साहसी ‘जलकन्या’ नेत्रा

किशोर पेटकर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

क्रीडांगण
 

लेझर रेडियल या थरारक नौकानयन प्रकारात नेत्रा कुमारन या भारतीय मुलीने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

समुद्रात जोरदार वारा, कडक ऊन, उंच लाटा यांना आव्हान देत पाण्यावर स्वार होत नौकानयन करणे म्हणजे साहस आणि धाडसच करावे लागते. या जलक्रीडा प्रकारास सेलिंग म्हटले जाते. त्यात विविध प्रकार आहेत, 'लेझर रेडियल' या त्यापैकी एक. यात लहान बोटीतून एका हाताने सेलिंग करावे लागते, त्यात एकाग्रता आणि कौशल्याची कसोटी लागते. या थरारक जलक्रीडा प्रकारात नेत्रा कुमारन हिने ऐतिहासिक कामगिरी नोंदविली. 

नेत्रा कुमारन ही चेन्नईतील मॅकेनिकल इंजिनिअरिंग शिकणारी २३ वर्षीय हरहुन्नरी मुलगी, विविध कलांमध्ये पारंगत असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. ओमानमधील मुस्साना ओपन सेलिंग स्पर्धेत तिने टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली. सेलिंग क्रीडा प्रकारात ऑलिंपिक पात्रता मिळविणारी ती पहिलीच भारतीय महिला सेलर ठरली. यापूर्वी भारतीयांनी ऑलिंपिक सेलिंगमध्ये भाग घेतलेला आहे, पण ते कोटा पद्धतीने पात्र ठरले होते. नेत्राने प्रत्यक्ष स्पर्धेतील कामगिरीने थेट ऑलिंपिक तिकीट मिळविले. सर्वसाधारण क्रमवारीत तिला दुसरा क्रमांक मिळाला, पण स्पर्धा संपण्यास एक दिवस असतानाच तिने टोकियो ऑलिंपिकवारीवर शिक्कामोर्तब केले. भारतीय महिला सेलिंगसाठी हा फार मोठा बहुमान आहे.

सेलिंगने केले गारुड
लहानपणी क्रीडा मैदानावर टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, स्केटिंग, कराटे यांमध्ये प्रावीण्य संपादन केलेली नेत्रा चांगली चित्रकार असून पट्टीची नृत्यांगनाही आहे. मात्र सेलिंगने तिच्यावर सर्वाधिक गारुड केले. लाटांवर स्वार होत नौका हाकण्याच्या प्रेमापोटी तिने इतर खेळ-छंद त्यागले. सुमारे सहा वर्षे नृत्यकलेत केलेली साधनाही सोडली. तामिळनाडू सेलिंग असोसिएशनने उन्हाळी सुट्टीत आयोजित केलेल्या सेलिंग शिबिरात दाखल झालेल्या नेत्राने याच खेळात कारकीर्द करण्याचे निश्चित केले. आयटी व्यावसायिक असलेले तिचे वडील व्ही. सी. कुमारन यांनी मुलीला पूर्ण प्रोत्साहन दिले. नेत्राने लहान बोटीत चढून एकटीने मोठ्या धैर्याने खोलवर पाणी कापण्यास सुरुवात केली आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही. २०१४ व २०१८ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१८ साली जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली.

पहिली भारतीय सेलर
कोरोना विषाणू महामारी लॉकडाउनमुळे गतवर्षी नेत्रा स्पेनमध्ये अडकली. चेन्नईतील आप्तेष्टांपासून दूर राहण्याची सल असली, तरी तेथील वास्तव्य तिला कौशल्य विकसनात फायदेशीर ठरले. हंगेरीचे दोन वेळचे ऑलिंपियन सेलर तमास एस्झेस यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनमधील ग्रान कनारिया समुद्र किनारी नेत्राची गुणवत्ता आणखीनच बहरली आणि अधिक परिपक्व झाली. त्या बळावर तिने ओमानमधील आशियाई-आफ्रिकन पात्रतेस सरस कामगिरी नोंदविली. गेल्या वर्षी जानेवारीत मायामी येथे झालेल्या विश्वकरंडक सेलिंग मालिकेतील हेम्पेल स्पर्धेत ब्राँझपदक जिंकून नेत्रा प्रकाशझोतात आली. विश्वकरंडक सेलिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय 
सेलर ठरली.

संबंधित बातम्या