‘तलवार’निपुण भवानी

किशोर पेटकर
सोमवार, 5 एप्रिल 2021

क्रीडांगण

चेन्नईच्या २७ वर्षीय सी. ए. भवानी देवी हिने नवा इतिहास रचला आहे. ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविणारी ती पहिली भारतीय तलवारबाज ठरली. आगामी टोकियो ऑलिंपिकमध्ये सी. ए. भवानी तलवारबाजीत भारतीय कौशल्य प्रदर्शित करताना दिसेल. या खेळात देशवासीयांसाठी ती आदर्श आणि प्रेरणादायी ठरली आहे.

क्रीडाजगतात तलवारबाजीस ऑलिंपिक दर्जा आहे, परंतु भारतीय या खेळात खूपच पिछाडीवर राहिले.  

तलवारबाजीतील सेबर प्रकारात निपुण असलेली भवानी जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासजणींत आहे. विश्वकरंडक तलवारबाजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत दक्षिण कोरियाविरुद्ध यजमान हंगेरीचा संघ पराभूत झाल्यानंतर, वैयक्तिक मानांकनाआधारे भवानीला ऑलिंपिकची पात्रता मिळाली. पात्रतेसाठी आशिया आणि ओशेनिया विभागात दोन वैयक्तिक जागा होत्या, त्यापैकी एक भवानीस मिळाली आणि भारतीय तलवारबाजीत सोनियाचा दिन उगवला.

बांबूच्या काठीने सराव
लहानपणी बांबूच्या काठीने तलवारबाजीचा सराव करणाऱ्या भवानीने फार मोठी मजल गाठली आहे. या वाटचालीत कुटुंबाचे पाठबळ फार मोलाचे ठरले आहे. भवानीचे वडील पुजारी, आई गृहिणी. पाच भावंडांत भवानी सर्वांत लहान. भवानीने शिक्षणाबरोबरच खेळासही महत्त्व दिले. वयाच्या दहाव्या वर्षीपासून तिने तलवारबाजीत प्रावीण्य मिळवले. भवानी स्क्वॉशही खेळत असे, मात्र एका खेळाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा आईच्या सल्ल्यानुसार तिने तलवारबाजीला प्राधान्य दिले. हा खेळ धाडसाचा, पण भवानी धीट आणि कणखर मनोवृत्तीची, ती डगमगली नाही. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे ती धीराने तलवारबाजीत यशाच्या पायऱ्या चढत गेली. सुरुवातीला आर्थिक चणचण भासली, पण वडिलांनी तिला नाउमेद केले नाही. भवानीच्या तलवारबाजीवर होणारा खर्च व्यर्थ ठरणार नाही याचा त्यांना विश्वास होता. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. भवानीने ऑलिंपिक पात्रता मिळवून वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पहिली आंतरराष्ट्रीय विजेती
भवानीने पाच वर्षांपूर्वी आईसलँडमध्ये झालेल्या महिला विश्वकरंडक सॅटेलाईट तलवारबाजी स्पर्धेत, तसेच दोन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल तलवारबाजीतही सुवर्णपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय तलवारबाजीत विजेती ठरलेली ती पहिली भारतीय आहे. तलवारबाजी हा जोखीम असलेला खेळ. पूर्ण एकाग्रता महत्त्वाची ठरते. भवानी सेबर प्रकारात खेळते, या ठिकाणी अतिशय चपळ पदलालित्य निर्णायक असते. २००४ साली तिने राष्ट्रीय पातळीवर पहिले सबज्युनियर सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. ती सीनियर गटात आठ वेळा राष्ट्रीय विजेती ठरली आहे. तामिळनाडू राज्यसरकारकडून तिला नेहमीच आर्थिक पाठबळ मिळाले, क्रीडापटूंना मदतीचा हात देणाऱ्या गोस्पोर्ट्स फाऊंडेशनचेही तिला सहकार्य लाभते. रिओ ऑलिंपिकसाठी ती पात्रता मिळवू शकली नव्हती, पण भवानीने निराशा झटकत टोकियो ऑलिंपिक पात्रतेचा निर्धार केला. इटलीत प्रशिक्षण घेतले. खूप मेहनत 
आणि त्याग या बळावर तिचे स्वप्न साकारले आहे.

संबंधित बातम्या