पराभवाचे खापड प्रशिक्षकावर

किशोर पेटकर
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

क्रीडांगण

क्रीडा मैदानावर यशाचे भागीदारी भरपूर असतात, पण अपयशाचे खापर नेहमीच प्रशिक्षकाच्या माथी फुटते. चेल्सी क्लब हा इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील नावाजलेला संघ. या माजी विजेत्या संघाला अलीकडे विशेष यश प्राप्त झालेले नाही. फ्रँक लँपार्ड हे या क्लबचे लिजंडरी खेळाडू. केवळ चेल्सी क्लब नव्हे, तर इंग्लंडचे हे प्रख्यात माजी फुटबॉलपटू आहेत. निवृत्तीनंतर लँपार्ड यांनी प्रशिक्षणात नशीब अजमावण्याचे ठरविले, मात्र फुटबॉलपटू या नात्याने यशस्वी ठरलेले हे मध्यरक्षक संघाच्या प्रशिक्षकपदी विजेतेपदाच्या दृष्टीने सफल ठरू शकले नाहीत. त्यामुळे लँपार्ड यांना हकालपट्टीस सामोरे जावे लागले.

चेल्सी क्लबने फ्रँक लँपार्ड यांना जुलै २०१९ मध्ये मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले, त्यावेळी क्लबला भरपूर अपेक्षा होत्या. करंडक जिंकण्याची स्वप्ने पाहिली जात होती. उण्यापुऱ्या अडीच वर्षांतच क्लबचा भ्रमनिरास झाला. जानेवारी २०२१ मध्ये या दिग्गज फुटबाॅलपटूला कटू अनुभव आला. इंग्लंडमधील मोसम अजून संपलेला नाही, त्यापूर्वीच त्यांच्या पदावर कुऱ्हाड आली. फ्रँक लँपार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सी क्लब ८४ सामने खेळला. त्यात ४४ विजय नोंदविले, २३ पराभव पत्करावे लागले, तर १७ सामने बरोबरीत राहिले. टक्केवारीत लँपार्ड यांचे मार्गदर्शक या नात्याने यश पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, परंतु या कालावधीत त्यांचा संघ एकही करंडक जिंकू शकला नाही. त्यामुळेच ४२ वर्षीय प्रशिक्षकाला मुदतीपूर्वीच पदावरून जावे लागले. 

सफल मध्यरक्षक, पण...

फ्रँक लँपार्ड यांची फुटबॉलपटू या नात्याने कारकीर्द वाखाणण्याजोगी आहे. वेस्ट हॅम युनायटेडतर्फे व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केल्यानंतर, तब्बल तेरा वर्षे त्यांनी चेल्सी क्लबचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मँचेस्टर सिटी, न्यूयॉर्क सिटी असा प्रवास करत २०१६ साली फुटबॉल मैदानावरील मध्यरक्षकाने थांबण्याचे ठरविले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानावर त्यांनी इंग्लंडचे १५ वर्षे प्रतिनिधित्व करताना शंभरहून जास्त सामने खेळण्याचा मान मिळविला. चेल्सी क्लबतर्फे त्यांनी तीन वेळा इंग्लिश प्रीमियर लीग विजेतेपद पटकाविले, एक वेळ चँपियन्स लीग किताब जिंकला. 

लँपार्ड यांची कारकीर्द यशोदायी ठरली, मध्यरक्षक जागी खेळताना ते वलयांकित ठरले, पण चेल्सीच्या प्रशिक्षकपदी त्यांना यश गवसले नाही. हे केवळ त्यांचे एकट्याचे अपयश नाही. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. यशापयशात खेळाडूंचा अधिक वाटा असतो, तरीही अपयशास प्रशिक्षकासच जास्त जबाबदार धरले जाते.

नव्या प्रशिक्षकांकडून अपेक्षा
फ्रँड लँपार्ड यांना हटविल्यानंतर चेल्सी क्लबने ४७ वर्षीय जर्मन प्रशिक्षक थॉमस टुकेल यांची नियुक्ती केली आहे. जर्मनीतील मेंझ ०५ व बोरुसिया डॉर्टमुंड, फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे प्रशिक्षकपद सांभाळलेल्या टुकेल यांच्याकडून आता चेल्सी क्लबला मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र यश-करंडक मिळाले नाही, तर त्यांनाही लँपार्ड यांच्याच वाटेवरून जावे लागेल हे स्पष्ट आहे.

संबंधित बातम्या