बायर्न म्युनिकची गरुडझेप

किशोर पेटकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

क्रीडांगण

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जर्मनीतील फुटबॉलमध्ये बलाढ्य बायर्न म्युनिक संघाची स्थिती बिकट होती. त्यांच्यापाशी स्टार फुटबॉलपटू होते, पण मैदानावरील कामगिरीत सातत्य नव्हते. जर्मनीतील अव्वल श्रेणी बुंडेस्लिगा स्पर्धेत पहिल्या तीन संघांतही ते नव्हते. त्यातच त्यांना आईनट्रॅक्ट फ्रँकफर्ट संघाकडून नामुष्कीजनक हार पत्करावी लागली. बायर्न म्युनिकच्या संघ व्यवस्थापनाच्या संयमाचा बांध फुटला. निको कोव्हाच यांना प्रशिक्षकपदावरून डच्चू मिळाला. संघाचे साहाय्यक प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक यांची अंतरिम मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. बायर्न म्युनिकची घसरलेली गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली आणि २२ डिसेंबर २०१९ रोजी ५५ वर्षीय फ्लिक संघाचे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक झाले. कोरोना विषाणू महामारीमुळे मार्चपासून सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत युरोपातील व्यावसायिक फुटबॉल ठप्प झाले. रिकामे स्टेडियम आणि आरोग्यसंरक्षक कडक उपाययोजना इत्यादींच्या अंमलबजावणीने व्यावसायिक क्लब फुटबॉल सर्वप्रथम जर्मनीत सुरू झाले. बायर्न म्युनिकने धडाका राखत सलग आठव्या वर्षी बुंडेस्लिगा करंडक राखला. त्यानंतर जर्मन कपही पटकाविला आणि नुकतेच चँपियन्स लीग स्पर्धा जिंकून सहाव्यांदा युरोपातील चँपियन क्लब हा मान मिळविला. 

गेल्या नोव्हेंबरमध्ये याच संघाला शेलकी विशेषणे जोडली जात होती. बायर्न म्युनिकला मैदानावर आता घाबरण्याचे कारण नाही. भयंकर संघ असे टोमणे या संघाला झेलावे लागले होते. फ्लिक यांनी जादूची कांडी फिरविली आणि या संघाच्या कपाटात २०१९-२० मोसमात आणखी तीन करंडक जमा झाले. रॉबर्ट लेवांडोस्की याच्या आक्रमणास धार चढली. फ्लिक यांनी थॉमस म्युलर, जेरोम बोटेंग, गोलरक्षक मॅन्युएल न्यूएर या अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखविला. उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि जिंकण्याची भूक या बळावर बायर्न म्युनिकला मोसमात गरुडझेप घेता आली.

सात वर्षांनंतर विजेतेपद
पोर्तुगालमधील लिस्बन येथील रिकाम्या ‘एस्तादियो दा लूझ’वर झालेल्या चँपियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम लढतीत बायर्न म्युनिकने एका गोलने बाजी मारली. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाला त्यांनी हरविले. फ्रेंच क्लब प्रथमच चँपियन्स लीगच्या अंतिम लढतीत खेळत होता. या संघापाशी फ्रान्सचा विश्वकरंडक विजेता किलियान एमबाप्पे, ब्राझीलचा वलयांकित नेमार आदी नावाजलेले खेळाडू होते. पीएसजीचे जर्मन प्रशिक्षक थॉमस टुकेल यांना प्रतिस्पर्ध्यांचे बारकावे माहीत होते, पण बायर्न म्युनिकचे प्रशिक्षक फ्लिक यांचा गृहपाठ सक्षम ठरला. पीएसजी संघाने संधी गमावल्या, तर सामन्याच्या ५९व्या मिनिटास किंग्सले कोमॅन याने साधलेल्या भेदक हेडरमुळे जर्मन संघाला सात वर्षांनंतर प्रथमच चँपियन्स लीग विजेता होता आले. २०१३ पूर्वी त्यांनी १९७४, १९७५, १९७६ व २००१ मध्ये युरोपातील प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली होती. म्युनिकमधील संघाने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य बार्सिलोना क्लबचा ८-२ गोलफरकाने धुव्वा उडविला होता, तेव्हाच ते संभाव्य विजेते ठरले होते. उपांत्य फेरीत लिऑन संघाला हरविल्यानंतर ते चँपियन होण्याच्या अगदी समीप पोचले. अंतिम लढतीत बायर्न म्युनिकसाठी निर्णायक गोल करणारा कोमॅन हा फ्रेंच आघाडीपटू. पॅरिसमध्ये जन्मलेल्या खेळाडूच्या कारकिर्दीस पीएसजी संघातूनच सुरुवात झाली होती. उपांत्य लढतीत राखीव फळीत राहिल्यानंतर अंतिम लढतीत प्रशिक्षकांनी त्याच्यावर विश्वास दाखविला आणि कोमॅन याने संधीचे सोने केले. त्याच्या गोलमुळे पन्नासावे वर्धापन वर्ष साजरे करणाऱ्या पीएसजी संघाच्या आशेवर पाणी फेरले गेले. या संघाचे पाठीराखेही हिरमुसले, पॅरिसमध्ये त्यांनी दंगा करताना पोलिसांशीही दोन हात केले. कतारमधील मालक असलेल्या पॅरिस सेंट जर्मेन संघाची २०१९-२० मोसमातील कामगिरी देखणी ठरली. चँपियन्स लीगच्या अंतिम लढतीपूर्वी त्यांनी फ्रान्समध्ये लिग १, फ्रेंच कप, लीग कप जिंकून तिहेरी यशाचा आनंद साजरा केला होता. मात्र मार्सेल संघानंतर चँपियन्स लीग जिंकणारा दुसरा फ्रेंच क्लब हा मान पीएसजीला मिळाला नाही.

अपराजित घोडदौड
मोसमात तीन करंडक जिंकणारा बायर्न म्युनिक संघ सध्या सलग ३० सामने अपराजित आहे, मोसमातील सर्व स्पर्धांत मिळून ओळीने २१ सामने त्यांनी जिंकले आहेत. पोलंडचा ३२ वर्षीय स्ट्रायकर रॉबर्ट  लेवांडोस्की याचा गोलधडाका बायर्न म्युनिकसाठी अवर्णनीय ठरला. मोसमातील सर्व स्पर्धांत त्याने एकूण ५५ गोल नोंदविले, त्यापैकी १५ गोल चँपियन्स लीगमधील १० सामन्यांतून डागले. आणखी दोन गोल नोंदविले असते, तर त्याला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या २०१३-१४ मोसमातील १७ गोलांच्या विक्रमाशी बरोबरी साधता आली असती. विशेष बाब म्हणजे, लेवांडोस्कीसाठी हा पहिलाच चँपियन्स करंडक ठरला.

संबंधित बातम्या