‘वेगवान’ सोफी!

किशोर पेटकर
सोमवार, 25 जानेवारी 2021

क्रीडांगण

न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डिव्हाईनने हल्लीच महिला टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम नोंदवला. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतक नोंदविणारी महिला फलंदाज हा मान तिने मिळविला आहे. 

न्यूझीलंडमधील महिलांच्या सुपर स्मॅश टी-२० स्पर्धेत वेलिंग्टन ब्लेझ संघातर्फे खेळताना  आक्रमक शैलीच्या सोफीने अवघ्या ३६ चेंडूत शतकाची नोंद केली. त्यासाठी तिने सात चौकार व नऊ षटकारांची मदत घेतली. ओटॅगो स्पार्क संघाच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविताना सोफीने एकंदरीत ३८ चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या डियांड्रा डोट्टिन हिने दहा वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत ३८ चेंडूत शतकी वेस गाठली होती. ३१ वर्षीय सोफीने विक्रम मोडताना किवींच्या भूमीत सर्वांत वेगवान शतक नोंदविण्याचाही पराक्रम बजावला. तीन वर्षांपूर्वी पुरुषांच्या टी-२० स्पर्धेत टिम सेफर्ट याने ४० चेंडूत शतक केले होते. 

प्रतिकूल परिस्थितीत कामगिरी

सोफीच्या झंझावाती शतकाचा तडाखा जबरदस्त होता. ओटॅगोच्या गोलंदाजांना तिने सैरभैर केलेच, शिवाय एका षटकाराने सामना पाहण्यासाठी आलेल्या एका मुलीचाही वेध घेतला. ती किंचित जखमी झाली. नंतर सोफीने तिची विचारपूस केली हा भाग वेगळा. महिलांच्या क्रिकेटमध्ये सोफी दीर्घानुभवी आहे. दीड दशकाच्या कालावधीत न्यूझीलंडतर्फे तिने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये एकत्रितपणे पाच हजाराहून जास्त धावा नोंदवत उपयुक्तता सिद्ध केली आहे. तिने मध्यमगती गोलंदाजीतही प्रावीण्य मिळवले असल्याने तिचे अष्टपैलूत्व संघासाठी मोलाचे ठरते. सोफीसाठी वेगवान शतक खास आहे, कारण न्यूझीलंडमधील स्पर्धेत खेळण्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग स्पर्धेत तिने पर्थ स्कॉर्चर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडमध्ये परतल्यानंतर सक्तीची कोविड-१९ विलगीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती वेलिंग्टन संघातर्फे खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. काही दिवस क्रिकेटपासून दूर राहून मैदानात उतरलेल्या सोफीच्या बॅटने जबरदस्त तडाखा दिला.

गेल सर्वांत जलद

एकंदरीत सर्व प्रकारच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत जलद शतक नोंदविण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या धडाकेबाज ख्रिस गेलच्या नावे नोंदवलेला आहे. २०१३ साली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरतर्फे खेळताना गेलने पुणे वॉरियर्सविरुद्ध अवघ्या ३० चेंडूत शतक झळकविले होते. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. तीन वर्षांपूर्वी भारताच्या ऋषभ पंत याला संधी होती, पण ती हुकली. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिल्लीतर्फे खेळताना पंतने हिमाचल प्रदेशविरुद्ध ३२ चेंडूत शतक पूर्ण केले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर याने बांगलादेशविरुद्ध आणि भारताचा रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी ३५ चेंडूत वेगवान शतकाचा मान प्राप्त केला आहे. दोघांनीही ही कामगिरी २०१७ साली बजावली होती.

संबंधित बातम्या