गोकुळम केरळाचे यश

किशोर पेटकर
सोमवार, 19 एप्रिल 2021

क्रीडांगण

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आय-लीग स्पर्धेत प्रवेश मिळाल्यानंतर या संघाने चौथ्या मोसमात विजेतेपदाचा करंडक पटकावण्याचा पराक्रम साधला. आय-लीग स्पर्धा जिंकणारा केरळमधील पहिला संघ हा मान गोकुळम केरळास मिळाला आहे. शिवाय २०२२ मधील आशियाई फुटबॉल महासंघाच्या एएफसी कप स्पर्धेसाठीही पात्रता मिळाली आहे. 

केरळमधील फुटबॉलला व्यावसायिक दिशा दाखविण्याच्या प्रयत्नात चार वर्षांपूर्वी गोकुळम केरळा एफसी संघाची निर्मिती झाली. कोझिकोडस्थित या संघाला ‘मलबारीयन्स’ या टोपणनावानेही ओळखले जाते. जानेवारी २०१७मध्ये या क्लबची स्थापना झाली, त्यानंतर भारतीय फुटबॉलमधील ‘जायंट किलर’ ही उपाधी मिळविलेल्या या व्यावसायिक क्लबने आता आय-लीग विजेतेपदासह आगळा ठसा उमटविला. भविष्यात वलयांकित इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची उमेद ते बाळगून आहेत. 

जोरदार मुसंडी
गोकुळम केरळाने ३६ वर्षीय इटालियन प्रशिक्षक व्हिन्सेन्झो एनेसे यांच्या मार्गदर्शनाखाली आय-लीग करंडक विजेतेपदाचा जल्लोष केला. व्हिन्सेन्झो यांची गतवर्षी ऑगस्टमध्ये मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. आय-लीग स्पर्धेत २०१७-१८ मोसमात सातवा, २०१८-१९ मोसमात नववा आणि २०१९-२० मोसमात सहावा क्रमांक मिळविल्यानंतर यंदा गोकुळम केरळाने जोरदार मुसंडी मारली. यंदाची आय-लीग स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे जैवसुरक्षा वातावरणात पश्चिम बंगालमधील कोलकाता व कल्याणी येथे झाली. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गोकुळम केरळा संघाला विजेतेपदापर्यंत पोचण्याची आशा नव्हती. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी जबरदस्त उसळी घेतली. अखेरच्या साखळी लढतीत मणिपूरच्या टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाला नमवून त्यांनी आय-लीग करंडकावर प्रथमच नाव कोरले. चर्चिल ब्रदर्स संघाने सलग अकरा सामने अपराजित राहत आय-लीग करंडक तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी वाटचाल राखली होती, मात्र सलग दोन सामने गमावल्यानंतर त्यांची घसरण झाली, तर गोकुळम केरळाने खेळ उंचावत लक्ष्य साध्य केले. स्पर्धेत गोकुळम केरळा आणि चर्चिल ब्रदर्सचे समान २९ गुण झाले, मात्र एकमेकांविरुद्धच्या लढतीत ५-३ असा सरस गोलफरक राखल्यामुळे केरळचा संघ चँपियन ठरला, तर गोव्यातील संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

लक्षवेधक वाटचाल
केरळमधील स्थानिक गुणवत्तेस प्राधान्य देण्यावर गोकुळम केरळाचा भर असतो. या संघाची मालकी श्री गोकुळम ग्रुपकडे आहे. पहिल्या मोसमात प्रशिक्षक असलेले बिनो जॉर्ज आता तांत्रिक संचालक आहेत. केरळमधील प्राथमिक फुटबॉल गुणवत्ता पारखून त्यास व्यासपीठ देण्याचे काम हा संघ करतो. यंदाच्या आय-लीग स्पर्धेत एमिल बेनी हा २० वर्षीय स्थानिक खेळाडू गोकुळम केरळाच्या यशस्वी वाटचालीत उल्लेखनीय ठरला. या संघाचे अंदाजपत्रक फार मोठे नसले, तरी व्यावसायिकता जपण्यात संघाने सफलता मिळविली आहे. 

त्यांच्या फुटबॉल विकासाला परिणामकारक दिशा गवसली आहे. गोकुळम केरळाने २०१९ साली ड्युरँड कप स्पर्धा जिंकली, तर २०२०मध्ये त्यांचा महिला संघ भारतीय महिला लीग फुटबॉल स्पर्धेत विजेता ठरला. 

संबंधित बातम्या