएसएल स्पर्धेतील अव्वल संघाला एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत जागा दिली. त्यानुसार आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत अग्रस्थान मिळविणाऱ्या ‘लीग विनर्स शिल्ड’ विजेत्या संघाला थेट प्रवेश निश्चित झाला.

मुख्य प्रशिक्षकांना डच्चू
एफसी गोवाचे आयएसएल स्पर्धेतील तीन सामने बाकी असताना संघ व्यवस्थापनाशी बिनसल्यामुळे मुख्य प्रशिक्षक स्पेनचे सर्जिओ लोबेरा आणि त्यांच्या दोघा साहाय्यकांना डच्चू देण्यात आला. ४३ वर्षीय लोबेरा संघ व्यवस्थापनावर कमालीचे नाराज होते. अखेरीस त्याचा स्फोट झाला आणि स्पॅनिश प्रशिक्षकांना मोसम संपण्यापूर्वी माघारी जावे लागले. एएफसी चँपियन्स लीगमध्ये जागा मिळविण्यासाठी एफसी गोवास बाकी तीन सामने महत्त्वाचे होते. मुख्य प्रशिक्षकांना डच्चू देण्यात आल्यामुळे एफसी गोवाच्या वाटचालीवर परिणाम होण्याचा धोका होता. तातडीने हंगामी नियुक्ती करताना माजी खेळाडू व आताचे साहाय्यक क्लिफर्ड मिरांडा यांना मुख्य प्रशिक्षकपदी, तर डेरिक परेरा यांना तांत्रिक संचालकपदी नियुक्त करण्यात आले. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली जम बसलेल्या संघातील खेळाडूंनी त्यांच्या अनुपस्थितीतही धडाकेबाज खेळ करत ओळीने तीन सामने, तेही मोठ्या फरकाने जिंकले. हैदराबाद, मुंबई सिटी व जमशेदपूर यांच्याविरुद्ध तीन सामन्यांत एकूण १४ गोल नोंदविले, यावरून एफसी गोवाचा धडाका लक्षात येतो. हंगामी मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर क्लिफर्ड यांनीही संघात मोठे बदल केले नाहीत. लोबेरा यांच्याच पाऊलखुणांवरून त्यांनी राबवलेली शैली पुढे नेली. त्यामुळे खेळाडूंना मैदानावर दबावविरहीत मुक्त शैलीचा खेळ करणे सोपे ठरले.

‘टिकी-टाका’चा प्रभाव
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको यांचे एफसी गोवा संघास आयएसएल स्पर्धेच्या पहिल्या तीन मोसमात मार्गदर्शन लाभले. २०१६ मध्ये संघाची कामगिरी अतिशय खराब झाल्यामुळे झिको यांना गोव्याचा निरोप घ्यावा लागला. जून २०१७ मध्ये लोबेरा यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. स्पेनमधील प्रसिद्ध बार्सिलोना संघाच्या संस्कृतीत वाढलेले आणि तेथील प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रभाव असलेल्या लोबेरा यांनी एफसी गोवा संघात स्पेनमधील नावाजलेली ‘टिकी-टाका’ शैली आणली आणि यशस्वीही ठरविली. या शैलीमुळे एफसी गोवाच्या चाहत्यांत लोबेरा कमालीचे लोकप्रिय ठरले. लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने आयएसएलच्या तीन मोसमात ११६ गोल नोंदविले. आक्रमक हल्ला चढवत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणाऱ्या एफसी गोवाच्या बिनधास्त खेळाने भारतीय फुटबॉलप्रेमींना मोहीत केले. गतमोसमात एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुसंडी मारली, पण बंगळूर एफसीविरुद्ध अतिरिक्त वेळेत गोल स्वीकारल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, मोसमाच्या अखेरीस सुपर कप जिंकला. यंदा ‘लीग विनर्स शिल्ड’ जिंकून एफसी गोवाने ‘टिकी-टाका’ शैलीचा प्रभाव अधोरेखित केला. सलग तीन मोसम एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

संबंधित बातम्या