सेरेनाच्या स्वप्नास पुन्हा तडा

किशोर पेटकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

क्रीडांगण

जागतिक टेनिसमधील महान खेळाडू सेरेना विल्यम्स हिच्या विक्रमी स्वप्नाला पुन्हा एकदा तडा गेला. गेली तीन वर्षे चाळिशीतील ही जिगरबाज खेळाडू स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने पछाडलेली आहे. त्यासाठी मातृत्वानंतर तिने टेनिस कोर्टवर जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर पुनरागमन केले, पण २४ हा आकडा तिला वाकुल्या दाखवत आहे. ऑस्ट्रेलियाची थोर टेनिसपटू मार्गारेट कोर्ट हिने कारकिर्दीत २४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहे. हा विश्वविक्रम आहे. त्यास गाठण्यासाठी सेरेनाला एका ग्रँडस्लॅम करंडकाची आवश्यकता आहे. 

तीन वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये सेरेनाने सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत बाजी मारली. तिचा तो २३वा ग्रँडस्लॅम करंडक ठरला, पण त्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही तिला कोर्टच्या विक्रमास गाठणे शक्य होत नाही. सप्टेंबर २०१७ मध्ये तिने मुलीस जन्म दिला. प्रसूतीच्या काळ तिच्यासाठी खडतर होता. त्यानंतर २०१८ मध्ये सेरेनाने लढाऊ बाण्याने स्पर्धात्मक टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले, पण ग्रँडस्लॅम विजेतेपद दूर राहिले. २०१८ व २०१९ मध्ये तिने विंबल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. अंतिम टप्प्यात ठेच लागणारी सेरेना नव्याने उसळी घेते, मात्र यावेळी फ्रेंच ओपनमधून तिला दुखापतीच्या कारणास्तव खूपच लवकर माघार घ्यावी लागली. या वर्षी २६ सप्टेंबरला ३९वा वाढदिवस साजरा करणारी सेरेना आता आयुष्यातील नव्या अध्यायात आहे. चाळिशीतील सेरेना अजूनही प्रेरणास्रोत आहे. फक्त तिला २४वा ग्रँडस्लॅम करंडक वश होत नाही. या वर्षी तिचे स्वप्न अधुरेच राहिल्यामुळे पुढील वर्षी नव्या जोमाने ग्रँडस्लॅम टेनिस कोर्टवर उतरण्याचे तिचे उद्दिष्ट्य राहील.

दुखापतीचा धक्का
सेरेनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या न्यूयॉर्कमधील अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठली. पण तिच्याप्रमाणेच आई असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्या लढतीच्या वेळेस सेरेनाच्या पायाच्या दुखापतीने उचल खाल्ली. त्यावर उपचार करून ती मातीच्या कोर्टवर खेळण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाली. या स्पर्धेत तिला सहावे मानांकन होते. रोलाँ गॅरोवर पहिल्या फेरीत सेरेनाने संघर्षमय विजय नोंदविला, पण दुसऱ्या फेरीतील लढतीपूर्वी तिच्या पायाच्या वेदना तीव्र झाल्या. त्यामुळे कोर्टवर उतरण्यापूर्वीच निरोप घ्यावा लागला. फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी चौथ्यांदा दावा सांगणाऱ्या सेरेनाला रॅकेट म्यान करावी लागली. रोलाँ गॅरोवर पाच वर्षांपूर्वी तिने शेवटचा विजय मिळवला होता. पॅरिसचा निरोप घेताना सेरेना खूपच भावुक झाली. चालताना तिला असह्य वेदना होत होत्या. दोन वर्षांपूर्वीही तिला फ्रेंच ओपनमधून माघार घ्यावी लागली होती. यावेळेस ती शंभर टक्के तंदुरुस्त नव्हती, तरीही २४व्या ग्रँडस्लॅमच्या ओढीने पॅरिसमध्ये आली होती. २०१६ पासून सेरेना सहा वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराजित झालेली आहे. २०१७ मध्ये तिने ऑस्ट्रेलियात जर्मनीच्या स्टेफी ग्राफ हिच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांना मागे टाकले. मागील तीन वर्षांत सतत पाठपुरावा करूनही ग्रँडस्लॅम करंडक तिला हुलकावणी देत आहे.

ध्येयवेडी टेनिसपटू
सेरेनाला २०१८ ते २०२० या कालावधीत एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आली नाही. त्यामुळे मार्गारेट कोर्ट हिचा विक्रमास गाठणे अशक्य ठरेल असे म्हणता येणार नाही. अमेरिकेची ही खेळाडू ध्येयवादी आहे. धडाकेबाज पुनरागमनासाठी ती नावाजलेली आहे. आता वयाचा अडसर असला, तरी सेरेना ग्रँडस्लॅम जिंकू शकणार नाही असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. २१ वर्षांपूर्वी, १९९९ मध्ये अमेरिकन ओपनमध्ये मार्टिना हिंगिसला नमवून तिने कारकिर्दीतील पहिला ग्रँडस्लॅम करंडक पटकावला. त्यानंतर तिच्या कारकिर्दीत मोठे चढउतार आले, दुखापतींचा फटका बसला, पण ती हिंमत हारली नाही. ऑस्ट्रेलियन ओपन आणि विंबल्डनमध्ये प्रत्येकी सात वेळा, अमेरिकन ओपनमध्ये सहा वेळा, तर फ्रेंच ओपनमध्ये तीन वेळा विजेतेपद मिळवून तिने यशाचा चढता आलेख कायम राखला. शरीराने पूर्ण साथ दिल्यास २०२१ मध्ये ती चिवट खेळाच्या बळावर ग्रँडस्लॅम जिंकूही शकते. मात्र त्यासाठी तिला नव्या खेळाडूंच्या जोशपूर्ण खेळाची कोंडी करावी लागली. यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत सेरेनाला तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या चीनच्या वँग क्वियांग हिने हरविले. गतवर्षी  विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिला सिमोना हालेप हिने, तर अमेरिकन ओपनमध्ये विजेतेपदाच्या लढतीत बियांका अँड्रिस्कू हिने नमविले होते.   

संबंधित बातम्या