नीरजची विक्रमी भालाफेक

किशोर पेटकर
सोमवार, 15 मार्च 2021

क्रीडांगण

प्रचंड गुणवत्ता असलेल्या नीरज चोप्रा ह्या भारतीय भालाफेकपटूकडे भावी ऑलिंपिक पदक विजेता अशा नजरेने बघितले जाते. कोविड-१९ च्या साथीमुळे त्याला चौदा महिने स्पर्धात्मक क्रीडा मैदानापासून दूर राहावे लागले, मात्र ओडिशातील भुवनेश्वर येथे शिबिरात अथक मेहनत घेणाऱ्या या २३ वर्षीय भालाफेकपटूने दणक्यात पुनरागमन केले. पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री स्पर्धेत त्याने ८८.०७ मीटरवर भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम रचला आणि स्वतःचाच विक्रम मोडताना या वर्षीची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. 

नीरजने २०१८ साली इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटरवर भाला फेकून सुवर्णपदकाची कमाई केली होती. महामारीमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीचा वैयक्तिक कामगिरीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे नीरजने सिद्ध केले. टोकियो ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर नीरजची प्रगती आश्वासक आहे. तो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकू शकतो असे या खेळातील तज्ज्ञांना वाटते आणि त्या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहिले जाते. हरियानातील पानिपत येथील या मेहनती क्रीडापटूने पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय भालाफेकीत खूप मोठी मजल गाठली आहे. 

दुखापतीवर मात 
जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर नीरजला भाला फेकणाऱ्या हातावर एक सक्तीची शस्त्रक्रिया करावी लागली. एल्बोची दुखापत बळावण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे आवश्यक होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नीरज काही काळ भाला फेकू शकला नाही. संपूर्ण २०१९ वर्ष पुनर्वसन प्रक्रियेत गेले. गेल्या वर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत त्याने ८७.८६ मीटरवर भाला फेकत दुखापतीवर मात केल्याचे सिद्ध केले. मात्र नंतर कोरोना विषाणू महामारीमुळे सारे जग ठप्प झाले, क्रीडा मैदानावरही लॉकडाउन झाले, त्यामुळे नीरजला भारतात परतावे लागले. कोविड-१९ मुळे टोकियो ऑलिंपिकही लांबणीवर पडले. नीरजने परिश्रम घेणे कायम ठेवले, तो योग्य दिशेने वाटचाल करत आहे हे पतियाळात दिसले. भाला बदलण्याचाही त्याला फायदा झाला आहे. अगोदरचा नियमित भाला बदलून त्याने नव्या प्रतीचा भाला वापरण्यास सुरुवात केली आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी त्याने अगोदरच पात्रता मिळविली आहे, आता त्याचे लक्ष्य कामगिरी उंचावत जागतिक पातळीवरील स्पर्धकांना मागे टाकण्याचे असेल. 

प्रगतीवर भर
नीरजने २०१६ साली जागतिक ज्युनियर (२० वर्षांखालील) मैदानी स्पर्धेत ८६.४८ मीटरवर भाला फेकून विश्वविक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीने तो प्रकाशझोतात आला. तेव्हापासून या गुणवान भालाफेकपटूने सातत्याने प्रगतीचाच ध्यास घेतला. एप्रिल २०१८ मध्ये त्याने ८६.४७ मीटरची नोंद करत गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, नंतर त्याचवर्षी मे महिन्यात दोहा येथील डायमंड लीगमध्ये ८७.४३ मीटरची नोंद करत राष्ट्रीय विक्रमास गवसणी घातली. त्यानंतर जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर नोंदवत आपण आशियातील सर्वोत्तम भालाफेकपटू असल्याचे नीरजने अधोरेखित केले.

संबंधित बातम्या