मँचेस्टर सिटीची मक्तेदारी

किशोर पेटकर
सोमवार, 24 मे 2021


क्रीडांगण

इंग्लिश फुटबॉलमधील मक्तेदारी सिद्ध करताना मँचेस्टर सिटी एफसीने दशकभरात पाचव्यांदा प्रीमियर लीग करंडक जिंकण्याचा पराक्रम साधला. इंग्लंडमधील या जुण्याजाणत्या फुटबॉल क्लबने एकंदरीत सात वेळा प्रीमियर लीग विजेतेपद मिळविले आहे, त्यापैकी पाच करंडक २०११-१२ पासून मिळवलेले आहेत. 

स्पॅनिश प्रशिक्षक ५० वर्षीय पेप ग्वार्दिओला यांनी पाच वर्षांपूर्वी ताबा स्वीकारल्यापासून तिसऱ्यांदा मँटेस्टर सिटी एफसी संघ इंग्लंडमधील चँपियन क्लब ठरला. गतमोसमात विजेतेपदाच्या शर्यतीत मँचेस्टर सिटीला लिव्हरपूल क्लबने मागे टाकले. यंदा स्पर्धेतील तीन सामने बाकी असतानाच सिटी संघाने विजेतेपदावर नाव कोरले. मँचेस्टर युनायटेड, लेस्टर सिटी, चेल्सी, लिव्हरपूल या प्रतिस्पर्धी संघांना बरेच मागे टाकले. अबुधाबीस्थित सिटी फुटबॉल ग्रुपने २००८ साली मँचेस्टर सिटी एफसीची मालकी मिळविली आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली. तेव्हापासून या क्लबचा आलेख चढता राहिला आहे. 

कोरोना विषाणू महामारीमुळे २०२०-२१ मधील इंग्लिश फुटबॉल मोसम अपेक्षेप्रमाणे रिकाम्या स्टेडियमवरच रंगला. चाहत्यांच्या पाठिंब्याविना स्टेडियमवर खेळणे कठीण ठरल्याचे ग्वार्दिओला यांनी नमूद केले आहे. मात्र क्लबने घरी असलेल्या चाहत्यांना निराश केले नाही. लीग कपनंतर प्रीमियर लीग हे मँचेस्टर सिटीचे मोसमातील दुसरे विजेतेपद आहे. त्यांना तिहेरी यशाची संधी आहे. चँपियन्स लीग स्पर्धेची अंतिम लढत ऑल इंग्लिश असेल, त्यावेळी मँचेस्टर सिटीला चेल्सी क्लब आव्हान देईल.

जबरदस्त मुसंडी
मँचेस्टर सिटीच्या मोसमाची सुरुवात निराशाजनक होती. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत त्यांनी केवळ पाच सामने जिंकले होते आणि गुणतक्त्यात ते पहिल्या दहा संघातही नव्हते. गतवर्षी आणखी दोन वर्षांसाठी प्रशिक्षकपदी मुदतवाढ मिळालेले ग्वार्दिओला शांत होते, त्यांनी तोल ढळू दिला नाही. मँचेस्टर सिटीने नंतर कमाल केली. सलग १५ सामने जिंकून जबरदस्त मुसंडी मारली. इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आणि ३५ लढतीनंतर विजेतेपदावर हक्क सांगितला. मँचेस्टर सिटीने करंडक निश्चित करताना २५ सामने जिंकले, त्यापैकी ११ विजय अवे मैदानावरील होते.

किमयागार प्रशिक्षक
स्पेनचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पेप ग्वार्दिओला यांनी निवृत्तीनंतर व्यावसायिक फुटबॉलमधील किमयागार प्रशिक्षक ही ख्याती मिळवली आहे. बार्सिलोना एफसीने ग्वार्दिओला यांच्या मार्गदर्शनाखाली चार मोसमात (२००८-०९ ते २०११-१२) तब्बल १४ करंडक जिंकून इतिहास घडवात. बायर्न म्युनिक संघाला त्यांचे तीन मोसम मार्गदर्शन लाभले, त्या कालावधीत जर्मन क्लबने सात प्रमुख स्पर्धा जिंकल्या. मँचेस्टर सिटीने ग्वार्दिओला यांना २०१६ साली करारबद्ध केले, पहिला मोसम करंडकाविना गेला. त्यानंतरच्या चार मोसमात या कल्पक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सिटीने सर्व स्पर्धांत मिळून १० करंडक जिंकले आहेत. त्यात तीन प्रीमियर लीग, चार लीग कप, एक एफए कप व दोन कम्युनिटी शिल्डचा समावेश आहे. थोडक्यात, ग्वार्दिओला यांची सर्वकालीन महान प्रशिक्षकांत गणना होत आहे.

संबंधित बातम्या