केन विल्यम्सनचे स्पृहणीय सातत्य

किशोर पेटकर
सोमवार, 18 जानेवारी 2021

क्रीडांगण

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन क्रिकेट मैदानावर सभ्यतेसाठी जाणला जातो. त्याचा हा शांत स्वभाव फलंदाजीतही प्रदर्शित होतो. न्यूझीलंड क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांत त्याचा क्रम वरचा आहे हे खुद्द मागे मार्टिन क्रो यांनीही मान्य केले होते. दिवंगत मार्टिन क्रो न्यूझीलंड क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज गणले जातात, खुद्द त्यांनीच दिलेली शाबासकी विल्यम्सनचा दर्जा स्पष्ट करते. 

किवी संघाचे कर्णधारपद सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये समर्थपणे पेलत या तीस वर्षीय फलंदाजाने शास्त्रोक्त, शैलीदार फलंदाजीने जागतिक क्रिकेटला प्रभावित करताना वाहव्वा मिळविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सर्वसामान्य स्थितीत येण्यासाठी प्रयत्नात असताना विल्यम्सनने कसोटीत अफलातून सातत्य प्रदर्शित केले. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीज व पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ पाहायला मिळाला. कमालीच्या सातत्यामुळे त्याला जागतिक क्रिकेट मानांकनात फलंदाजीतील वैयक्तिक क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त झाले. त्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियास मागे सारत सांघिक क्रमवारीत अग्रस्थान पटकाविले, हा दुग्धशर्करायोग ठरला. तीन कसोटीत विल्यम्सनने तीन वेळा शतकी वेस पार केली, त्यात दोन द्विशतकांचाही समावेश आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीस सहाव्या क्रमांकावर फलंदाजीत आलेला आहे हुकमी फलंदाज आता तिसऱ्या क्रमांकावरील दर्जेदार फलंदाज ठरला आहे. 

नोव्हेंबर २०१० मध्ये केन विल्यम्सनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो वीस वर्षांचा होता. किवी क्रिकेटला त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या गुणवान क्रिकेटपटूने विश्वासास तडा जाऊ दिला नाही. अहमदाबाद येथे भारताविरुद्ध पदार्पणातच त्याने शतक ठोकले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १३१ धावांची जिगरबाज खेळी केली. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीस समर्थपणे सामोरे जाणारे त्याचे तंत्र कौतुकास्पद ठरले. ऑफस्पिन गोलंदाजी टाकणारा विल्यम्सन कालांतराने फलंदाज झाला. पाच वर्षांपूर्वी जानेवारीत त्याने वेलिंग्टन येथे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकाविले. श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद २४२ धावांची खेळी केली. त्याच्या खाती आता चार द्विशतके आहेत, त्यापैकी तीन दोन वर्षांच्या कालावधीत आहेत. यावरून अनुभव आणि वाढत्या वयागणिक त्याची फलंदाजीही परिपक्व होत असल्याचे जाणवते. 

महामारीच्या उद्रेकानंतर क्रिकेट पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतर महिनाभरात न्यूझीलंडच्या कर्णधाराने तीन कसोटीत दोन द्विशतके ठोकली. डिसेंबर २०२०च्या सुरवातीस हॅमिल्टन येथेच वेस्ट इंडीजविरुद्ध २५१ धावा करून त्याने कारकिर्दीतील वैयक्तिक उच्चांक नोंदविला. त्याने पाकिस्तानविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत माऊंट माँगेनुई येथे शतक (१२९) केले, तर नववर्षाच्या सुरुवातीस ख्राईस्टचर्च येथे आणखी एक द्विशतक पार करताना पाकिस्तानविरुद्ध २३८ धावा नोंदविल्या. या धडाक्यामुळे त्याला अव्वल क्रमांकापर्यंत झेप घेणे शक्य झाले. 

केन विल्यम्सनसह विराट कोहली, स्टीव स्मिथ हे समवयस्क. त्यांच्या वयात एक-दोन वर्षांचा फरक आहे. तिघांनीही कसोटी कारकिर्दीत सात हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. स्टीव स्मिथने भारताविरुद्धच्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटी कारकिर्दीतील २७वे शतक नोंदविले. त्याने आता कोहलीला गाठले आहे. कोहली, स्मिथ आणि विल्यम्सन यांच्यातील साम्य म्हणजे तिघेही मध्यफळीतील फलंदाज असून आपापल्या संघाचे फलंदाजीतील आधारस्तंभ आहेत. 

दशकभराच्या कारकिर्दीनंतर विल्यम्सनची फलंदाजी आणखीनच बहरली आहे. आगामी कालखंडात त्याच्याकडून कोहली व स्मिथ यांना कसोटीत चांगली स्पर्धा अपेक्षित आहे, त्यामुळे समकालीन सर्वोत्तम फलंदाज कोण ही तुलनात्मक चर्चाही रंगेल. 

संबंधित बातम्या