मुंबई सिटीचे `लीग` यश

किशोर पेटकर
सोमवार, 8 मार्च 2021

क्रीडांगण

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत गोव्यात जैवसुरक्षा वातावरणात रंगला. मुंबई सिटी एफसीने साखळी फेरीअंती गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवत प्रतिष्ठेच्या लीग विनर्स शिल्डचा मान पटकाविला. हा किताब गतमोसमापासून दिला जातो. एफसी गोवा संघ या किताबाचा पहिला मानकरी ठरला होता.

 

यंदा स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीने दमदार खेळ करत लीग विनर्स शिल्डसह एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठीही भारतातून थेट पात्रता मिळविली. खरे म्हणजे, गतमोसमात एफसी गोवाच्या सफल वाटचालीत लोबेरा यांचा मोलाचा वाटा होता, पण साखळी फेरीतील तीन सामने बाकी असताना प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनात मतभिन्नता आली. त्यामुळे लोबेरा यांना प्रशिक्षकपदावर पाणी सोडावे लागले. त्यानंतरही एफसी गोवाने लीग विनर्स शिल्डसह एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय क्लब हा मान मिळविला, पण आयएसएल स्पर्धेत लोबेरांच्या अनुपस्थितीत गोव्याच्या संघाला उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. 

अष्टपैलू संघाची बांधणी

स्पेनचे सर्जिओ लोबेरा ४४ वर्षांचे आहेत. त्यांच्यापाशी मार्गदर्शनाचा गाढा अनुभव आहे. दशकभरापूर्वी ते स्पेनमधील नावाजलेला संघ बार्सिलोना एफसीचे साहाय्यक प्रशिक्षक होते. त्यानंतर मोरोक्कोत यश मिळवून ते भारतात दाखल झाले. लोबेरा यांनी यंदाच्या मोसमात मुंबई सिटी संघाची बांधणी करताना अष्टपैलूत्वाबरोबरच अनुभवावर भर दिला. एफसी गोवा संघासाठी केलेले काम पुढे नेले. गतवर्षी जगप्रसिद्ध सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटीचे मालकी हक्क मिळविले. त्यामुळे या संघाच्या तिजोरीत आर्थिक स्थैर्य आले, महागडे करार करून खेळाडू मिळविता आले. लोबेरा यांनी मुंबई सिटीचे प्रशिक्षकपद सांभाळताना आपल्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवातर्फे खेळलेल्या दर्जेदार खेळाडूंना बोलावले. प्रगल्भ मार्गदर्शनाला कल्पकतेची जोड देत स्पॅनिश प्रशिक्षकाने मजबूत संघाची बांधणी केली.

संघ वेळीच सावरला

मुंबई सिटीच्या आयएसएल मोहिमेची सुरुवात धक्कादायक ठरली. पहिल्याच लढतीत त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडने पराभवाचा हादरा दिला, मात्र नंतर मुंबई सिटीने सलग बारा सामने अपराजित राहत धडाका राखला. नऊ विजय आणि तीन बरोबरीसह अग्रस्थान बळकट केले, पण नंतर त्यांना पुन्हा एकदा नॉर्थईस्ट युनायटेडने पराभूत केले. त्यानंतर मुंबई सिटीची घसरगुंडी झाली. त्याचा लाभ उठवत कोलकात्याच्या एटीके मोहन बागानने अव्वल क्रमांक मिळविला. मुंबई सिटी संघ वेळीच सावरला, साखळी फेरीतील अखेरच्या दोन लढतीत कमाल केली. ओडिशा एफसीचा ६-१ फरकाने धुव्वा उडविला, नंतर एटीके मोहन बागानलाही २-० फरकाने नमवत साखळी फेरीत ४० गुणांची कमाई केली. एटीके मोहन बागानचेही तेवढेच गुण झाले, परंतु मुंबई सिटीविरुद्ध दोन्ही लढतीत पराजित झाल्यामुळे, तसेच गोलसरासरीत कमी राहिल्याने कोलकात्याच्या संघाचे स्वप्न भंगले आणि मुंबईचा संघ साखळी विजेता ठरला.

संबंधित बातम्या