क्रीडांगण

किशोर पेटकर
बुधवार, 24 जून 2020

किशोर पेटकर
 

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी चटके
अमेरिकेत एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉइड नामक कृष्णवर्णीयाची श्वास कोंडून निघृण हत्या केली. त्याचे पडसाद आता साऱ्या जगात उमटत आहेत. अमेरिकेत कोरोना विषाणूची धग असतानाही अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, अन्य पाश्चात्त्य देशातही कृष्णवर्णीयांना पाठिंबा, समर्थन दर्शविणारी `ब्लॅक लाइव्हज मॅटर` मोहीम धारदार झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णवर्णीय क्रीडापटूही त्यांना सहन कराव्या लागलेल्या वर्णद्वेषाचा उल्लेख करू लागलेत. सामाजिक जीवनात, क्रीडा मैदानावर वर्णद्वेषाला अजिबात थारा नाही, तरीही काही गौरवर्णीयांची मनोवृत्ती बदलत नाही. भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषी उल्लेख होत असल्याचे आता उघड झाले असून ते धक्कादायक ठरले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना आपणास उद्देशून वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली होती, असा दावा वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने केला. आपल्यास आणि श्रीलंकेचा अष्टपैलू थिसरा परेरा याला `काळू` असे संबोधले जात असे, असे सॅमी याने नमूद केले आहे. आयपीएलच्या २०१३ व २०१४ च्या मोसमात सॅमी सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळला होता, तेव्हा त्याचा वर्णभेदावरून कोण उल्लेख करत होते हे सॅमीने जाहीर केलेले नाही, पण वर्णद्वेषी टिप्पणी केलेल्यांनी आपली माफी मागायला हवी, असा आग्रह विंडीजच्या या माजी कर्णधाराचे धरला. सॅमीला हिंदी कळत नाही, त्यामुळे तेव्हा `काळू` या शेऱ्याचा अर्थ समजला नाही. कदाचित तो शब्द सशक्त घोड्यासाठी वापरत असावा असे मानून सॅमीने तेव्हा ती शेरेबाजी खिलाडूवृत्तीने स्वीकारली होती. पण जेव्हा शब्दाचा अर्थ समजला, तेव्हा कमालीचा मनस्ताप झाल्याचे सॅमीचे म्हणणे आहे. वर्णभेदावरून पूर्वी दक्षिण आफ्रिकेने क्रीडा जगतात मोठी शिक्षा भोगलेली आहे. भारतीय हे मिश्रवर्णीय, त्यामुळे आपल्या देशात क्रीडा मैदानावर होणारी वर्णद्वेषी टिप्पणी क्लेशदायक आणि चटके देणारी आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये वर्णभेद!
 भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण २०१४ मध्ये हैदराबाद संघात सॅमीचा सहकारी होता. विंडीजच्या माजी कर्णधाराच्या सनसनाटी आरोपासंदर्भात इरफानने कानावर हात ठेवले, पण देशातील स्थानिक क्रिकेटमध्ये वर्णभेद अतिशय तीव्र असल्याचे इरफानचे म्हणणे आहे. तशी कबुली त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेली आहे. इरफानने क्रिकेटमुळे देशातील विविध भागात प्रवास केलेला आहे. देशाच्या दक्षिण भागातील क्रिकेटपटूंना वर्णभेदी शेरेबाजीस सामोरे जावे लागते. भारताच्या उत्तर आणि पश्चिम विभागातून अधिक प्रमाणात वर्णद्वेषी शेरेबाजी होते, असा इरफानचा दावा आहे. बहुतांश वेळा प्रेक्षक वर्णद्वेषी गरळ ओकण्यात आघाडीवर असतात. मैदानावरील खेळाडूंच्या स्लेजिंगला काहीवेळा वर्णभेदाची हीन किनार असते. साहजिकच वर्णभेदामुळे संबंधित क्रीडापटूची मनःस्थिती किती भीषण होते याची कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे. काही जण थट्टेच्या स्वरात वर्णद्वेषी शेरेबाजी करतात, पण त्याच्या वेदना झेलताना संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या खच्ची होतो, याचे भान राखले जात नाही. काही दिवसांपूर्वी, तामिळनाडूचा अभिनव मुकुंद व कर्नाटकचा दोड्डा गणेश या क्रिकेटपटूंनी त्यांच्यावरील वर्णद्वेषी शेरेबाजीचा जाहीर उल्लेख केला होता. गणेश याचे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवरील होते, तर मुकुंदने आपण कृष्णवर्णीय असल्याने अपमान झेलावा लागल्याचे नमूद केले आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून मुकुंद देशात आणि परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी दौरे करतोय, बऱ्याच वेळा त्याच्या शरीराच्या रंगाकडे पाहून नाक मुरडले गेले, पण वर्णभेदाला सामोरे जात मुकुंदने दुर्लक्ष केले, कारण उच्च पातळीवर जाण्याचे त्याचे ध्येय होते. मात्र, सारेच मुकुंदप्रमाणे सशक्त मनोवृत्तीचे नसतात. वर्णावरून होणारी टिंगल-टवाळी, उपहास यांमुळे उद्दिष्टापासून दूर पळणारे बरेच असतात.

