सुपरस्टार १९८२चा 

किशोर पेटकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

क्रीडांगण

इटलीने १९८२ मध्ये विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. फुटबॉलमध्ये जगज्जेते होण्याची त्यांची ही १९३८ नंतरची पहिलीच वेळ ठरली. त्यापूर्वी त्यांना १९७० मध्ये उपविजेतेपद, तर १९७८ मध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. इटलीचे स्पेनमधील यश ऐतिहासिक आणि कौतुकास्पद ठरले. जगज्जेतेपदावर हक्क सांगताना त्यांनी ब्राझील, पश्चिम जर्मनी इत्यादी मातब्बर संघांना अस्मान दाखविले. या वाटचालीत त्यांचा स्ट्रायकर पावलो रॉस्सी विजयाचा खरा शिल्पकार ठरला. 

ब्राझीलविरुद्ध हॅटट्रिक, पोलंडविरुद्ध उपांत्य लढतीत दोन गोल आणि पश्चिम जर्मनीविरुद्ध अंतिम लढतीत पहिला गोल अशी कामगिरी नोंदवत रॉस्सीने इटलीच्या विश्वविजेतेपदाचा पाया रचला. ब्राझीलअगोदरच्या लढतीत रॉस्सीला सूर गवसत नव्हता, त्याच्या नावे एकही गोल नव्हता, मात्र नंतर सहा गोल नोंदवत या हुकमी आघाडीपटूने विश्वकरंडकातील सर्वाधिक गोलसाठी गोल्डन बूट आणि उत्कृष्ट खेळाडूचा गोल्डन बॉल हे दोन्ही प्रतिष्ठेचे किताब आपल्या नावे केले. याच सर्वोत्तम धडाक्यामुळे तो १९८२ मध्ये बॅलॉन डीओर पुरस्काराचाही मानकरी ठरला. जागतिक फुटबॉलमध्ये पावलो रॉस्सी हे नाव त्या वर्षी सुपरस्टार ठरले. 

इटलीच्या या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूचे नुकतेच वयाच्या ६४व्या वर्षी निधन झाले. रॉस्सीने इटलीतर्फे दोन विश्वकरंडक स्पर्धांत नऊ गोल केले. १९७८ मध्ये तीन गोलसह तो सिल्व्हर बॉलचा मानकरी होता. ख्रिस्तियन व्हिएरी आणि रॉबर्टो बॅजियो यांच्यासमवेत रॉस्सी विश्वकरंडक स्पर्धेत इटलीतर्फे सर्वाधिक गोल नोंदविणारा फुटबॉलपटू आहे. १९८६ मधील विश्वकरंडक स्पर्धेत तो इटलीच्या संघात होता, पण तेव्हा त्याच्या कारकीर्द उतरणीला लागली होती, त्यामुळे त्याला प्रत्यक्ष मैदानावर विश्वकरंडक खेळण्याची संधी मिळाली नाही.

मेड फॉर इटली...
सेंटर फॉर्वर्ड या जागी सहजतेने खेळणारा पावलो रॉस्सी निष्णात आघाडीपटू गणला गेला. तो अगोदर राईट विंगर होता, मात्र त्याचा खेळ सेंटर फॉर्वर्ड जागी जास्त खुलला. रॉस्सीची गुणवत्ता असामान्य होती, त्याचवेळी प्रखर संघभावनेसाठीही तो ओळखला जात असे. १९८२ मध्ये ब्राझीलच्या मध्यफळीत झिको, सोक्रेटिस, फाल्काव असे नावाजलेले खेळाडू होते. असे असूनही रॉस्सीचा धडाका वरचढ ठरला. ब्राझीलच्या जगज्जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नाचा चुराडा केवळ रॉस्सीमुळे झाला. पूर्ण झोकून देणाऱ्या फुटबॉलपटूस सूर गवसला की रोखणे कठीणच ठरायचे. रॉस्सी इटलीकडून ४८ आंतरराष्ट्रीय सामने खेळला, त्यात २० वेळा त्याने गोल केला. विशेष बाब म्हणजे, संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत रॉस्सी फक्त इटलीतील क्लबकडूनच खेळला. त्याच्याकडे युरोपातील अन्य देशातील क्लब आकर्षित झाले होते, पण रॉस्सीने इटालियन भूमीला सोडले नाही. साहजिकच त्याची फुटबॉल कारकीर्द ‘मेड फॉर इटली’ ठरली. तेथील सेरी ए स्पर्धेत त्याच्या नावे गोलांचे शतकही आहे. युव्हेंटरकडून त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात झाली. सुरुवातीस त्याला पायाने खूप सतावले. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्या, पण या जिगरबाज फुटबॉलपटूने हार मानली नाही. युव्हेंट्सकडून खेळताना त्याला जास्त लोकप्रियता लाभली. रॉस्सी, मिचेल प्लॅटिनी व बिगनिव बोनिक या त्रिकुटाने युव्हेंट्सला वेगळ्याच उंचीवर नेले होते. त्यामुळे इटलीत, तसेच युरोपातही या क्लबचा डंका वाजत होता. या संघाने १९८५ मध्ये युरोपियन कप जिंकला, त्यात आघाडीफळीत प्लॅटिनी आणि रॉस्सीचा खेळ निर्णायक ठरला होता. मात्र ब्रुसेल्स येथील हेईझेल स्टेडियमवर लिव्हरपूलविरुद्धच्या अंतिम लढतीपूर्वी दुर्घटना घडली. भिंत कोसळल्यामुळे आणि चेंगराचेंगरीत ३९ फुटबॉलप्रेमींना जीव गमवावा लागला, सुमारे सहाशे जण जखमी झाले होते. रॉस्सीने १९८७ मध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर, फुटबॉल पंडित या नात्याने आपले ज्ञान आणि अनुभवाची झलक पेश केली. 

कारकिर्दीवर फिक्सिंगचे शिंतोडे
पावलो रॉस्सी पूर्ण बहारात असताना त्याच्या कारकिर्दीवर सामना फिक्सिंगचे शिंतोडेही उडाले. फुटबॉल बेटिंगमध्ये आपण सहभागी नव्हतो, निर्दोष आहे असे त्याचे म्हणणे होते. आपल्यास न्याय मिळाला नाही हीच त्याची भावना होती. १९७९-८० मोसमात इटलीतील पेरुजिया क्लबकडून खेळत असताना रॉस्सीवर नामुष्की  ओढविली. चौकशीत फिक्सिंगमध्ये दोषी मानत त्याच्यावर तीन वर्षांची बंदी लादण्यात आली. रॉस्सी फुटबॉल मैदानापासून दूर गेला. या बंदीमुळे तो १९८० मध्ये झालेल्या युरो कप स्पर्धेत मुकला. त्याने शिक्षेविरुद्ध दाद मागितली आणि १९८२ मधील विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी त्याच्यावरील बंदी उठविण्यात आली. तो फुटबॉल खेळण्यास पात्र ठरला. युव्हेंट्सने त्याला पुन्हा करारबद्ध केल्यानंतर त्वेषाने खेळला. इटलीतील फुटबॉल मैदाने गाजवून रॉस्सी इटलीच्या विश्वकरंडक संघात दाखल झाला आणि नवा इतिहास रचला गेला.

संबंधित बातम्या