भारताचे फुटबॉल ‘वनवासा’त

किशोर पेटकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

क्रीडांगण
 

भारतीय फुटबॉलसाठी २०२० हे वर्ष आंतरराष्ट्रीय मैदानावर एका वेगळ्याच कारणास्तव लक्षात राहील. कोरोना विषाणू महामारीमुळे भयग्रस्त ठरलेले हे वर्ष भारताला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पूर्णपणे रिक्त ठरले आहे. २०२० मध्ये भारतीय फुटबॉलपटू एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाहीत हे स्पष्ट झालेय. 

कोविड-१९ मुळे या वर्षअखेरपर्यंत भारताचे सर्व आंतरराष्ट्रीय सामने रद्द करावे लागलेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे जागतिक फुटबॉल महासंघाने (फिडे) आशिया विभागातील फुटबॉल लढती २०२१ पर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. २०२२ मध्ये कतारमध्ये विश्‍वकरंडक स्पर्धा आणि २०२३ मध्ये चीनमध्ये आशिया करंडक स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धांतील पात्रता लढती बाकी आहेत, त्या येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळविण्याचे नियोजन होते. आशियाई देशातील कोरोना विषाणूचा प्रभाव पाहून फिफाने साऱ्या लढतीत २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचे ठरविले. त्यामुळे भारताच्या पात्रता फेरीतील बाकी तिन्ही लढती होणार नाहीत. भारतीय फुटबॉलपटू आता आंतरराष्ट्रीय मैदानाऐवजी इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना दिसतील. आयएसएल स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्ट्‍स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी यंदाची आयएसएल स्पर्धा एकाच ठिकाणी जैवसुरक्षा वातावरणात रिकाम्या स्टेडियमवर घेण्याचे ठरविले आहे. स्पर्धा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याचे नियोजन आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल नसल्यामुळे भारतीय खेळाडू आपापल्या क्लब संघातून खेळताना दिसतील.

सक्तीचे लॉकडाउन
आंतरराष्ट्रीय मैदानावर कोरोना विषाणूमुळे भारतीय संघाला सक्तीच्या लॉकडाउनला सामोरे जावे लागत आहे. भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला झाला होता. तेव्हा मस्कत येथे भारताला ओमानकडून ०-१ फरकाने हार पत्करावी लागली होती. त्यानंतर त्यांचा पुढील सामना या वर्षी २६ मार्च रोजी भुवेश्वर येथे कतारविरुद्ध होणार होता, तर ई गटातील बाकी दोन्ही लढती जूनमध्ये होत्या. कोरोना विषाणूमुळे मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाउन आले आणि कतारविरुद्ध सामना लांबणीवर पडला. जगव्यापी कोरोना विषाणूचे संक्रमण कायम राहिल्यामुळे फिफाने जूनमध्ये होणाऱ्या लढतीही रद्द केल्या. त्यानंतर भारत आणि कतार यांच्यातील लढत ऑक्टोबरच्या सुरुवातीस घेण्याचे ठरले होते, आता ही लढतही पुन्हा पुढे ढकलण्यात आल्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय मैदानावरील आगमन लांबले आहे. फिफाने सामने पुढे ढकलल्यामुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रोएशियन इगोर स्टिमॅक यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतात परतण्याची घाई नसेल. या वर्षी मार्चपासून भारतीय फुटबॉलपटू क्लब पातळीवरील मैदानापासून दूरच आहेत. आयएसएल स्पर्धेची घोषणा झालेली आहे, त्यामुळे खेळाडूंना दिलासा मिळाला आहे, पण संघांचा सराव सुरू झालेला नाही. सक्तीच्या दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर उतरताना फुटबॉलपटूंना शारीरिक आव्हान पार करावे लागेल. त्यांच्या शरीराच्याही कुरबुरी असतीलच.

अजूनही छेत्रीवर अवलंबून
विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीचा पुढचा टप्पा गाठण्याची भारतीय संघाला संधी नाही. पाच संघांच्या ई गटात भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या गटातून बलाढ्य कतार व ओमानची आगेकूच नक्की आहे. त्यांच्या तुलनेत भारतीय संघ खूपच मागे आहे. पाच लढतीतून भारताच्या खाती फक्त तीन गुण आहेत. कतार, बांगलादेश व अफगाणिस्तान या संघाविरुद्ध परतीचे सामने बाकी आहेत. भारताने तीन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीत रोखून गुणांची कमाई केली आहे. बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्याविरुद्धही भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीतील बाकी तिन्ही लढतींकडे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक भविष्यातील संघ बांधणी या नजरेने पाहू शकतात. विश्‍वकरंडक पात्रता फेरीतील कामगिरी पाहता, कर्णधार सुनील छेत्री याच्यावर भारतीय संघ खूपच विसंबून राहतोय हे सिद्ध झालेले आहे. छेत्रीची जागा घेणारा धडाकेबाज आघाडीपटू अजून दृष्टिक्षेपात नाही. फुटबॉलमध्ये जिंकण्यासाठी गोल करणारा सातत्यपूर्ण स्ट्रायकर हवा असतो. पात्रता फेरीतील पाच लढतीत भारताला फक्त तीनच गोल नोंदविता आले. भारतीय संघ ३६ वर्षीय छेत्रीवरच खूप अवलंबून आहे. दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिया  

निवृत्तीच्या वाटेवर होता, त्या कालावधीत २००५ मध्ये छेत्रीचा भारताच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघात उदय झाला होता. आता छेत्री कारकिर्दीच्या संध्याकाळात वावरत असताना त्याच्या जवळपास जाणारा आघाडीपटू सापडत नाही हीच भारतीय फुटबॉलची मोठी खंत आहे. छेत्रीचे भारतीय फुटबॉलमधील योगदान फार मोठे आहे. १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत या चपळ फुटबॉलपटूने ११२ सामन्यांत ७२ गोल नोंदवून भारतीय फुटबॉलमध्ये देदीप्यमान कामगिरी बजावली आहे. 

संबंधित बातम्या