वर्णभेदाबाबत जागृती हवी
खेळाडूवर वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित प्रेक्षक, खेळाडू, अधिकारी आदींवर कारवाई झाल्याच्या नोंदी जगभरात आहेत. भारतात केवळ क्रिकेटमध्येच नव्हे, तर अन्य खेळांच्या मैदानावरही वर्णद्वेष आढळल्यास कडक कारवाई व्हायला हवी. आपला देश खंडप्राय आहे. भिन्न संस्कृती, वर्णाचे नागरिक आहेत. बऱ्याच वेळा वर्णभेदविषयक अविवेकी उल्लेखाकडे दुर्लक्ष केले जाते, तक्रार नोंदविली जात नाही, त्यामुळे विदुषकी वृत्तींचे फावते. वर्णभेदास खतपाणी घालणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, त्याचवेळी या प्रकरणी जागृतीही गरजेची आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्व क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींनाही वर्णभेदाबाबत शिक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजप्रबोधन हवे, तरच वर्णभेद रोखला जाऊ शकतो.

युरोपातील फुटबॉल `ट्रॅक`वर
जर्मन फुटबॉलमधील बुंडेस्लिगाने सकारात्मक वाट दाखविल्यानंतर, त्या मार्गावरून आता स्पेनमधील तीन महिने खंडित झालेल्या ला-लिगाने मार्गक्रमण सुरू केले आहे. इटलीतही क्लब फुटबॉलचे सुधारित वेळापत्रक निश्चित आहे, तर इंग्लंडमधील प्रिमिअर लीगही पुन्हा सुरू होण्याच्या टप्प्यात आहे. युरोपातील क्लब फुटबॉलने कोरोना विषाणू महामारीस शह देत स्पर्धात्मक ट्रॅकवर येण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आरोग्य सुरक्षेसाठी प्रचंड उपाययोजना, दक्षता यांचा अवलंब झालेला आहे. नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. फक्त सामने रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळले जात आहेत. गोल केल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त जल्लोषात फुटबॉलपटूंना आनंद साजरा करता येत नाही, ही त्रुटी वगळता व्यावसायिक पातळीवरील फुटबॉलमधील चुरस कायम आहे. पाच बदली खेळाडूंचा नियम नवलाईचा ठरतोय. जर्मनीत बायर्न म्युनिकने बुंडेस्लिगा विजेतेपद सलग आठव्यांदा जवळपास निश्चित केले आहे. स्पेनमध्ये बार्सिलोना आणि रियल माद्रिद यांच्यात चढाओढ असेल. जर्मन लीग सुरू असताना खेळणाऱ्या संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कर्मचारी कोविडविरहीत असतील, यावर कटाक्ष पुरविण्यात आला आहे. ला-लिगा स्पर्धेतही कोणतेही विघ्न येऊ नये अशी प्रार्थना आयोजक करत असतील, कारण कोविडबाधित सापडल्यास साऱ्या मेहनतीवर पाणी फेरण्याचा धोका असेल. 
एकोणचाळीस दिवसांत ११० सामने

