फिरकीपटू रजिंदर गोयल

किशोर पेटकर
सोमवार, 6 जुलै 2020

क्रीडांगण

भारतीय क्रिकेटमधील महान डावखुरे फिरकी गोलंदाज रजिंदर गोयल यांनी देशांतर्गत क्रिकेट गाजविले, पण त्यांना कसोटीपटू हा मान मिरवता आला नाही. त्यांची फिरकी गुणवत्ता कमनशिबीच ठरली. इरापल्ली प्रसन्ना व एस. व्यंकटराघवन हे ऑफस्पिनर, भागवत चंद्रशेखर हे लेगस्पिनर आणि डावखुरा फिरकीपटू बिशनसिंग बेदी ही भारताची चौकडी कसोटी क्रिकेटची मैदाने गाजवित असताना, रजिंदर यांची गुणवत्ता दुर्लक्षितच राहिली. बेदी एकदा संघाबाहेर गेले असता, रजिंदर नक्कीच कसोटी क्रिकेट खेळण्याची शक्यता होती, तरीही संधी हिरावली गेली. `ये सब किस्मत का खेल है...` असे म्हणत रजिंदर यांनी निराशावाद झटकत, क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. त्यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकीर्द तब्बल अडीच दशकांची ठरली. या काळात ते १५७ प्रथम श्रेणी सामने खेळले. १८.५८ च्या सरासरीने ७५० बळी टिपले, त्यांपैकी ६३७ विकेट्स त्यांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मिळविल्या. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. पंजाब, दिल्ली व हरियाणा या राज्यांकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळले. रजिंदर आणि मुंबईचे पद्माकर शिवलकर यांची गुणवत्ता शेवटपर्यंत शापितच राहिली. देशांतर्गत क्रिकेट खेळत रजिंदर वयाच्या ४२ व्या वर्षी निवृत्त झाले. वयाची चाळीशी उलटूनही त्यांची उमेद तरुणांना लाजवील अशीच होती. निवृत्तीनंतर खेद-निराशा यांना छेद देत निस्वार्थी भावनेने त्यांनी नवोदितांना प्रोत्साहन देण्याचा विडा उचलला. हरियाना क्रिकेट संघटनेशी ते बराच काळ संघ निवडीच्या अनुषंगाने सक्रिय राहिले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१७ मध्ये रजिंदर यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. कसोटी खेळण्यापासून डावललेल्या रजिंदर यांच्या जखमेवरील ही मलमपट्टी ठरली. नुकतेच वयाच्या ७७ व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधील या दिग्गज फिरकीपटूने पृथ्वीतलावरील प्रवास आटोपता घेतला.

हुकलेली संधी
आपल्यापेक्षा रजिंदर चांगले डावखुरे फिरकीपटू होते, पण आपण नशिबवान ठरल्यामुळे भारतीय संघातून खेळू शकलो, असे भाष्य खुद्द बिशनसिंग बेदी यांनी आपल्या मित्राच्या निधनानंतर व्यक्त केले. रजिंदर आणि बेदी दिल्लीच्या संघातून खेळले. संघ निवडीच्या बाबतीत ते प्रतिस्पर्धी, दोघेही डाव्या हाताने चेंडूला फिरक देणारे, पण त्यांच्यातील मैत्रीचे बंध कायम राहिले. बेदी यांच्या मते, त्यांच्या तुलनेत रजिंदर यांची फिरकी किंचित जलद, अधिक उंची न घेणारी आणि जास्त अचूक होती. कौशल्याच्या बाबतीतही रजिंदर दर्जेदार असूनही कसोटी खेळण्याचा मान आपणास मिळाला हे बेदी स्वीकारतात, हा रजिंदर यांचा गौरवच आहे. नोव्हेंबर १९७४ मध्ये पाहुण्या वेस्ट इंडीजविरुद्ध रजिंदर बंगळूर येथील कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता होती. कारण शिस्तभंगाच्या कारवाईमुळे बेदी यांचे संघातून निलंबन झाले होते. बेदींच्या जागी रजिंदर यांना घेतले नाही. प्रसन्ना, व्यंकटराघवन व चंद्रशेखर हे फिरकी त्रिकुट खेळले. त्याकाळी भारतीय संघ व्यवस्थापन व निवड समितीने कसोटीत एकावेळी बेदी व रजिंदर या डावखुऱ्या फिरकीपटूंना खेळविण्याचा प्रयोग जाणीवपूर्वक टाळला, पण त्याच वेळी दोघे ऑफस्पिनर संघातून एकावेळी खेळले. हा विरोधाभास रजिंदर यांना जाणवत होता, पण त्यांनी कधी जाहीर तक्रार केली नाही किंवा बाऊही केला नाही. 

संमोहित करणारी फिरकी
रजिंदर गोयल यांची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांना संमोहित करत असे. फिरकी गोलंदाजी लीलया खेळणारे महान फलंदाज विजय मांजरेकर यांचा भक्कम बचावही रजिंदर यांच्या प्रभावी फिरकीने भेदला होता. जगविख्यात शास्त्रोक्त फलंदाज सुनील गावसकर यांची एकाग्रता भंग करताना, रजिंदर यांच्या फिरकीने पाच वेळा सुनील यांच्या संयमास दंश केला होता. आपण खेळलेल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांत रजिंदर यांची फिरकी जास्त भयभीत करणारी होती हे कबूल करताना, गावसकर यांनी या दिग्गज फिरकीपटूस आपल्या 'आयडॉल्स' या पुस्तकात मानवंदना दिली आहे. रजिंदर यांची गोलंदाजी शैली ओघवती आणि नयनरम्य होती, विलक्षण कौशल्यासह ते फलंदाजास मोहित करत. चेंडू जादूई फिरक घेत फलंदाजाचा बचाव चिरायचा. ते चेंडूला आज्ञेत राखत प्रतिस्पर्धी फलंदाजाचे तंत्रकौशल्य भेदण्यात पटाईत होते. त्यांची डावखुरी फिरकी गोलंदाजी शैली नवोदितांसाठी आदर्शवत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजी परंपरेतील हे अजरामर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी या क्रिकेटपटूची जिद्द, जिगर, सचोटी चिरतरुण आहे.  

संबंधित बातम्या