झिदानच्या माद्रिदची सरशी

किशोर पेटकर
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

क्रीडांगण

स्पॅनिश फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा ला-लिगा करंडक रेयाल माद्रिदने ३४व्यांदा जिंकला. यावेळच्या स्पर्धेची एक फेरी बाकी असताना रेयाल माद्रिदने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचे पुनरागमन संघासाठी फलदायी ठरले. माद्रिदच्या या नामांकित संघाने ला-लिगा २०१६-१७ मोसमात ३३व्यांदा जिंकली होती. त्यानंतर त्यांचा जगप्रसिद्ध पोर्तुगीज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने संघाला गुडबाय करून इटलीतील युव्हेंटस संघाशी घरोबा केला. रोनाल्डोनंतर दोन मोसम रेयाल माद्रिदला सूर गवसला नाही. 

या संघाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोना संघाने मक्तेदारी राखली. माजी खेळाडू झिनेदिन झिदान यांच्या मार्गदर्शनाखालीच रेयाल माद्रिदने शेवटच्या वेळी ला-लिगा करंडकासह जल्लोष केला होता. २०१८ मध्ये रेयाल माद्रिदला चँपियन्स लीगमध्ये सलग तिसरे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर, त्याच वर्षी मेअखेरीस झिदान यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. झिदान यांच्यानंतर रेयाल माद्रिदची गाडी रुळावरून साफ घसरली. परिणामी गेल्या वर्षी मार्चमध्ये फ्रान्सच्या माजी जगज्जेत्या खेळाडूस प्रशिक्षकपदी पुन्हा पाचारण करावे लागले. ४८ वर्षीय झिदान यांनी विश्वास सार्थ ठरवत रेयाल माद्रिदला पुन्हा स्पेनमधील चँपियन क्लब बनविले. झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदच्या मातब्बर संघाने सर्व स्पर्धा मिळून अकरावा करंडक प्राप्त केला आहे. खेळाडू या नात्याने झिदान यांनी रेयाल माद्रिदतर्फे ला-लिगा व चँपियन्स लीग जिंकलेली आहे. राफेल बेनिटेझ यांच्याकडून झिदान यांनी जानेवारी २०१६ मध्ये रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर या संघाने ला-लिगा दोन वेळा, तर चँपियन्स लीग तीन वेळा जिंकली आहे. 

बार्सिलोना संघ पिछाडीवर
रेयाल माद्रिदच्या ३४ ला-लिगा विजेतेपदांच्या तुलनेत बार्सिलोना संघाने २६ वेळा स्पेनचा विजेता क्लब होण्याचा मान मिळविला आहे. युरोपातील इतर फुटबॉल लीगप्रमाणे ला-लिगाही कोरोना विषाणू महामारीमुळे खंडित झाली होती. स्पेनमधील कोविड-१९चा हाहाकार पाहता स्पर्धा अर्ध्यावरच राहण्याची भीती होती, पण परिस्थिती हळूहळू आटोक्यात आल्यानंतर ला-लिगा स्पर्धा आरोग्यविषयक कठोर नियमांच्या अंमलबजावणीसह सुरू झाली. रेयाल माद्रिदने कोविडमुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीचा कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होऊ दिला नाही. ओळीने दहा सामने जिंकण्याचा पराक्रम साधत त्यांनी ८६ गुण नोंदवत बार्सिलोना (७९ गुण) संघाला मागे टाकले. स्पर्धेची एक फेरी बाकी असताना झिदान यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने व्हिलार्रेयालवर मात करून सात गुणांची आघाडी घेतली, त्याच कालावधीत बार्सिलोनास ओसासुना संघाकडून धक्कादायक हार पत्करावी लागली. यामुळे विजेता कोण या प्रश्नाच्या उत्तरासाठी शेवटच्या ३८व्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागली नाही. बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीही संघाच्या खराब कामगिरीने हताश झाला. विजेतेपद निसटल्यानंतर रागाने त्याने सध्याचा बार्सिलोना संघ बारा वर्षांतील सर्वांत खराब असल्याचे जाहीरपणे सांगितले. मागील दोन मोसम स्पॅनिश फुटबॉलमध्ये दरारा राखलेल्या क्विके सेटिन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला यंदा लौकिक राखता आला नाही. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांना सेव्हिला, सेल्टा व्हिगो या संघाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर ३७व्या लढतीत हार पत्करावी लागल्यामुळे ला-लिगा विजेतेपदाची हॅटट्रिक साधणे शक्य झाले नाही.

विजेतेपदाकडे घोडदौड
खंडित ला-लिगा सुरू झाल्यानंतर रेयाल माद्रिदने कमाल तीस गुणांची कमाई करत विजेतेपदावर हक्क सांगितला. प्रत्येक सामन्यात विजय मिळवत झिदानच्या संघाने घोडदौड राखली. या वर्षी मार्चमध्ये त्यांनी बार्सिलोनावर महत्त्वपूर्ण विजय प्राप्त केला होता. झिदान यांनी प्रशिक्षकपदी पुनरागमन केल्यानंतर संघाची एकजुटीने बांधणी केली. त्यामुळे खेळाडू आपापसातील मतभेद, अहंभाव विसरून मैदानावर सक्रिय झाले. रेयाल माद्रिदच्या ला-लिगा यशाचे श्रेय कर्णधार सर्जिओ रामोस याने प्रशिक्षक झिदान यांना दिलेले आहे. प्रशिक्षकाने संघाला योग्य दिशा दाखविताना खेळाडूंवर पूर्ण विश्वास दाखविल्यामुळेच ला-लिगा करंडक जिंकता आला असे कर्णधारास वाटते. रामोस हा बचावपटू, पण यंदा त्याने आपले गोल करण्याचे कसबही विकसित केले. त्याचे पेनल्टी फटके अचूक ठरले. रेयाल माद्रिदचे विजेतेपद निश्चित करताना ३२ वर्षीय करीम बेन्झेमा याने मोसमातील वैयक्तिक गोलसंख्या २१ वर नेली. थिबौट कोर्टोईस याचे भक्कम गोलरक्षण आणि दक्षताही रेयाल माद्रिदसाठी निर्णायक ठरली. ख्रिस्तियानो रोनाल्डोची सोडचिठ्ठी, गॅरेथ बेल आणि जेम्स रॉड्रिगेझ या हुकमी खेळाडूंचा हरपलेला सूर यांचा बाऊ न करता झिदान यांनी बहारदार सांघिक खेळाच्या बळावर रेयाल माद्रिदला चँपियन बनविल्याने ते कौतुकास पात्र ठरतात.

संबंधित बातम्या