 ला-लिगा फुटबॉल स्पर्धा नव्या मोसमापूर्वी संपविण्याचे आव्हान आहे. ३९ दिवसांत ११० सामने होणार आहेत. कमी कालावधीत जास्त सामने हे कोविड-१९ विरोधी लढ्याइतकेच आव्हानात्मक आहे. साडेपाच आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक क्लब सरासरी तीन दिवसांत एक सामना खेळेल. साहजिकच खेळाडूंची तंदुरुस्ती या कालावधीत निर्णायक असेल. कोरोना विषाणूचा स्पेनला मोठा झटका सहन करावा लागला. ला-लिगा आयोजक खूपच सावध आहेत. त्यामुळे मैदानावर खेळाडूंसाठी मास्क आणि ग्लोव्हज बंधनकारक करण्यात आले आहेत. नियमितपणे सामन्याशी संबंधित सर्वांचे शारीरिक तापमानही तपासले जाईल. स्पेनमधील उन्हाळ्याचाही खेळाडूंना त्रास संभावित आहे. त्यामुळे दोन ड्रिंक ब्रेकचीही तजवीज करण्यात आली आहे. एकंदरीत संकटे खूप असली, तरी मागे हटायचे नाही, निर्धाराने पुढे जाण्याचेच धोरण युरोपातील क्लब फुटबॉलने अवलंबिले आहे. त्यास स्पर्धेशी संबंधित प्रचंड अर्थकारणही कारणीभूत आहे. स्पर्धा अर्धवट राहिल्या असत्या, तर साऱ्यांनाच मोठी तूट सहन करावी लागली असती. बार्सिलिनोच्या अवाढव्य कँप नोऊवर सारे स्टँड्स रिकामे असताना सामना खेळण्याचा अनुभव खेळाडूंसाठी काहीसा विचित्रच असेल. या स्टेडियमची आसन संख्या ९९ हजारांहून जास्त आहे. बार्सा पाठिराख्यांच्या तुफानी जल्लोषास मुकावे लागण्याची सल खेळाडूंना असेलच. 

भारतातही सुरू होणार मोसम
 मार्च महिन्याच्या मध्यास भारतीय फुटबॉल स्थगित झाले. कोरोना विषाणू महामारी साथीचा फैलाव त्यास कारणीभूत होता. त्यानंतर २०१९-२० मोसम अपूर्णावस्थेत संपवावा लागला. गुणतक्त्यात मोठी आघाडी घेतल्यामुळे मोहन बागानच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले, पण वयोगटातील बाकी सामने अर्ध्यावरच राहिले. सुमारे पाचशेच्या आसपास सामने होऊ शकले नाहीत. आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने २०२०-२१ मोसम येत्या १ ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. नव्या मोसमाची नियोजित तारीख कोरोना विषाणू साथीच्या देशातील परिस्थितीवर अवलंबून असेल. महासंघ ठरल्यानुसार मोसम सुरू करण्यावर ठाम राहिल्यास कदाचित बंद दरवाजाआड मोजक्याच केंद्रांवर सामने होऊ शकतात. महासंघाने अजून पूर्ण नियोजन जाहीर केलेले नाही, मात्र मोसमाची तारीख जाहीर केल्यामुळे भारतीय फुटबॉलमध्ये आश्वासकता आहे. भारतीय फुटबॉल संघाचा आंतरराष्ट्रीय मोसम ८ ऑक्टोबरपासून सुरू होईल. कोविड-१९ मुळे २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी स्थगित झाली आहे. फिफाने आता ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. विश्वकरंडक पात्रता लढतींनी जगभरात आंतरराष्ट्रीय मोसमास गती येईल. भारताचेही तीन सामने बाकी आहेत. विश्वकरंडक पात्रतेची पुढील फेरी गाठण्याबाबत भारताचे आव्हान खूपच धूसर आहे, पण आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी भारताला बाकी तिन्ही सामने महत्त्वाचे असतील. भारतीय फुटबॉल संघ ८ ऑक्टोबरला आशियायी विजेत्या कतारचे यजमानपद भूषवेल. त्यानंतर १२ नोव्हेंबरला बांगलादेशला अवे सामन्यात आव्हान देईल आणि घरच्या वातावरणात १७ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. सध्या भारत जागतिक मानांकनात १०८ व्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या