अपेक्षा उंचावलेली मीराबाई

किशोर पेटकर
सोमवार, 3 मे 2021

क्रीडांगण

महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूची हल्लीची कामगिरी पाहता, तिच्याकडून टोकियो ऑलिंपिकमध्ये पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. 

कोरोना विषाणू महामारीच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेला असताना क्रीडाजगतात आगामी टोकियो ऑलिंपिकबाबत उत्सुकता आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रातील ह्या मोठ्या सोहळ्यात यशप्राप्तीसाठी क्रीडापटूंची तयारी सुरू आहे. भारतीय क्रीडापटूही ऑलिंपिक पदकाची आस बाळगून आहेत. महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिची हल्लीची कामगिरी पाहता, तिच्याकडूनही पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. ताश्कंद येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने महिलांच्या ४९ किलो वजनगटात क्लीन अँड जर्क प्रकारात विक्रमी वजन उचलत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. महामारीमुळे सुमारे १६ महिने आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगपासून दूर राहिलेल्या मीराबाईची आशियाई स्पर्धेतील कामगिरी उत्साहवर्धक आहे. मणिपूरची ही २६ वर्षीय महिला वेटलिफ्टर सध्या टोकियो ऑलिंपिकसाठी परिश्रम घेत आहे. 

जोरदार पुनरागमन
पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाईला अपयशाचा सामना करावा लागला, क्लीन अँड जर्क प्रकारात ती वजन उचलण्यात असमर्थ ठरली. मात्र ती निराशा झटकून ही जिगरबाज महिला वेटलिफ्टर २०१७ मधील जागतिक स्पर्धेत सहभागी झाली. तेथे ४८ किलो गटात तिने सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी कोलकाता येथे सीनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने एकूण २०३ किलो वजन उचलले. त्यानंतर कोरोना विषाणू महामारीमुळे जागतिक वेटलिफ्टिंग वेळापत्रक खंडित झाले, मात्र प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मीराबाईचा खडतर सराव कायम राहिला. आता ताश्कंदमधील स्पर्धेत तिने क्लीन अँड जर्कमधील विक्रमी ११९ किलोसह एकूण २०५ किलो वजन पेलले. स्नॅच प्रकारात तिने ८६ किलो वजन उचलले. मीराबाईने आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये दोनशे किलोपेक्षा जास्त वजन उचलण्याचा पराक्रम साधला हे जास्त उल्लेखनीय आहे. यामुळेच तिच्याकडे ऑलिंपिक पदकाच्या आशेने पाहिले जात आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये मीराबाई क्लीन अँड जर्कमध्ये असफल ठरली होती, मात्र ताश्कंदमध्ये याच प्रकारात ती अग्रेसर ठरली.

संधी साधणार?
ताश्कंदमध्ये मीराबाईला ब्राँझपदक मिळाले, तर चिनी वेटलिफ्टर्सने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.  होऊ झिहुईने एकूण २१३ किलो, तर जागतिक विजेत्या जियांग हुईहुआने एकूण २०७ किलो वजनाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईस वेळोवेळी चिनी आणि उत्तर कोरियन वेटलिफ्टर्सनी शह दिलेला आहे. २०१९ मधील जागतिक स्पर्धेत मीराबाई चिनी आणि उत्तर कोरियन वेटलिफ्टर्सना मागे टाकू शकली नव्हती, परिणामी तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, उत्तर कोरियाने आगामी टोकियो ऑलिंपिकमधून माघार घेतली आहे, त्यामुळे पोडियमच्या वाटेतील मीराबाईचा एक अडथळा दूर झाला आहे. नियमानुसार ऑलिंपिक वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येक गटात एका देशाकडून एकच स्पर्धक असेल. त्यामुळे मीराबाईच्या गटात एकच चिनी महिला वेटलिफ्टर असणार हे नक्की आहे. फॉर्म कायम राहिला आणि शरीरानेही साथ दिली, तर टोकियोत मीराबाईच्या गळ्यात मौल्यवान पदक दिसू शकते.

संबंधित बातम्या