कोरी अँडरसनची निवृत्ती

किशोर पेटकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

क्रीडांगण

अमेरिकेतील व्यावसायिक क्रिकेटसाठी न्यूझीलंडचा डावखुरा स्फोटक फलंदाज कोरी अँडरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. खरे म्हणजे, दुखापतीमुळे हा अष्टपैलू खेळाडू न्यूझीलंडच्या क्रिकेट संघातून बाहेरच होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये तो शेवटचा किवी संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तिसावा वाढदिवस साजरा करण्यास काही दिवस बाकी असताना अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. 

अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट टी २० स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने सध्या स्पर्धेचे व्यासपीठ तयार केले जात आहे, त्या पार्श्वभूमीवर अँडरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस पूर्णविराम दिला. अमेरिकेतील टी २० लीगमध्ये सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नसले, तरी माजी नावाजलेले खेळाडू, आपापल्या राष्ट्रीय संघातून बाहेर असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना अमेरिकेतील स्पर्धेने आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. दुखापतीचा ससेमिरा मागे असल्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्द ताणण्यात काही अर्थ नाही याची जाणीव झाल्याने अँडरसनने भविष्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर होण्याचे ठरविले. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अँडरसनने न्यूझीलंडचे ९३ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. मजबूत शरीरयष्टी लाभलेला हा क्रिकेटपटू उत्तुंग षटकार खेचण्यासाठी ओळखला जात असे. कारकीर्द बहरत असतानाच त्याला तंदुरुस्तीअभावी न्यूझीलंड संघापासून दूर राहावे लागले. अमेरिकेतील क्रिकेटने सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर रांगण्यास सुरुवात केली आहे. अँडरसनचा अनुभव आणि प्रतिभा तेथील क्रिकेटसाठी वरदहस्त ठरू शकते. भविष्यात तेथे प्रशिक्षणात रममाण होणेही अँडरसनला शक्य असेल, कारण त्याची वाग्दत्त वधू अमेरिकी नागरिक आहे. साहजिकच अँडरसननेही अमेरिकेतच स्थायिक होणे कठीण नसेल. निवृत्ती मागे घेऊन तो अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल का ही शक्यता प्रश्नांकित आहे, मात्र मार्गदर्शक या नात्याने त्याचा फायदा अमेरिकन क्रिकेटला निश्चितच होईल आणि अँडरसनलाही नेमके तेच करायचे आहे, तसे सूतोवाच त्याने केलेय.

तुफानी शतकामुळे ओळख
कोरी अँडरसनने सहा वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तुफानी शतक ठोकले आणि रातोरात प्रकाशझोतात आला. १ जानेवारी २०१४ रोजी क्वीन्सटाऊन येथे विंडीजविरुद्ध ३६ चेंडूंत शंभरी गाठताना त्याने अतिवेगवान वन-डे शतक ठोकण्याचा मान मिळविला. त्यापूर्वी वर्षभर अगोदर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाला होता, पण त्याची विशेष दखल घेतली गेली नव्हती. आक्रमक शतकामुळे झटपट क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याची संधी अँडरसनला लाभली. वर्षभरानंतर अँडरसनच्या वेगवान वन-डे शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने मोडला. १८ जानेवारी २०१५ रोजी जोहान्सबर्ग येथे डिव्हिलिअर्सने विंडीजविरुद्ध ३१ चेंडूंत शतक ठोकले, असो... किवी खेळाडूच्या आक्रमक फलंदाजी शैलीने आयपीएल संघांना प्रभावित केले, शिवाय तो उपयुक्त डावखुरा मध्यमगती गोलंदाजही होता. कॅरेबियन लीग, पाकिस्तानच्या टी-२० लीगमध्येही अँडरसनने भाग घेतला. मुंबई इंडियन्सकडून खेळताना २०१४ मध्ये ४४ चेंडूंत नाबाद ९५ धावा करत आयपीएलमध्ये ठसा उमटविला होता. मात्र नंतर दुखापती आणि कामगिरीत सातत्याचा अभाव यामुळे अँडरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस उतरली कळा लागली. आयपीएलमधूनही तो अस्तंगत झाला. न्यूझीलंडने २०१५ साली एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. उपविजेत्या ठरलेल्या किवी संघातील अँडरसन (२३१धावा, १४ विकेट) प्रमुख खेळाडू होता. न्यूझीलंड क्रिकेट संघ आक्रमक शैलीच्या खेळाडूंसाठी ओळखला जातो. अँडरसन दुखापतींशी झगडत असताना अन्य धडाकेबाज खेळाडूंचे आगमन झाले व त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ओळख पुसली गेली. दोन वर्षांपासून तो न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियोजनात अजिबात नव्हता. कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर शतक (११६ धावा) आहे, पण तो झटपट क्रिकेटमध्ये जास्त प्रभावशाली ठरला.

अमेरिकेचे लक्ष्य विश्वकरंडक
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेनिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडूंची  पावले अमेरिकेकडे वळत आहेत. या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात विविध देशांतील क्रिकेटपटू आहेत. कॅरेबियन बेटे, भारत, श्रीलंका, पाकिस्तान येथील क्रिकेटपटू अमेरिकेकडून मर्यादित स्वरूपातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता असलेले अमेरिकेतील क्रिकेट फार मोठे नाही. बेसबॉलच्या तुलनेत तेथील क्रिकेटची लोकप्रियता अतिशय नगण्य आहे. मेजर लीग क्रिकेटमुळे तेथे वातावरण निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. विविध देशातील क्रिकेटपटूंना निमंत्रित करण्यामागे केवळ क्रिकेट खेळणे हाच उद्देश नसून मेजर लीग क्रिकेटच्या माध्यमातून अकादमी पातळीवर सक्षम प्रशिक्षण साखळी तयार करण्याचे ध्येय आहे. ‘वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टू’मधील कामगिरीनुसार अमेरिकेला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटची मान्यता गतवर्षी लाभली. अमेरिकेने आता टी-२० विश्वकरंडक पात्रतेचे लक्ष्य बाळगले आहे.

संबंधित बातम्या