भारतीय फुटबॉलचे स्वदेशी धोरण

किशोर पेटकर
सोमवार, 1 जून 2020

क्रीडांगण
 

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने तीन वर्षे भारतीय फुटबॉल प्रवाहात होते. ते प्रत्येकवेळी सांगायचे, भारतीय फुटबॉलला उंची गाठायची असल्यास स्वदेशी फुटबॉलपटूंना जास्त संधी मिळायला हवी. भारतीय फुटबॉल मैदानावरील परदेशी खेळाडूंची वाढती संख्या त्यांना टोचत असे. देशी फुटबॉलपटूंनी प्रगती साधली, तरच भारतीय फुटबॉलचा विकास होईल हे त्यांचे आग्रही मत होते. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनीही देशातील लीग स्पर्धेतील परदेशी खेळाडूंच्या जादा संख्येबाबत मागे चिंता व्यक्त केली होती. आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आगामी मोसमापासून परदेशी खेळाडूंची संख्या कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन विदेशी आणि एक आशियायी मिळून एकूण चार परदेशी खेळाडूंना अकरा सदस्यीय संघात खेळविण्याची मुभा क्लब संघांना असेल. २०२०-२१ मोसमापासून आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील संघ या नव्या नियमाचे पालन करतील, तर आयएसएल स्पर्धेतील पूर्णतः व्यावसायिक क्लबनी हा नियम आणखी एका मोसमापर्यंत लांबणीवर टाकण्याचे ठरविले आहे. ३+१ या परदेशी खेळाडूंच्या नियमाचे २०२०-२१ नंतर पालन करण्याचे आयएसएल स्पर्धेने ठरविले आहे. आय-लीग स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आधिपत्याखाली खेळली जाते, तर आयएसएल स्पर्धेचे संयोजन फुटबॉल स्पोर्ट्‌स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांच्यातर्फे केले जाते, त्यामुळे महासंघाला थोडी कळ सोसणे भाग पडत आहे.

आय-लीग संघांची विनंती
भारतीय फुटबॉलचा विचार करता, येथे देशी खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंनाच जास्त भाव मिळतो. आयएसएल स्पर्धा २०१४ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून फुटबॉलची व्यावसायिकता देशात रुजू लागली. परदेशातील दर्जेदार खेळाडू देशातील फुटबॉल मैदानावर खेळताना दिसू लागले. आयएसएल संघांना सात परदेशी खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी होती. ३+१ परदेशी खेळाडू नियम लागू करताना, महासंघाने विविध आय-लीग क्लबच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील दोन्ही लीगमध्ये, आयएसएल आणि आय-लीग स्पर्धेत परदेशी खेळाडूंची संख्या कमी करण्याची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने केली होती, ती कार्यकारी समितीने संमत केली. आशियायी फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) मार्गदर्शक तत्त्वानुसार आता भारतीय क्लबमध्ये परदेशी फुटबॉलपटूंची संख्या असेल. नव्या नियमामुळे भारतीय खेळाडूंना फुटबॉल मैदानावर जास्त वाव मिळेल हे स्पष्टच आहे. परदेशी खेळाडूंची संख्या कमी होत असल्याने आय-लीग क्लबचे अर्थकारणही सुसह्य होईल. ज्या क्लबच्या तिजोरीत जास्त पैसा, ज्यांच्यापाशी भक्कम पुरस्कर्ते आहेत, त्यांना महागडे परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध करणे शक्य होत असे, पण ज्या क्लबांचे अंदाजपत्रक मर्यादित स्वरूपात आहे, त्यांची खूपच तारांबळ उडत असे.

जास्त सामन्यांवर भर
आशियायी फुटबॉल महासंघाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लीगमध्ये क्लबने किमान २७ सामने खेळणे आवश्यक आहे. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळण्यासाठी सामन्यांचा नियम बंधनकारक आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी नव्हे, तर भारतीय खेळाडू आणि भारतीय फुटबॉलच्या सर्वांगीण विकासासाठी देशातील प्रत्येक क्लबने अधिकाधिक सामने खेळणे आवश्यक असल्याचे मत महासंघाने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक हेसुद्धा याच मताचे आहेत. भारतीय फुटबॉल मोसम मे महिन्याच्या मध्यापर्यंत लांबणे आवश्यक असल्याचे स्टिमॅक यांना वाटते. कमी प्रमाणात सामने खेळल्यामुळे खेळाडूंना कौशल्य विकसित करण्याची जास्त संधी मिळत नाही. भारतीय फुटबॉलचे कॅलेंडर दीर्घ कालावधीचे करण्यासाठी सारी रचना बदलावी लागेल. भारतीय फुटबॉलचा ढाचा बदलण्यासाठी प्रयत्न होत आहेत, हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतलेल्या काही निर्णयावरून जाणवते आणि स्टिमॅक यांच्या वक्तव्यावरून जाणवते. भारतीय फुटबॉलपटूंचा दर्जा उंचावला, तरच आंतरराष्ट्रीय मैदानावर संघ प्रगती साधताना दिसेल. पुढील चार-पाच वर्षांचा विचार करून संघ बांधणी करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक स्टिमॅक इच्छुक आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात त्यांनी सीनियर संघात नवोदित खेळाडूंना जास्त संधी दिली. विशेषतः १८ ते २३ वर्षे वयोगटातील खेळाडूंवर भर दिला जात आहे. भविष्याचा विचार करता युवा खेळाडूंवर विश्वास दाखविणे हाच योग्य मार्ग संभवतो. 

संबंधित बातम्या