उंच झेपावणारा मोन्डो

किशोर पेटकर
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

क्रीडांगण

धावत येत लांब काठीच्या साह्याने उंच झेपावत अडथळा पार करण्याच्या पोल व्हॉल्ट क्रीडा प्रकारात एका विशीतील युवकाने विश्वविक्रमी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे युक्रेनचा सर्जी बुबका हा या खेळातील माजी विक्रमवीर ठरलाय. 

बुबका याने १९८८ ते १९९४ या कालावधीत तब्बल सतरा वेळा विश्वविक्रम नोंदविताना, स्वतःची कामगिरी मागे टाकण्याची सवय लावून घेतली होती. आऊटडोअर मैदानावर बुबका याने १९९४ मध्ये ६.१४ मीटर अंतर झेपावत नवा विश्वविक्रम नोंदविला, तेव्हा सारे जग स्तिमित झाले होते. पोल व्हॉल्टमध्ये सहा मीटर उंची गाठणे अशक्यप्राय मानले जात असे, पण बुबकाने ते साध्य करून दाखविले. त्याच्याकडून प्रेरणा घेत इतर खेळाडूंनीही सहा मीटर उंचीचे ध्येय बाळगले आणि त्यात त्यांना यशही आले. २०१६ मध्ये ब्राझीलमधील रिओ द जानेरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत यजमान देशाच्या थियागो ब्राझ दा सिल्वा ६.०३ मीटर झेप घेत ऑलिंपिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. आता नवा पोल व्हॉल्टर जो अवघ्या वीस वर्षांचा आहे, त्याने बुबकाचा विक्रम मोडताना आऊटडोअर स्पर्धेत ६.१५ मीटर उंच झेप साध्य केली. आर्मांड डुप्लान्टिस हे त्याचे नाव. अमेरिकेत जन्मलेला स्वीडिश ॲथलीट. 

हा युवा पोल व्हॉल्टर उंचावर झेपावत सहजपणे विक्रमांस गवसणी घालताना दिसत आहे. या वर्षी फेब्रुवारीत त्याने ग्लासगो येथे इनडोअर स्पर्धेत ६.१८ मीटरची नोंद करून नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. त्यापूर्वी पोलंडमधील इनडोअर स्पर्धेत डुप्लान्टिस याने ६.१७ मीटरचे अंतर कापत फ्रेंच खेळाडू रेनॉ लॅव्हिलेनी याचा सहा वर्षे अबाधित राहिलेला विश्वविक्रम मोडला होता. रेनॉ याने २०१४ मध्ये ६.१६ मीटर उंच झेप घेतली होती. आर्मांड डुप्लान्टिस याने इनडोअर मैदाने गाजविल्यानंतर काही दिवसांपूर्वी आऊटडोअर स्पर्धेतही नवा विश्वविक्रमी उच्चांक नोंदीत केला. त्याने रोममधील स्पर्धेत ६.१५ मीटर अंतर झेप घेत, तब्बल २६ वर्षे अबाधित राहिलेला बुबका याचा विक्रम मोडीत काढला. 

नवा सुपरस्टार?
आर्मांड डुप्लान्टिस हा मोन्डो या टोपणनावानेच परिचित आहे. वर्षभरातील त्याचे सहा मीटरपेक्षा उंच झेप घेण्याचे सातत्य पाहता, ॲथलेटिक्समधील नवा सुपरस्टार होण्याची त्याच्यात क्षमता असल्याचे मानले जाते. डुप्लान्टिसने वर्षभरात इनडोअर, तसेच आऊटडोअर स्पर्धांत सतत सहा मीटरपेक्षा जास्त उंच झेपावण्याचे लक्ष्य साध्य केलेय. फेब्रुवारीत त्याने इनडोअर पोल व्हॉल्टमधील नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर कोरोना विषाणू महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्थगित झाल्या. आता युरोपात पुन्हा ॲथलेटिक्स स्पर्धांना सुरुवात झाल्यानंतर, मोन्डोचा जोश कायम दिसला. १७ सप्टेंबरला त्याने रोममधील आऊटडोअर स्पर्धेत दुसऱ्या प्रयत्नात बुबकाची विक्रमी कामगिरी मागे सारली. गतवर्षी ऑगस्टमध्ये स्टॉकहोम येथील स्पर्धेत आर्मांडने सहा मीटरची नोंद केली होती. दोन वर्षांपूर्वी ६.०५ मीटर उंची कापत त्याने बर्लिनमधील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले, मात्र गतवर्षी दोहा येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा मीटर अंतर साध्य न झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या सॅम केन्ड्रिक्स याने त्याच्यावर मात केली होती. तथापि, आर्मांड डुप्लान्टिस याने २०२० वर्ष संस्मरणीय ठरविताना कोविडमुळे ठप्प झालेल्या कालावधीचा सरावाच्या दृष्टीने सदुपयोग केला. त्याची उंचच उंच झेपावण्याची अद्‍भुत क्षमता पाहता, या वर्षी टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा झाली असती, तर तोच सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असता. या सन्मानासाठी त्याला पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल.

वडील आहेत मार्गदर्शक
आर्मांड डुप्लान्टिस याला विश्वविक्रमी पोल व्हॉल्टर करण्यात त्याच्या वडिलांचा मोलाचा हातभार लागलेला आहे. त्याचे वडील ग्रेग हे अमेरिकन, तर आई हेलेना स्विडिश. दोघेही माजी क्रीडापटू. ग्रेग हे स्वतः पट्टीचे पोल व्हॉल्टर होते, तर हेलेना या हेप्टॅथलिट आणि व्हॉलिबॉल खेळाडू. ग्रेग यांनी आपल्या तिन्ही मुलांना पोल व्हॉल्टर होण्याची प्रेरणा दिली. थोरला आंद्रेस या खेळात रमला, पण जास्त उंच झेप घेऊ शकला नाही. त्यानंतरच्या अंतोईन याने याने पोल्ट व्हॉल्टचा नाद सोडून बेसबॉलची कास धरली, तर १० नोव्हेंबर १९९९ रोजी जन्मलेल्या सर्वांत धाकट्या आर्मांडने विश्वविक्रमी झेप  घेत वडिलांचे स्वप्न साकारले. वयाच्या तिसऱ्या वर्षी घराच्या बाजूच्या मोकळ्या जागेत लांब काठीसह धावत उंच झेपावण्याची हौस बाळगलेला हा मुलगा आता पोल व्हॉल्टमधील विश्वविक्रमी आहे.

संबंधित बातम्या