टेनिसमधील नवी विजेती इगा

किशोर पेटकर
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

क्रीडांगण

कारकिर्दीतील पहिल्या मोठ्या यशाची चव न्यारी असते. पोलंडची १९ वर्षीय युवा टेनिसपटू इगा श्‍विआँटेकसाठी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम करंडकाची महती अवर्णनीय असेल. 

या वर्षी ३१ मे रोजी तिने १९वा वाढदिवस साजरा केला. गतवर्षी तिने ग्रँडस्लॅम स्पर्धेत पदार्पण केले. फ्रेंच ओपन स्पर्धेची चौथी फेरी ही तिची गतमोमसातील सर्वोत्तम कामगिरी होती. यंदा मोसमाच्या सुरुवातीला तिने मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चौथ्या फेरीपर्यंत मजल गाठत प्रगती दाखवली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीपर्यंत तिने वाटचाल केली. व्हिक्टोरिया अझारेन्काकडून हार पत्करल्यानंतर इगाने पॅरिसमधील मातीच्या कोर्टवरील फ्रेंच ओपन स्पर्धेच्या तयारीवर लक्ष एकवटले. 

रोलाँ गॅरो वरील स्पर्धेत खेळायला उतरली, तेव्हा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत तब्बल ५४व्या क्रमांकावर होती. चौथ्या फेरीत अव्वल मानांकित रुमानियाची सिमोना हालेपला इगाने धक्का दिला, तेव्हाही तिची विशेष दखल घेतली नाही. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत सिमोना विजेतेपदासाठी मुख्य स्पर्धक होती. गतवर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सिमोनाने इगाला हरविले होते, यावेळी पोलिश खेळाडूची अवघ्या तीन गेमच्या बदल्यास सरशी झाली. सिमोनाने २०१८ मध्ये फ्रेंच ओपनमधील मातीच्या कोर्टवर दणदणीत यश संपादन केले होते, नंतर २०१९ मध्ये विंबल्डनच्या हिरवळीवर विजेती ठरली होती. मात्र इगाने सिमोनाच्या गतवैभवाचा दबाव न घेता जबरदस्त आक्रमक खेळ केला. त्याच बळावर यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजेती अमेरिकन सोफिया केनिनला एक तास २४ मिनिटांच्या खेळात पाणी पाजत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम यश साजरे केले. अंतिम लढतीत पाच गेमच्या मोबदल्यात तिने रोलाँ गॅरोवर नवी विजेती होण्याचा मान संपादन केला. ६-४, ६-१ फरकाने जिंकणारी इगा फ्रेंच ओपनच्या इतिहासातील आणखी एक कमी वयाची चँपियन ठरली. तिचा आवडता खेळाडू राफेल नदाल २००५ मध्ये पॅरिसमधील मातीच्या कोर्टवर विजेता ठरला तेव्हा १९ वर्षांचाच होता. मोनिका सेलेसने १९९० मध्ये फ्रेंच ओपन किताब पटकावला तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्यानंतर १९९२मध्ये मोनिका १९व्या वर्षी या स्पर्धेत पुन्हा विजेती ठरली. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनंतर इगाच्या रूपात कमी वयाची चँपियन, फ्रेंच ओपन करंडकासह दिसली.

पोलंडची पहिली चँपियन
टेनिसमधील ग्रँडस्लॅम एकेरीत विजेतेपद मिळविणारी इगा श्‍विआँटेक ही पोलंडची पहिली व्यावसायिक टेनिसपटू आहे. फ्रेंच ओपन जिंकताना इगाने एकही सेट न गमावता अजिंक्य कामगिरी साकारली. जस्टिन हेनिन हिने २००७ मध्ये असाच धडाका राखला होता. इगाने यावेळी विजेतेपदाच्या वाटचालीपर्यंत फक्त २३ गेम गमावले. इगा ताकदवान खेळ करणारी आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. जबरदस्त फोरहँड तिच्या भात्यातील परिणामकारक अस्त्र आहे. ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या २१ वर्षीय केनिनने फ्रेंच ओपन अंतिम लढतीतील पराभवात दुखावलेल्या पायाला जबाबदार धरले असले, तरी इगाच्या पराक्रमाचे महत्त्व कमी होत नाही. तिच्या सडेतोड खेळासमोर अमेरिकन खेळाडू निरुत्तर ठरली होती. इगाची या वर्षीची कामगिरी उल्लेखनीय आहे. सीनियर ग्रँडस्लॅम कारकिर्दीत दुसऱ्याच वर्षी फ्रेंच ओपन करंडक आपल्या कपाटात नेणाऱ्या इगाचे भवितव्य उज्ज्वल दिसते.

ज्युनिअर गटातही धडाका
इगा श्‍विआँटेकसाठी लहानपणी क्रीडा मैदान नवखे नव्हते. ३१ मे २००१ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा शहरात तिचा जन्म झाला. तिचे वडील टोमास हे माजी क्रीडापटू. दक्षिण कोरियातील सोल येथे १९८८ मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये टोमास यांनी रोइंग खेळात पोलंडचे प्रतिनिधित्व केले होते. वडिलांच्या प्रेरणेनेच इगा थोरल्या बहिणीप्रमाणे टेनिस कोर्टवर आली. दुखापतग्रस्त बहिणीने स्पर्धात्मक टेनिस त्यागले. मात्र इगाने आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सर्किटवर दबदबा राखला. २०१८ मध्ये इगाने विंबल्डन स्पर्धेत ज्युनिअर मुलींच्या एकेरीत विजयी पताका फडकाविली. त्याच वर्षी ज्युनिअर मुलींत ती फ्रेंच ओपन दुहेरीत विजेती ठरली होती. डब्ल्यूटीए टूरवर तिने गतवर्षी पहिल्या पन्नास जणींत स्थान मिळविले होते. पायावरील शस्त्रक्रियेमुळे तिला गतमोसम पूर्ण करता आला नाही, त्यामुळे  २०१९ च्या अखेरीस ती ६१व्या क्रमांकावर होती. आता फ्रेंच ओपन जिंकल्यामुळे तिने मोठी भरारी घेतली आहे. ती महिला एकेरीतील क्रमवारीत १७व्या स्थानी आली आहे. तिचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन आहे.

संबंधित बातम्या