‘पंचशतकी’ स्टुअर्ट ब्रॉड!

किशोर पेटकर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

क्रीडांगण

वर्ष २००७ च्या टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. रोमहर्षक अंतिम लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून टीम इंडियाने टी-२० विश्‍वकरंडक जिंकला. याच स्पर्धेत भारताच्या डावखुऱ्या युवराज सिंग याने धडाकेबाज फलंदाजीने विक्रमाशी बरोबरी साधली होती. डर्बन येथील किंग्जमीडवर युवराजने इंग्लंडच्या युवा वेगवान गोलंदाजाच्या एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकून विक्रमी नोंदवहीत स्थान मिळविले. तेव्हा इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड विशीच्या आसपास होता. या नवख्या गोलंदाजाने अगोदरच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. युवराजने दिलेल्या तडाख्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड नाउमेद झाला नाही. मोठ्या जिद्दीने आणि अथक परिश्रमाच्या बळावर कारकीर्द पुढे रेटली. कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा खुद्द युवराजनेच इंग्लंडच्या या दिग्गज वेगवान गोलंदाजाचे कौतुक केले. अथक मेहनत, समर्पित वृत्ती आणि दृढनिश्चयाच्या बळावर यश प्राप्त केल्याबद्दल ‘ब्रॉडी’चे अभिनंदन करण्याचे आवाहन युवराजने आपल्या चाहत्यांना केले. 

स्टुअर्ट ब्रॉड आता इंग्लंडच्या मोजक्या सफल गोलंदाजांपैकी एक आहे. वेगवान गोलंदाजांना शरीर जपत कारकीर्द पुढे न्यावी लागते. दुखापतींचा धोका जास्त असतो. वेगवान गोलंदाजीतील धार आणि तीक्ष्णता कमी न होऊ देता ब्रॉडने पंचशतकी बळींना गवसणी घातली. तो निश्चितच आदरास पात्र आहे. कोविड-१९ संकटकाळात वेस्ट इंडीजविरुद्धच्या जैव सुरक्षा कवचातील कसोटी क्रिकेट मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडने मैलाचा दगड पार केला. मँचेस्टरच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने विंडीजचा सलामीवीर क्रेग ब्राथवेट याला पायचीत बाद करून पाचशे बळींचा टप्पा गाठला. पहिल्या डावात ६ व दुसऱ्या डावात ४ असे एकूण १० बळी त्याने या सामन्यात मिळविले, शिवाय पहिल्या डावात अर्धशतकही केले. साऊदॅम्प्टनच्या पहिल्या कसोटीसाठी त्याला संघात स्थान मिळाले नव्हते, त्यामुळे इंग्लंडचा हा अनुभवी गोलंदाज चिडला होता. नंतरच्या दोन्ही कसोट्यांमध्ये स्थान मिळाल्यानंतर आपले अजूनही नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले.

अँडरसनला आव्हान
बळींचे पंचशतक साजरे केल्यानंतर देशवासीय जेम्स अँडरसन याला स्टुअर्ट ब्रॉडचे आव्हान असेल. दोघेही समकालीन. अँडरसन आणि ब्रॉडने नवा चेंडू यशस्वीपणे हाताळताना कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचे वेगवान गोलंदाजीतील काम सोपे केले. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये पाचशेहून जास्त गडी बाद करणारे सातच गोलंदाज आहेत. त्यात आता दोघे इंग्लंडचे आहेत. अँडरसनने १५३ कसोटींत ५८९ विकेट्स मिळविल्या आहेत. वयाच्या ३८व्या वर्षी त्याला सहाशे बळी मिळविण्याचे वेध लागले आहेत. अँडरसनचे कौतुक करायलाच हवे. त्याने काळजीपूर्वक, दुखापतींपासून दूर राहत कसोटी कारकीर्द लांबविताना सफलही ठरविली. अँडरसन आणि ब्रॉड यांच्यात चार वर्षांचा फरक आहे. एका मुलाखतीत अँडरसनप्रमाणे कसोटी कारकीर्द लांबविण्याचे ध्येय असल्याचे स्टुअर्ट ब्रॉडने सांगितले. सध्या त्याने १४० कसोटींत ५०१ गडी बाद केले आहेत. अँडरसन व ब्रॉड यांच्यात आता ८८ बळींचा फरक आहे. ३४ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने विचारपूर्वक आणि दुखापतींपासून दूर राहत वाटचाल राखल्यास तो येत्या काही वर्षांत इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरू शकेल. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (५६३ बळी) व वेस्ट इंडीजचा कर्टनी वॉल्श (५१९ बळी) यांना मागे टाकावे लागेल. फॉर्म चांगला राहिल्यास ब्रॉड भारताच्या अनिल कुंबळेने गाठलेला ६१९ बळींचा टप्पा पार करू शकतो, मात्र श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) व ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८ बळी) हे महान फिरकीपटू त्याच्यासाठी दूरचेच असतील.

वडिलांच्या पावलांवरून...
स्टुअर्टचे वडील ख्रिस ब्रॉड हे इंग्लंडचे माजी कसोटी सलामीवीर. १९८४ ते १९९८९ या पाच वर्षांच्या कारकिर्दीत ख्रिस यांनी २५ कसोटींत सहा शतकांसह १६६१ धावा केल्या. स्टुअर्टही आपल्या वडिलांसारखीच डावखुरी फलंदाजी करतो, पण उजव्या हाताने गोलंदाजी करतो. त्यालाही वडिलांप्रमाणेच फलंदाज व्हायचे होते,  

मात्र नंतर त्याचा दृष्टिकोन बदलला. सहा फूट पाच इंच उंचीच्या या क्रिकेटपटूने वेगवान गोलंदाजीचे कौशल्य आत्मसात करत जबरदस्त वेग आणि स्विंग राखला. त्या जोरावर त्याने डिसेंबर २००७ मध्ये कोलंबो येथील श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेट कारकिर्दीचा शुभारंभ केला. स्टुअर्टची फलंदाजीतील गुणवत्ता इंग्लंडच्या संघासाठी तळाच्या क्रमात फारच उपयोगी ठरते. त्याने एका शतकासह ३२८४ धावा केल्या आहेत. साहजिक त्याला अष्टपैलू म्हणूनही ओळखले जाते. 

संबंधित बातम्या