राफेल नदालची ‘स्वीट ट्वेंटी’!

किशोर पेटकर
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

क्रीडांगण

राफेल नदाल पुन्हा एकदा पॅरिसमध्ये रोलाँ गॅरोवर चँपियन झाला. या ठिकाणच्या मातीच्या कोर्टवर सोळाव्यांदा खेळताना स्पेनचा हा ३५ वर्षीय दिग्गज तेराव्यांदा अजिंक्य ठरला. २००५ मध्ये अवघ्या १९व्या वर्षी या डावखुऱ्या टेनिसपटूने फ्रेंच ओपनचा करंडक प्रथमच उंचावला होता. तेव्हापासून दोन पराभव आणि एक वेळ दुखापतीमुळे माघार या कारणास्तव त्याच्या हाती प्रतिष्ठेची द मस्केटियर्स ट्रॉफी दिसली नाही. २००९ मध्ये त्याला चौथ्या फेरीत स्वीडनच्या रॉबिन सॉडर्लिंगने, तर २०१५ मध्ये उपांत्यपूर्व लढतीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पराभवाचा धक्का दिला. २०१६ मध्ये मनगटच्या दुखापतीमुळे त्याला तिसऱ्या फेरीनंतर आवडत्या रोलाँ गॅरोचा खूप लवकर निरोप घ्यावा लागला. हे मोजके अपवाद वगळता नदाल आणि फ्रेंच ओपन विजेतेपद यांचे भावनिक नाते अतूट ठरले. 

आनंदाने करंडकाचा चावा घेणारा, सुप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या साक्षीने विजेतेपद साजरा करणारा दिग्गज राफा दरवर्षी साऱ्या जगाने अनुभवला. मातीच्या कोर्टवरील असामान्य कर्तृत्वामुळे नदालला किंग ऑफ क्ले असे विशेषण चिकटलेले आहे आणि ते सार्थही आहे. फ्रेंच ओपन टेनिसमधील त्याचा पराक्रम अद्वितीय आहे, रोलाँ गॅरोवरील त्याची यशाची टक्केवारी ९८ आहे. या वर्षी कोरोना विषाणू महामारीमुळे विंबल्डन स्पर्धा रद्द झाली, पण फ्रेंच ओपनच्या आयोजकांनी स्पर्धा लांबणीवर टाकली. कोविड-१९ मुळे अमेरिकेचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो या कारणास्तव नदाल न्यूयॉर्कमधील अमेरिकन ओपनमध्ये खेळला नाही, मात्र जिवलग पॅरिसमध्ये सुसज्जतेने दाखल झाला आणि कारकिर्दीतील विसावे ग्रँडस्लॅम मिळवले. आता त्याने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला गाठले आहे. सध्या ३९ वर्षांचा असलेला फेडरर आणखी ग्रँडस्लॅम जिंकू शकला नाही, तर नदाल त्याला मागे टाकू शकतो. कारण, मातीच्या कोर्टवरील निर्विवाद हुकमत पाहता, हा स्पॅनिश खेळाडू लालभडक कोर्टवर आणखी करंडक जिंकल्यास आश्चर्य वाटू नये. मध्यंतरीच्या दुखापतग्रस्त कालखंडावर मात करून नव्याने उमेदीने टेनिस कोर्टवर आलेल्या नदालने शारीरिक तंदुरुस्तीकडे खास लक्ष पुरविले आहे, त्यामुळेच यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये एकही सेट न गमावता तो चँपियन झाला.

किंग ऑफ क्ले
जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचचा दोन तास व ४१ मिनिटांत धुव्वा उडवून नदालने कारकिर्दीतील विसावी ग्रँडस्लॅम फायनल जिंकली. २००५ पासून त्याने २८ वेळा ग्रँडस्लॅम अंतिम लढतीत प्रवेश केला आहे, त्यापैकी फक्त आठ वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागला. फ्रेंच ओपनमध्ये तो एकदाही अंतिम लढत हरलेला नाही. नदाल आणि जोकोविच हे सध्याच्या जागतिक टेनिसमध्ये महान खेळाडू आहेत, त्यामुळे पहिल्या दोन मानांकित खेळाडूंतील लढत अटीतटीची होण्याचे संकेत होते. जोकोविचने वर्षाच्या सुरुवातीस ऑस्ट्रेलियन ओपन आठव्यांदा जिंकून कारकिर्दीतील १७वा ग्रँडस्लॅम करंडक पटकाविला होता. रोलाँ गॅरोवर मातीच्या कोर्टवर डावखुऱ्या नदालच्या चतुरस्र खेळासमोर सर्बियन खेळाडूची डाळ शिजली नाही. ६-०, ६-२, ७-५ फरकाने बाजी मारणाऱ्या नदालने आपणच पॅरिसच्या मातीच्या कोर्टवरील बादशहा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. पराभवानंतर खुद्द जोकोविचनेच रोलाँ गॅरोच्या सम्राटास मानवंदना दिली. ‘मातीच्या कोर्टवर तू जे काही करतोय ते अविश्वसनीय आहे, किंग ऑफ क्ले का आहेस हे तू आज सिद्ध केलेस,’ असे सांगत जोकोविचने खुल्या दिलाने हार स्वीकारली. कारकिर्दीतील २० ग्रँडस्लॅमपैकी सर्वाधिक १३ करंडक राफाने रोलाँ गॅरोवर मिळविले आहेत. २००५ ते २०२० हा कालावधी फार मोठा आहे. दीड दशकांच्या कारकिर्दीत नदालने अनेक चढउतार अनुभवले, पण मातीच्या कोर्टवरील त्याचा झंझावात कायम राहिला. अमेरिकन ओपनमध्ये चार वेळा, विंबल्डनच्या हिरवळीवर दोन वेळा, तर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एक वेळ जिंकलेला नदाल पॅरिसच्या मातीत जबरदस्त जिद्द आणि उत्कटतेने खेळतो. त्यामुळेच यावेळच्या अजिंक्यपदानंतर तो म्हणाला, ‘फ्रेंच ओपन माझ्यासाठी सर्वकाही आहे.’ 

अजरामर मक्तेदारी
फ्रेंच ओपनमधील नदालची मर्दुमकी विलक्षण आहे. त्याचा पराक्रम मागे टाकण्याची शक्यता दुर्मीळ वाटते. त्याचे समकालीन दिग्गज रॉजर फेडरर व नोव्हाक जोकोविच यांना फक्त एकदाच रोलाँ गॅरोवर बाजीगर होता आले. स्वीडनच्या बियाँ बोर्गने १९७४ ते १९८१ या कालावधीत फ्रेंच ओपनमध्ये एकेरीतील सहा करंडक जिंकले. बोर्गला नदालने आठ वर्षांपूर्वी मागे टाकून प्रदीर्घ मजल गाठली. भविष्यात या महान स्पॅनिश खेळाडूची रोलाँ गॅरोच्या क्ले कोर्टवरील देदीप्यमान मक्तेदारी अजरामर ठरू शकते.

संबंधित बातम्या